Monday, November 26, 2012

‘बाळासाहेब’ माझ्या नजरेतून


मी कट्टर शिवसैनिक नाही, की बाळासाहेबांचा समर्थक नाही. तरीही माझं बाळासाहेबांशी एक वेगळं नातं होतं. त्या नात्याला नाव देता येणार नाही. काहीसं धुसर, काहीसं अंधुक असं ते नात आहे. जे एरवी मला जाणवत नव्हतं. परंतु, जेव्हा जानेवारी उजाडायचा आणि माझा वाढदिवस जवळ यायचा, तेव्हा रस्त्यांवरील बाळासाहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर मला नेहमीच आकर्षित करायचे. त्यामुळं माझ्याही मित्रांना माझा वाढदिवस असल्याची चाहूल आपसूकच लागायची. हा माझ्यासाठी थोडा वेगळा परंतु खुपचं छान अनुभव असायचा. त्यातल्या त्यात ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ यांची जयंतीही याच दिवशी येत असल्यामुळे मला काहीतरी वेगळं असं जाणवायचं. ह्या दोन व्यक्ती होत्या ज्यांची नावं महाराष्ट्र तसेच देशामध्ये आदरानं घेतली जायची आणि अशा दोन महान व्यक्तींच्या वाढदिवसादिवशी माझा वाढदिवस असल्याकारणाने मला अजूनच अभिमान वाटायचा.
बाळासाहेब एक चांगले व्यंगचित्रकार! आणि मलाही व्यंगचित्रांची, कलांची चांगलीच आवड असल्याकारणाने उगाचच मनाला वाटायचं, की त्यांच्यात आणि माझ्यात बरंच काही साम्य आहे. परंतु मी नेहमी राजकारणापासून दूर राहायचो त्यामुळे हा समज खोटाच असावा हे ही मला कळायचं. असो.. 
मी आज माझ्या स्वप्ननगरी मुंबईमध्ये काम करतोय. मुंबई म्हणजे स्वप्नांचं घर, आणि माझ्या स्वप्नांचा तर महालचं म्हणायचा. याच मुंबई शहरात एखाद्या राजाप्रमाणे बाळासाहेबांच एक वेगळं असं राज्य. परंतु आज मी इथं काम करत असताना बाळासाहेबांच्या निधनाची बातमी मनास हळहळ लावून गेली. अनेकदा वाटायचं, की या महान व्यंगचित्रकाराला, एका दर्जेदार कलाकाराला एकदा स्वतः जावून भेटावं, त्यांच्या वाढदिवसादिवशी त्यांना शुभेच्छा द्यावा, परंतु हे सर्व काही आता अधुरचं राहिलं... आज त्यांच्या जाण्याने मुंबईसह देशभरात जी शोककळा पसरलीय. माझंही मन सुन्न झालंय होतयं. माझ्या दृष्टिकोनातून व्यंगचित्रकारिता क्षेत्रातील एक दर्जेदार तसेच व्यंगचित्राबाबतची उत्तम जाण असलेला कलाकार आज जगातून गेला याचं खरंच वाईट वाटतयं!


Wednesday, August 22, 2012

एक अधूरी भेट ...



 Ekmat Office, Latur 

         माझी पुण्यातली नोकरी संपली होती. संपली म्हणजे तीथे मी एका वर्षाच्या प्रशिक्षणाकरिता होतो व प्रशिक्षणाचा एका वर्षाचा काळ संपल्यामुळे मला परत औरंगाबादला यावं लागलं. सुरुवातीला जेव्हा पुणे सकाळमध्ये रुजू झालो होतो तेव्हा सर्वच जणं खुश होते. मी ही नवनवीन स्वप्न रंगवायला लागलो होतो. वाटत होतं की प्रशिक्षण संपल्यावर आपल्याला इथेच कायमस्वरुपी नोकरी मिळेल परंतु तसे झाले नाही, माझी साफ निराशा झाली. परंतु या गोष्टीमुळे मी काही खचलो नाही की दुःखावलो नाही. वाटलं की आयुष्यात अजून काही तरी मोठी संधी मिळणार असेल म्हणून ही नोकरी गेली. माझा स्वतःवर आणि माझ्या नशिबावर पक्का विश्वास आहे. जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं हे भगवदगीतेमधील वाक्य मी अगदी माझ्या मनावर कोरुनच घेतलं आहे, त्यामुळे जगातील कितीही वाईट परिस्थिती आली तरी त्याचा माझ्यावर काडीमात्र फरक पडत  नाही.
        असो.. पुण्याची नोकरी सोडण्या आगोदर मी मुंबईतील प्रहार या वृत्तपत्रात मुलाखत दिली होती. तीथे माझी निवड झाल्याचे तेथील मॅनेजर व संपादकाने मला सांगितले होते परंतु तुम्हाला लगेच कामावर घेता येणार नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी बोलवायची मी वाट पहात होतो. परंतु त्यांच्याकडून कसलेच उत्तर न आल्यामुळे मला थोड वाईट वाटलं. कारण मुंबई माझ्या स्वप्नांचं शहर होतं. मी माझ्या आयुष्यात मुंबईत वास्तव्य करावं हे मला नेहमीच वाटत आलं आहे. परंतु तसा योग काही अजून आला नाही. मुंबईनंतर मी आता औरंगाबादलाच जायचं ठरवलं व तिथेच कोणत्यातरी वृत्तपत्रात आपण नोकरी करावी हेच मनात पक्क केलं. परंतु औरंगाबादला आल्यावर तीनच महिन्यात माझ्या एका सरांनी मला एका ठिकाणी नोकरी करतो का असे विचारले. मला नोकरीची आवश्यकता होतीच. परंतु मला शक्यतो पुणे qकवा मुंबईत नोकरी करायची होती. त्यामुळे मी ही त्यांनी सांगितलेल्या नोकरीबद्दल साशंक होतो. तरीही मी त्यांना होकार दिला. त्यांनी सांगितलेली नोकरी ही मराठवाड्यातील लातूर याठिकाणी एकमत या वृत्तपत्रात होती. सुरुवातीला लातूर या शहरात नको वाटले पण नंतर ही एक चांगली संधी असल्याचे जाणवले. 

       एकमत हे वृत्तपत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांचे. मला राजकारण जास्त आवडत नाही परंतु विलासराव देशमुख मला खूप आवडायचे. त्याचे कारणही काहीसे तसेच होते. मी स्वतः एक कलाकार वृत्तीचा व्यक्ती असल्याने मला कलेबाबत फार आपुलकी आहे व संपूर्ण राजकारणात फक्त विलासराव देशमुख हे एकच व्यक्तीमत्व असे होते की, त्यांना कलेबाबत फार तळमळ होती. ते स्वतः शास्त्रीय संगीत सभेस हजर असतं. नृत्य, नाट्य, सिनेमा, गायन हे सर्व त्यांची आवडती क्षेत्र. एकदा औरंगाबादला महसूल प्रबोधिनी येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आम्ही सर्व संगीत क्लासच्या विद्याथ्र्यांनी विलासरावांच्यासमोर गाणं म्हटलेलं माझ्या मनात खोलवर रुजलेलं आहे. त्यामुळे मी एकमत मध्ये नोकरी केली तर मला कधी ना कधी तरी विलासरावसाहेबांशी जवळून भेटता येईल, त्यांच्याशी संवाद साधता येईल तसेच त्यांच्या कार्यक्रमांचे फोटो काढता येईल अशी मनात कुठेतरी आशा होती. ह्या आशेपोटी मी या नोकरीस होकार दिला व लवकरच या नोकरीस रुजू झालो. 

       पुण्यातील माझा अनुभव हा वेबपत्रकारीतेशी असल्याने मला इथेही संपादकीय विभाग व वेब पत्रकारीतेची कामं होती. मी एकमतची वेबसाईट अपडेट ठेवून फेसबुक व ट्वीटरवरुन एकमतचे पेज बनवून त्यांनाही अपडेट ठेवायचे काम करायचो. या कामामागे एकमतचा वाचकवर्ग वाढवणे हा तर मुळ उद्देश होताच परंतु त्याच बरोबर साहेब भारतात अथवा जगात कुठेही असले तरी त्यांना एकमतच्या बातम्या दिसाव्यात हा उद्देश माझ्या मनात कुठेतरी लपलेला होता. परंतु माझं दुर्दैव असावं की मला हे काम कधीच करता आले नाही. 

      मी इकडे येताच काही दिवसांतच विलासराव साहेब आजारी पडल्याचे कळाले. त्यांच्या दवाखान्यातून येणाèया बातम्या तसेच त्यांच्या बद्दलच्या प्रतिक्रीया या सर्व ऐकून मनास सुन्न व्हायचे. त्यांच्या कार्यक्रमांच्या, त्यांच्या भाषणांच्या बातम्या देण्याची इच्छा बाळगणारा मी आज त्यांच्या आजारपणाची बातमी देत होतो. चेन्नई येथील दवाखान्यात त्यांना नेण्यात आल्यावर त्यांची तब्येत सुधरत असल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या. या बातम्या वेबसाईटवर देतांना मनातून खूप आनंद व्हायचा. वाटायचं की साहेब आता लवकरच ठिक होणार, आणि ऑपरेशननंतर आराम करण्यासाठी लातूरला येणार. त्यांना व्हेंटीलेटरवरुन काढल्याच्या बातमीने तर माझ्यासोबत सर्वच एकमत कर्मचाèयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आम्ही सर्वच जण आनंदात होतो. डॉक्टरांनी साहेबांचे यकृताचे प्रत्यारोपण करण्याचे सांगितल्यावर शेकडो लोकांनी आम्ही आमचे यकृत साहेबांना द्यायला तयार आहे असे फोन व ईमेल, फेसबुकवर कमेंट येत होते. साहेबांवरचे लोकांचे हे प्रेम पाहून अनेकवेळा डोळे भरुन यायचे. संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशातून साहेबांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या जायच्या. त्या सर्वांच्या बातम्या मी सर्वात आधी वेबसाईटवर टाकायचो. त्यांनी लवकर ठिक व्हावे ही खूप मनात आशा होती. एक दिवस त्यांच्या यकृत प्रत्यारोपणाची बातमी एका वृत्तवाहीनीवर दाखवली. या प्रत्यारोपणादरम्यान यकृत देणाèयाचा मृत्यू झाल्यामुळे आता नवीन दात्याचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले. ही बातमी पाहून वाटले की लवकरच साहेबांच्या ऑपरेशनची तयारी सुरु होईल. दुस़रा यकृत दान करणारा दाता मिळाला की साहेब ठीत होतील. ही गोष्ट खरंच आमच्याकरीता आनंदाची होती. साहेबांची तब्येत आता पहिलेपेक्षा चांगली असल्याचेही या वृत्तवाहीनीत सांगण्यात आले होते. त्यामुळे आम्ही सर्वजण थोडे निश्चिंत झालो होतो. 

         मला इथे येऊन एक महिना झाला होता. ऑगस्ट महिन्यात माझा इथला पहिला पगार हातात पडणार होता. १४ ऑगस्टला आम्हा सर्वांचा पगार झाला. माझे बँक अकाऊंट तयार न झाल्यामुळे मला कॅशच मिळाली. मी ही कॅश बॅकेतील माझ्या अकाऊंटला टाकण्यासाठी जायच्या तयारीत होतो. इतक्यात माझ्या मावशीचा मुलगा आला. आम्ही थोड्यावेळ बोललो व मी बँकेच्या दिशेने निघालो. माझ्या पहिल्या पगारीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. माझ्या घरी मी फोन करुन ही आनंदाची गोष्ट सांगणार होतो. परंतु बँकेत पैसे भरुन आल्यावर ही आनंदाची गोष्ट सांगावी असे वाटले म्हणून मी पहिले बँकेत गेलो... खूप रांग होती. मी रांगेत उभा राहिलो. तितक्यात मला एक फोन आला. मी थोडा गडबडीत होतो. तरीही फोन उचलला.. मावशीच्या मुलाचा फोन होता, मी हॅलो म्हणालो ... तो थोडा वेळ थांबून म्हणाला विलासराव गेले...


     माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तरीही मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. बँकेतून गाडी घेऊन थेट ऑफिसच्या दिशेने निघालो. अनेक विचार मनात येत होते. विलासरावांच्या तब्येतीबाबत आधीच अनेक अफवा परसल्या होत्या त्यामुळे ही सुध्दा अफवा असावी हेच मनात वाटत होत. गाडी एकमत ऑफिसमध्ये आणली. पटकन उतरुन ऑफिसात पळत गेलो.. तर सर्वजण टिव्हीसमोर स्तब्ध उभे होते. डोळ्यात अनेकांच्या पाणी होते. विलासरावांच्या निधनाची बातमी त्या टिव्हीवर चालू होती.


         मला काय करावं काहीच सुचेना. काहीच समजत नव्हतं. साहेबांची दुपारीच ऑपरेशन होणार अशी बातमी पाहिलेला मी आता ही बातमी ऐकून धक्काच बसला. मी टिव्हीसमोर बसलो. अनेक मित्रांचे फोन येत होते. त्यांना काय बोलावं काहीच समजत नव्हतं. थोड्यावेळाने स्वतःला सावरत मी घरी फोन लावून ही गोष्ट घरच्यांना सांगितली. माझ्या पहिल्या पगारीचा फोन घरच्यांना करायचा होता तर त्या ऐवजी ही असली दुःखाची बातमी मला घरच्यांना सांगावी लागली. घरच्यांनाही ही बातमी ऐकून धक्का बसला. कारण मागील आठ दिवसांपासून आमचं याच विषयावर बोलणं चालू होतं. विलासराव ठिक होतील अशाच गोष्टी आम्ही बोलायचो. परंतु ही गोष्ट आम्हा सर्व कुटुंबीयांसाठी एक मोठा धक्काच होती. मी पाहिलेली सर्व स्वप्न आता अधूरीच राहिली होती. त्यांची आणि माझी भेट आता कधीच शक्य नव्हती. जो एक उद्देश मनात बाळगून मी इथे आलो होतो तो उद्देशच संपला होता. साहेब आता कधीच भेटणार नव्हते. या विचारानेच मला गहिवरुन येत होते.

      साहेब नाहीत परंतु त्यांच्या या वृत्तपत्राला आता एका अशा ठिकाणी नेऊन ठेवायचं की ज्यामुळे साहेब कुठेही असतील तर तीथे त्यांना अभिमानच वाटावा. त्यांनी त्यांच्या मनात जी भावी  एकमतची कल्पना केली असेल ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण हवे ते प्रयत्न करु हाच निर्धार त्या दिवशी करुन मी पुन्हा आपल्या कामात व्यस्त झालो. 

Saturday, July 14, 2012

भेट! दोन फेसबूक प्रोफाईल फोटोंची...

 तो पुण्यामध्ये एका वृत्तपत्रामध्ये उपसंपादक.
ती मुंबईमध्ये बी.कॉमचे शिक्षण घेणारी.
दोघेही अनोळखी. एकमेकांचा जरा सुध्दा गंध नाही, की पुसटशी ओळखही नाही.
त्याला वेड होते ते फेसबूकवरुन नवनवीन मित्र-मैत्रिण जोडण्याचे.
तीला आवड होती नवीन पुस्तके, लेख वाचण्याची. नवनवीन लोकांशी ओळख वाढवण्याची.
तो आपला मुक्तछंदी, मनमिळाऊ, कलाकार मनोवृत्तीचा.
ती सुध्दा तशीच मुक्तछंदी, स्वतःचे विश्व निर्माण करु पाहणारी, २१ व्या शतकातील तरुणी.
हा कधी-मधी पुरवण्यांमध्ये लेख लिहायचा आणि फेसबूकवर शेअर करायचा.
ती नियमीतपणे याच्या प्रत्येक लेखाला लाईक करायची.
काही दिवसानंतर याच्या लक्षात आले की, कोणीतरी आपल्या लेखांना नियमित लाईक करत आहे.
एकदा त्याने असेच ऑफलाईन चॅट करण्यास सुरुवात केली. मग तीने सुध्दा रिप्लाय दिला.
याच्या मनात लाडूच फुटले.
तिही याच्याशी छान गप्पा मारू लागली.
२-२ तास चॅटींग चालायची. खूप बोलायचे दोघे. मस्त जमलं होतं दोघांचं ट्यूनिंग.
हळू हळू बोलणं चॅटींग इतकं वाढलं की १० मि. सुध्दा ऑफलाईन राहणं अवघड झाले.
जेवणाकडे लक्ष नाही की, तब्येतीकडे. सारं लक्ष फेसबुककडे.
ती मोबाईलवरुन फेसबूक हाताळायची तर हा ऑफिसमधून वेळ काढून बोलायचा.
ऑफिस संपलं की, दोघांच्या बोलण्याला विराम यायचा.
यावर शक्कल काढून दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले.
मग काय पहिले चँटींग आणि मग सुरु झाल्या मोबाईलवरच्या गप्पा.
पण मोबाईल सुध्दा कुठे पुरतोय त्यांच्या बोलण्याला. मोबाईलचे बील वाढत होते. बॅलन्स धडाधड कमी होत होते. नुसते रिचार्ज आणि मोठमोठी बीलं भरणं यातचं सर्व पैसा खर्च होत होता.
यावर उपाय म्हणून याने एका दूस-या कंपनीचे सिमकार्ड घेतले आणि तेच कार्ड तिला सुध्दा घ्यायला लावले.
यामुळे दोघांना अगदी कमी पैशात तासभर बोलता येत होते.
आता यांच्या बोलण्याला रात्र सुध्दा कमी पडू लागली.
ती घरी असायची आणि हा रुम करुन राहत होता. तीला तिची आई ओरडायची आणि हा मस्त तिच्याशी गप्पा मारायचा.
तीला खूप बोलावंस वाटायचं पण आईच्या रागावण्याने मध्येच तीला बोलणं बंद कराव लागायचं.
एक दिवसं तिने सकाळीच फोन केला. हा मस्त झोपलेला. गडबडीत त्याने फोन उचलला. ती फार वैतागली होती. खूप काही काही बडबडत होती.
हा तीला समजावत होता. काय झालं विचारत होता.
ती काहीच बोलेनाशी झाली. आणि मग ती हळूच रडत रडत म्हणाली... आय लव्ह यू... मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.

याची झोप उडाली. याला काही कळेनासे झाले. एकमेकांना यांनी अजून पाहिले नव्हते. तोंडओळख ती सुध्दा फेसबूकवरील प्रोफाईल फोटोची. बस.. एवढेच त्यांनी एकमेकांना पाहिलेले.
हा तीला समजावत होता. आपण २१ व्या शतकातले, असे एकमेकांना न पाहता कसे एकदम लग्नाबाबत ठरवायचे. तु मला पाहिले नाही, की मी तूला. मला सुध्दा तु आवडतेसं पण इतका पुढचा विचार मी केला नाही.
पहिले आपण भेटूयात मग काय तो निर्णय घेऊयात.
आता या निर्णयावर त्यांची गाडी पोहचली.
पुन्हा बोलणे सुरु झाले. पण आता दोघांत ओढ होती ती म्हणजे भेटीची.
अनेक तारखांच्या बदलानंतर एक तारीख ठरली  फेब्रूवारीची.
व्हेलेंटाईन डे ला भेटायचे होते पण तेही जमणार नसल्याने मग त्याआधीची भेटं ठरली.
ह्याची भेटण्याची तयारी सुरु झाली आणि तिची सुध्दा.
कसं भेटावं? काय बोलावु? ती कशी असेल? तो कसा दिसत असेल? ती काळी की गोरी? हा उंच की बुटका़?
अशा अनेक प्रश्नांनी दोघांच्या मनात घरं करण्यास सुरुवात केली.
मग यांनी भेटण्याआधीच ठरवल, की भेटल्यावर जर आपण एकमेकांना आवडलो नाही तर तसं स्पष्ट सांगायचं. कोणीच कोणाला चूकीचे ठरवणार नाही. तसेच कोणीच कोणावर रागावणार नाही.
हा मुलगा मुलगी बघण्याचा कार्यक्रम यांनीच ठरवला. वेळ ठरली, स्थळ ठरले.
सकाळी ६ च्या सिंहगड एक्सप्रेसने हा मुंबईला निघाला. सीएसटीला भेटण्याचे ठरले.
याचे स्वप्न होते की, एकदा तरी मरीन ड्राईव्हला जायचं. तिथे एक संध्याकाळ काढायची.
मग तिथेच भेटायचे ठरले.  दोघेही मस्त तयार होऊन सीएसटीवर पोहोचले. तीथल्या गर्दी गोंगाटात एकमेकांना शोधू लागले.
इकडे शोध तिकडे शोध चालू झाला. फोन न करण्याचे ठरवले होते त्यांनी.
आता बोलायचे ते समोरासमोरच.. असंच त्यांनी ठरवलं होतं.
एकमेकांना दोघांनीही पाहिलेलं नव्हत आतापर्यंत.
ओळख फक्त फेसबूकवरच्या त्या प्रोफाईल फोटोंचीच.
इकडे तिकडे शोधत शोधतं ते एकमेकांसमोर येऊन उभे राहिले. दोघेही एकदंम स्तब्ध. कसलाच आवाज नाही की, कसलीच गडबड नाही. जणू त्यांच्यासाठी सीएसटी म्हणजे एका निरवं ठिकाणाासारखं झाले होते.
तीने पटकन येऊन याला मिठी मारली. जगाचे, लोकांचे कसलेच भान आता उरले नव्हते. आसं होती ती फक्त एका भेटीची. त्या एका उबदार मिठीची. तो ही गहीवरुन आला. कसंबसं सावरत दोघे गप्पा मारत मारत मरीन ड्राईव्हच्या दिशेने निघाले.
दोघांनी एकमेकांना पहिल्यांदाच पाहिले होते. त्यांची जोडी काही हिरो -हिरॉईन सारखी नव्हती. तो खूप हँण्डसम आणि ती खूप ब्यूटीफूल असं ही काही समिकरण नव्हतं पण दोघांचा स्वभाव तिळमात्र वेगळा नव्हता.
दोघेही आपल्या विश्वात रमणारे, आपली स्वप्न जोपासणारे, आपलं स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण करणारे, उंचउंच भरारी मारण्याची स्वप्नं पाहणारे हे दोन पक्र्षी आज पहिल्यांदा एकत्र आले होते.
जणू त्यांना असं वाटतं होतं, की देवाने आपल्या दोघांना एकमेकांसाठीच बनवले आहे. ते दोघे होते ही तसेच. एकदम वेगळे.
दोघांना जशा आपल्या जोडीदाराबद्दल अपेक्षा होती, तशीच ती दोघं होती. दोघांनाही काडी मात्र रागाची झालंर नव्हती. ते मस्त मजेत  इकडे तिकडे फिरत होते. मुंबईच्या त्या आफाट गर्दीच्या व रहदारीच्या रस्त्यावर हातात हात घालून मोकळेपणाने फिरत होते.
एकमेकांचा हात त्यांच्या हातून सुटत नव्हता. याला मुंबईची फार आवड होती त्यामुळे तो भलताच खूष होता. तीला तो भेटला त्यामुळे तिचा आनंद सुध्दा भरभरून आला होता.
जसजशी संध्याकाळ होत होती तशी यांची पाऊले मरीन ड्राईव्हकडे वळू लागली.
मस्त सूर्यास्ताच्या वेळी यांनी मरीनड्राईव्ह गाठली. निवांत एका ठिकाणी त्यांनी एक जागा निवडली.
समुद्राच्या लाटा, सुर्यास्ताचा मंद प्रकाश व दूर वर समुद्राच्या पाठीमागे लपणारा तो सुर्य आणि त्याला न्याहळत एकमेकांचे हात हातात घेऊन बसलेली ही दोन पाखंर.
आता त्यांना कशाचीच चिंता नव्हती, ना जगाची, लोकांची, की घरच्यांची. हा दिवसं संपूच नये असं त्यांना वाटत होतं.
संध्याकाळ हळू हळू संपायला लागली आणि रात्रीचा अंधार सर्वत्र पसरू लागला. समुद्राच्या त्या टोकाला सुर्याने सुध्दा आता विश्राम घेतला. निळसर थोडं तांबडं आभाळ त्याचे प्रतिबिंब पाण्यात दिसणा-या त्या लाटा घेऊन पायापाशी धडकतं होत्या.
अंधाराची चाहूल लागताचं तिची घरी जायची लगबग सुरु झाली. हा मात्र तिला अजून थोडं थांब म्हणून विनवणी करत होता. तीच मन होत नव्हतं घरी जाण्याचं परंतु आईचा सारखा सारखा फोन येत होता.
जड पाऊलाने दोघांनी एकमेकांचा निरोप घ्यायचं ठरवलं. पुन्हा एकदा घट्ट मिठी मारुन एकमेकांना एका सुंदर आठवणीत अडकवलं.
दोघांनाही एकमेकांचा सहवास आवडला.
दोघेही एकमेकांना आवडू लागले.
दोघे ही प्रगल्भ विचारांचे. दोघांमध्ये अडचण होती ती म्हणजे-
दोघांच्या जाती वेगवेगळ्या. त्यातचं हा मुळचा छोट्या शहरातला आणि ती मात्र मुंबईची. आणि तीला मुंबईतच रहायचं होत.ं पण याला मुंबई परवडणारी नव्हती.
त्यातच त्याचे शिक्षण संपून तो नोकरी करत होता.
आणि तिचे  शिक्षण अजून बाकी होते.
तरीही दोघांनी ठरवलं, की आपणं एकमेकांवर प्रेम करतो हेच आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.
ते दोघे खूप पुढच्या विचारांचे होते.
दोघांनी ठरवंल की, एकमेकांवर जबरदस्ती करायची नाही. तु माझ्याशी लग्न करचं असं कधीच म्हणायचं नाही.
दोघांच्या घरची मान्यता असेल तरच लग्न करुयात. नाही तर एकमेकांपासून आपण दूर होऊ यात.
आपलं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे यातचं आपलं सर्वस्व  आहे. एकमेकांवर रागावून संशय घेऊन दूर होण्यापेक्षा एकमेकांच्या सुंदर आठवणी आपण विलग होऊयात असं तिने ठरवलं.
दोघांची स्वप्न एकसारंखी.
दोघांनाही पूर्ण करायची होती त्यांची स्वप्न.
दोघांनाही गाठायची होती त्यांचे ध्येय.
मग दोघांनी आणखीन एक निर्णय घेतला.
जर आपण एकमेकांच्या स्वप्नांच्या आड येऊ लागलो तर आपण स्वप्न पूर्ण करुयात. एकमेकांना सोडण्याची वेळ आली तर ते ही करुयात.
या निर्णयासोबतचं त्यांच्या पहिल्या भेटीचा दिवस संपला. मग पुन्हा दोघे हातात हात घेऊन सीएसटीकडे निघाले.
जसे आले होते तसेच... फक्त यात बदल म्हणजे येताना दोघांच्या चेह-यावर एक वेगळा आनंद होता भेटण्याचा, परंतु आता मात्र दोघांच्या डोळ्यात पाणी होते.. ते म्हणजे विरहाचे. वेगळे होण्याचे....तसेच पुढच्या भेटीच्या आनंदाचे....