Wednesday, August 22, 2012

एक अधूरी भेट ...



 Ekmat Office, Latur 

         माझी पुण्यातली नोकरी संपली होती. संपली म्हणजे तीथे मी एका वर्षाच्या प्रशिक्षणाकरिता होतो व प्रशिक्षणाचा एका वर्षाचा काळ संपल्यामुळे मला परत औरंगाबादला यावं लागलं. सुरुवातीला जेव्हा पुणे सकाळमध्ये रुजू झालो होतो तेव्हा सर्वच जणं खुश होते. मी ही नवनवीन स्वप्न रंगवायला लागलो होतो. वाटत होतं की प्रशिक्षण संपल्यावर आपल्याला इथेच कायमस्वरुपी नोकरी मिळेल परंतु तसे झाले नाही, माझी साफ निराशा झाली. परंतु या गोष्टीमुळे मी काही खचलो नाही की दुःखावलो नाही. वाटलं की आयुष्यात अजून काही तरी मोठी संधी मिळणार असेल म्हणून ही नोकरी गेली. माझा स्वतःवर आणि माझ्या नशिबावर पक्का विश्वास आहे. जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं हे भगवदगीतेमधील वाक्य मी अगदी माझ्या मनावर कोरुनच घेतलं आहे, त्यामुळे जगातील कितीही वाईट परिस्थिती आली तरी त्याचा माझ्यावर काडीमात्र फरक पडत  नाही.
        असो.. पुण्याची नोकरी सोडण्या आगोदर मी मुंबईतील प्रहार या वृत्तपत्रात मुलाखत दिली होती. तीथे माझी निवड झाल्याचे तेथील मॅनेजर व संपादकाने मला सांगितले होते परंतु तुम्हाला लगेच कामावर घेता येणार नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी बोलवायची मी वाट पहात होतो. परंतु त्यांच्याकडून कसलेच उत्तर न आल्यामुळे मला थोड वाईट वाटलं. कारण मुंबई माझ्या स्वप्नांचं शहर होतं. मी माझ्या आयुष्यात मुंबईत वास्तव्य करावं हे मला नेहमीच वाटत आलं आहे. परंतु तसा योग काही अजून आला नाही. मुंबईनंतर मी आता औरंगाबादलाच जायचं ठरवलं व तिथेच कोणत्यातरी वृत्तपत्रात आपण नोकरी करावी हेच मनात पक्क केलं. परंतु औरंगाबादला आल्यावर तीनच महिन्यात माझ्या एका सरांनी मला एका ठिकाणी नोकरी करतो का असे विचारले. मला नोकरीची आवश्यकता होतीच. परंतु मला शक्यतो पुणे qकवा मुंबईत नोकरी करायची होती. त्यामुळे मी ही त्यांनी सांगितलेल्या नोकरीबद्दल साशंक होतो. तरीही मी त्यांना होकार दिला. त्यांनी सांगितलेली नोकरी ही मराठवाड्यातील लातूर याठिकाणी एकमत या वृत्तपत्रात होती. सुरुवातीला लातूर या शहरात नको वाटले पण नंतर ही एक चांगली संधी असल्याचे जाणवले. 

       एकमत हे वृत्तपत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांचे. मला राजकारण जास्त आवडत नाही परंतु विलासराव देशमुख मला खूप आवडायचे. त्याचे कारणही काहीसे तसेच होते. मी स्वतः एक कलाकार वृत्तीचा व्यक्ती असल्याने मला कलेबाबत फार आपुलकी आहे व संपूर्ण राजकारणात फक्त विलासराव देशमुख हे एकच व्यक्तीमत्व असे होते की, त्यांना कलेबाबत फार तळमळ होती. ते स्वतः शास्त्रीय संगीत सभेस हजर असतं. नृत्य, नाट्य, सिनेमा, गायन हे सर्व त्यांची आवडती क्षेत्र. एकदा औरंगाबादला महसूल प्रबोधिनी येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आम्ही सर्व संगीत क्लासच्या विद्याथ्र्यांनी विलासरावांच्यासमोर गाणं म्हटलेलं माझ्या मनात खोलवर रुजलेलं आहे. त्यामुळे मी एकमत मध्ये नोकरी केली तर मला कधी ना कधी तरी विलासरावसाहेबांशी जवळून भेटता येईल, त्यांच्याशी संवाद साधता येईल तसेच त्यांच्या कार्यक्रमांचे फोटो काढता येईल अशी मनात कुठेतरी आशा होती. ह्या आशेपोटी मी या नोकरीस होकार दिला व लवकरच या नोकरीस रुजू झालो. 

       पुण्यातील माझा अनुभव हा वेबपत्रकारीतेशी असल्याने मला इथेही संपादकीय विभाग व वेब पत्रकारीतेची कामं होती. मी एकमतची वेबसाईट अपडेट ठेवून फेसबुक व ट्वीटरवरुन एकमतचे पेज बनवून त्यांनाही अपडेट ठेवायचे काम करायचो. या कामामागे एकमतचा वाचकवर्ग वाढवणे हा तर मुळ उद्देश होताच परंतु त्याच बरोबर साहेब भारतात अथवा जगात कुठेही असले तरी त्यांना एकमतच्या बातम्या दिसाव्यात हा उद्देश माझ्या मनात कुठेतरी लपलेला होता. परंतु माझं दुर्दैव असावं की मला हे काम कधीच करता आले नाही. 

      मी इकडे येताच काही दिवसांतच विलासराव साहेब आजारी पडल्याचे कळाले. त्यांच्या दवाखान्यातून येणाèया बातम्या तसेच त्यांच्या बद्दलच्या प्रतिक्रीया या सर्व ऐकून मनास सुन्न व्हायचे. त्यांच्या कार्यक्रमांच्या, त्यांच्या भाषणांच्या बातम्या देण्याची इच्छा बाळगणारा मी आज त्यांच्या आजारपणाची बातमी देत होतो. चेन्नई येथील दवाखान्यात त्यांना नेण्यात आल्यावर त्यांची तब्येत सुधरत असल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या. या बातम्या वेबसाईटवर देतांना मनातून खूप आनंद व्हायचा. वाटायचं की साहेब आता लवकरच ठिक होणार, आणि ऑपरेशननंतर आराम करण्यासाठी लातूरला येणार. त्यांना व्हेंटीलेटरवरुन काढल्याच्या बातमीने तर माझ्यासोबत सर्वच एकमत कर्मचाèयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आम्ही सर्वच जण आनंदात होतो. डॉक्टरांनी साहेबांचे यकृताचे प्रत्यारोपण करण्याचे सांगितल्यावर शेकडो लोकांनी आम्ही आमचे यकृत साहेबांना द्यायला तयार आहे असे फोन व ईमेल, फेसबुकवर कमेंट येत होते. साहेबांवरचे लोकांचे हे प्रेम पाहून अनेकवेळा डोळे भरुन यायचे. संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशातून साहेबांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या जायच्या. त्या सर्वांच्या बातम्या मी सर्वात आधी वेबसाईटवर टाकायचो. त्यांनी लवकर ठिक व्हावे ही खूप मनात आशा होती. एक दिवस त्यांच्या यकृत प्रत्यारोपणाची बातमी एका वृत्तवाहीनीवर दाखवली. या प्रत्यारोपणादरम्यान यकृत देणाèयाचा मृत्यू झाल्यामुळे आता नवीन दात्याचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले. ही बातमी पाहून वाटले की लवकरच साहेबांच्या ऑपरेशनची तयारी सुरु होईल. दुस़रा यकृत दान करणारा दाता मिळाला की साहेब ठीत होतील. ही गोष्ट खरंच आमच्याकरीता आनंदाची होती. साहेबांची तब्येत आता पहिलेपेक्षा चांगली असल्याचेही या वृत्तवाहीनीत सांगण्यात आले होते. त्यामुळे आम्ही सर्वजण थोडे निश्चिंत झालो होतो. 

         मला इथे येऊन एक महिना झाला होता. ऑगस्ट महिन्यात माझा इथला पहिला पगार हातात पडणार होता. १४ ऑगस्टला आम्हा सर्वांचा पगार झाला. माझे बँक अकाऊंट तयार न झाल्यामुळे मला कॅशच मिळाली. मी ही कॅश बॅकेतील माझ्या अकाऊंटला टाकण्यासाठी जायच्या तयारीत होतो. इतक्यात माझ्या मावशीचा मुलगा आला. आम्ही थोड्यावेळ बोललो व मी बँकेच्या दिशेने निघालो. माझ्या पहिल्या पगारीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. माझ्या घरी मी फोन करुन ही आनंदाची गोष्ट सांगणार होतो. परंतु बँकेत पैसे भरुन आल्यावर ही आनंदाची गोष्ट सांगावी असे वाटले म्हणून मी पहिले बँकेत गेलो... खूप रांग होती. मी रांगेत उभा राहिलो. तितक्यात मला एक फोन आला. मी थोडा गडबडीत होतो. तरीही फोन उचलला.. मावशीच्या मुलाचा फोन होता, मी हॅलो म्हणालो ... तो थोडा वेळ थांबून म्हणाला विलासराव गेले...


     माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तरीही मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. बँकेतून गाडी घेऊन थेट ऑफिसच्या दिशेने निघालो. अनेक विचार मनात येत होते. विलासरावांच्या तब्येतीबाबत आधीच अनेक अफवा परसल्या होत्या त्यामुळे ही सुध्दा अफवा असावी हेच मनात वाटत होत. गाडी एकमत ऑफिसमध्ये आणली. पटकन उतरुन ऑफिसात पळत गेलो.. तर सर्वजण टिव्हीसमोर स्तब्ध उभे होते. डोळ्यात अनेकांच्या पाणी होते. विलासरावांच्या निधनाची बातमी त्या टिव्हीवर चालू होती.


         मला काय करावं काहीच सुचेना. काहीच समजत नव्हतं. साहेबांची दुपारीच ऑपरेशन होणार अशी बातमी पाहिलेला मी आता ही बातमी ऐकून धक्काच बसला. मी टिव्हीसमोर बसलो. अनेक मित्रांचे फोन येत होते. त्यांना काय बोलावं काहीच समजत नव्हतं. थोड्यावेळाने स्वतःला सावरत मी घरी फोन लावून ही गोष्ट घरच्यांना सांगितली. माझ्या पहिल्या पगारीचा फोन घरच्यांना करायचा होता तर त्या ऐवजी ही असली दुःखाची बातमी मला घरच्यांना सांगावी लागली. घरच्यांनाही ही बातमी ऐकून धक्का बसला. कारण मागील आठ दिवसांपासून आमचं याच विषयावर बोलणं चालू होतं. विलासराव ठिक होतील अशाच गोष्टी आम्ही बोलायचो. परंतु ही गोष्ट आम्हा सर्व कुटुंबीयांसाठी एक मोठा धक्काच होती. मी पाहिलेली सर्व स्वप्न आता अधूरीच राहिली होती. त्यांची आणि माझी भेट आता कधीच शक्य नव्हती. जो एक उद्देश मनात बाळगून मी इथे आलो होतो तो उद्देशच संपला होता. साहेब आता कधीच भेटणार नव्हते. या विचारानेच मला गहिवरुन येत होते.

      साहेब नाहीत परंतु त्यांच्या या वृत्तपत्राला आता एका अशा ठिकाणी नेऊन ठेवायचं की ज्यामुळे साहेब कुठेही असतील तर तीथे त्यांना अभिमानच वाटावा. त्यांनी त्यांच्या मनात जी भावी  एकमतची कल्पना केली असेल ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण हवे ते प्रयत्न करु हाच निर्धार त्या दिवशी करुन मी पुन्हा आपल्या कामात व्यस्त झालो.