एका आईच्या भावनेचा संघर्ष, पुरूषी मानसिकेत वाढणाऱ्या समाजात वावरणाऱ्या वडीलांचा संघर्ष, बालपणातील सोनेरी क्षण हरवून वडीलांच्या हट्टापायी कुस्ती शिकणाऱ्या मुलींचा संघर्ष अशा विविध छटांमधून चित्रपट पाहाताना कोण बरोबर आणि कोण चुकीचे असे ठरवणे अवघड होऊन जाते.
वडीलांच्या नजरेतून पाहाताना वाटते की, वडील जे करत आहेत ते मुलींच्या भविष्याच्या दृष्टीने योग्यच आहे. त्यांना पुढे समाजात मान उंच करून वावरता येईल. जे करतोय त्यांच्या भल्यासाठीच करतोय, असे कदाचित एखाद्या वडिलांना वाटून जाऊ शकते.
तर आईच्या नजरेतून पाहाताना वाटते की, नवऱ्याच्या मुलासाठीच्या हट्टापायी चार वेळेस प्रसूतीच्या मरण यातना सोसलेल्या त्या बिचाऱ्या महिलेला स्वतःच्या मुलींच्या भविष्याबद्दल काहीही ठरवता येत नाही. ती उघडपणे आपल्या नवऱ्याला बोलूही शकत नाही. नवऱ्याचा शब्द तो शेवटचा शब्द अशा पुरूषी मानसिकतेत अडकलेल्या आईची ती घालमेल, पुरूषी अहंकारात वावरणाऱ्या महिलांना आपलीशी वाटू शकते.
मुलींच्या नजरेतून पाहाताना असे वाटू शकते की, आपले वडील स्वतःची स्वप्ने बळजबरीने त्यांच्या मुलींकडून पुर्ण करून घेण्यासाठी अत्यंत अमानवी प्रयत्न करत आहेत. त्या मुलींच्या खेळण्या बागडण्याच्या वयात त्यांना कुस्तीपटूंप्रमाणे अमानवी कसरत करायला लावणे हे कदाचित खटकू शकते. मनात नसताना आपल्याला मुलांप्रमाणे कपडे घालायला लावणे, केस कापणे, शाळेत त्या मुलींची टर उडवणे या गोष्टीही एखाद्या आजच्या मुलीला खटकण्यासारख्या ठरू शकतात.
केवळ चित्रपट म्हणून या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. अनेक ठिकाणी याची चर्चाही सुरू आहे. युजर्स सोशल नेटवर्कींवर या चित्रपटाबद्दल भरभरून बोलतही आहेत. मात्र त्यांना कोण योग्य आणि कोण अयोग्य असे विचारल्यास तेही थोडे विचारात पडू शकतात. कदाचित तुम्हीही याबद्दल विचार केला असेल.
ते म्हणतात ना, प्रत्येक इतिहास घडताना न कळत अनेकांचा बळी गेलेला असतो. मात्र त्यांची कुठेच चर्चा होत नाही. चर्चा होते ती फक्त यशाची. ते यश ज्याने मिळवले आहे त्याची. तो व्यक्ती कसा घडला याची. दंगलमध्येही तसेच घडले आहे. महाविर सिंगच्या स्वप्नासाठी त्या चिमुरड्या मुलींच्या बालपणाचा, त्यांच्या इच्छा, अपेक्षांचा, एका आईच्या भावनांचा बळी गेलेला प्रेक्षकांना तसूभरही आठवत नाही. लक्षात राहाते ते केवळ महाविर यांचे गोल्ड मेडल आणि गीताचे यश!



