Sunday, January 12, 2014

‘रावण’... एक अद्भूत व्यक्तिमत्व – राहुल रणसुभे

‘रावण’. जितका क्रूर तितका निष्ठावान. जेवढा भयावह, तेवढाच विद्वान, जितका निर्दयी, तितकाच पराक्रमीही. अशा एक नव्हे तर अनेक विसंगती आपल्याला रावणाबाबत सांगता येतील व ऐकायलाही मिळतील.

लहानपणी रामायणातील गोष्टी कानावर यायच्या, त्यात रावणाला अत्यंत क्रूर, विभत्स, निर्दयी असा दानव, राक्षस अशाप्रमाणे सांगितलेलं असायचं. मांडलेला असायचा मांडल जायचं. त्याने सीतेचं अपहरण केलं. तिला फसवून पळवून नेलं.. इ. परंतु त्याचबरोबर रावणाबाबत चांगलं बोलणारे किस्सेही ऐकायला मिळायच्या. जे इतर कोणत्याही राक्षसाबाबत कधीच ऐकायला मिळालं नव्हतं. तेव्हा रावणात असं काय होतं, ज्यामुळे एक राक्षस असूनसुध्दा त्याची मंदिर बांधली गेली, त्याची अनेक ठिकाणी लोकं पुजा का करतात, त्याच्याबद्दल एवढं भरभरून का बोललं जातं. अशा अनेक विचारांचा डोक्यामध्ये गोंधळ व्हायचा.

आज जेव्हा चित्रकार उमेश वाघ यांची रावणाची चित्रं पाहिली, तेव्हा या सर्व विचारांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. उमेश यांची चित्र काढण्याची पध्दत, रंग वापरण्याची शैली, व्यक्तिरेखा रेखाटण्याचा अंदाज, लयदार रेषांचा वापर हे सर्व पाहून आपलं मन न कळत त्या पुराणातील कथांमध्ये हळूवारपणे निघून जातं.

ही चित्रं पाहताना थोडी वेगळी वाटली तरी, त्यातील रंगछटा, चेहऱ्याचे हावभाव, रावणाचं व्यक्तिमत्व उमेश यांनी अतिशय उत्तमरितीने मांडण्याचा प्रयत्न केलाय. रावणाचा एक व्यक्ती म्हणून, एक राजा म्हणून, एक भाऊ म्हणून तसंच एक विद्वान पंडित म्हणून असलेली प्रतिमा चित्रकाराने आपल्या चित्रातून समर्पकपणे मांडलीये.

आपण रावणाकडे एक अत्यंत वाईट मनुष्य म्हणून जरी पाहिले तरी, त्याच्यातील अंगभूत चांगले गुणही विचारात घ्यावेच लागतात. रावणाने अनेक वर्षे सीतेला आपल्या ताब्यात ठेवूनही तीच्यावर कधीच जबरदस्ती केली नाही, की स्पर्शही केला नाही. त्यामुळे वाईटाचे प्रतिक असलेला काळा रंग आणि शांती व संयमाचे प्रतिक असलेला पांढरा रंग या दोन्ही रंगांचा उत्कृष्ट मिलाप आपल्याला या चित्रांमधून पहायला मिळतो. या दोन्ही रंगांच्या विविध रंगछटांच्या माध्यमातून रेखाटलेली रावणाची प्रतिमा आपले नकळत लक्ष वेधून घेण्यास यशस्वी ठरते.

उमेश यांच्या या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी रेखाटलेला हा ‘रावण’ अमूर्त स्वरूपातला असल्याने चित्ररसिकांना एक वेगळा प्रयोग यातून नक्कीच पहायला मिळतो. रावणी दहा तोंडं व त्याच्या दहा भावमुद्रांचा उत्तम संगम उमेश यांनी आपल्या चित्रातून रेखाटला आहे. त्यांच्या अशाच चित्रांचे प्रदर्शन येत्या १५ ते २१ जानेवारी रोजी मुंबईच्या जाहानगिर आर्ट गॅलरीत भरतयं. तुम्हालाही या चित्रांमधील एक वेगळी ‘अनुभूती’ अनुभवायची असेल तर या चित्र प्रदर्शनाला नक्कीच भेट द्या.

‘अनुभूती’ - चित्रप्रदर्शन
स्थळ – जाहानगिर आर्ट गॅलरी,
फोर्ट, मुंबई
दिनांक - १५ जानेवारी ते २१ जानेवारी २०१४

1 comment: