आज
बरोब्बर १३ वर्ष झाली.
३१ जानेवारी २०११ या दिवशी माझा इगतपूरी येथील
विपश्यनाचा १० दिवसांचा कोर्स पूर्ण झाला. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. त्या दिवसानंतर माझं पूर्ण जीवनच बदलून गेलं. विपश्यनाला जाण्याचा माझा निर्णय माझ्याआयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय होता असं मला वाटतं. कारण त्या दिवसांनंतर मी
कोणत्याच भावनेच्या आहारी गेलेलो मला तरी आठवतं नाही. कोणताही विचार, कोणतीही परिस्थिती, कोणतीही समस्या माझ्या मनाचा ताबा घेत
नाही. मी आनंदाने हूरळून जात नाही, नी मनासारखं न झाल्याने दुःखी होत नाही. कोणतीच
घटना माझ्या मनावर आघात करू शकत नाहीये. विपश्येनाला जाण्याआधी मी फार रागीट
होतो. मला कोणतीही घटना आघात करू शकत होती. मी आनंदात हूरळून जायचो आणि टेन्शन आलं
की कोलमडून जायचो. पण आता तसं काहीच माझ्यासोबत घडत नाही.
विपश्यनाला जाण्याचा मी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी मला नको जाऊस असं ही सांगितलं. १० दिवस घरच्यांना सोडून कसं राहशील. १० दिवस मौनव्रत म्हणजे कोणाशीही बोलायचं नाही हे सर्व तुला शक्य आहे का? अशा विविध गोष्टी मला सांगण्यात आल्या. पण माझा निर्णय ठाम होता. मी ऑनलाईन फॉर्म भरला आणि एकटाच इगतपूरीला गेलो. माझा वाढदिवस २३ जानेवारीला असतो. या वाढदिवसाला आपण स्वतःलाच एक विशेष गिफ्ट द्यायचं ठरवलं आणि मी विपश्यनेला गेतो. २१ जानेवारी ते ३१ जानेवारी २०११ असा हा कोर्स होता.
ते माझ्या आयुष्यातले १० दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. या १० दिवसांत मला माझ्या आयुष्यात घडलेल्या आणि माझ्या मनाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मिळाली. सोबतच ज्या गोष्टींनी मझ्या आयुष्यावर गंभीर परिणाम केला असता अशा सर्व गोष्टींतून परिस्थितीला सामोरे जाण्याचं धाडस मला या १० दिवसात मिळालं. मी स्वतःला ओळखू शकलो. माझ्या मनातील भावनांना ओळखू शकलो. या भावना मनात कशा निर्माण होतात हे मला दिसू लागलं. आपण नेहमी भूतकाळातील गोष्टी आणि भविष्याची चिंता यामध्ये गुरफटलेलो असतो. तसं न करता वर्तमानात कसं जगायचं हे मी शिकलो.
विपश्यना ही केवळ एक विद्यानसून ते आपल्या शरीराचं सर्व्हिसींग असल्याप्रमाणे आहे. गाडीला जसं सर्व्हिसींग केल्यावर गाडी नवीन असल्या सारखी भासू लागते. अगदी तसेच विपश्यना केल्यानंतर माणसाला आपला नवीन जन्म झाला आहे असं वाटायला लागतं. प्रत्येक गोष्ट नव्याने समजते. प्रत्येक गोष्ट का घडतेय याचं कारण समजतं. तुम्ही इतरांना दोष देणं बंद करतात. तुम्ही स्वतःच्या चुका शोधायला शिकता. तुम्ही भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतात. प्रत्येक क्षणाला तटस्थपणे पाहायला शिकता. इतरांवर प्रेम करायला शिकता. प्रत्येक गोष्टीत तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून पाहायला लागतो.
आयुष्यात प्रत्येकाने एकदातरी विपश्यना करायला हवी असं मी मानतो. पण कोणाला बळजबरी विपश्यनेला पाठवून त्या व्यक्तीला त्याचा उपयोग होईलच असं नाही. तुम्हाला आतून वाटायला पाहिजे आपण विपश्यना करायला हवी. तेव्हाच या विपश्यनेचा अधिक चांगला उपयोग होतो. हे माझं वैयक्तिक मत आहे.
तुमचा विपश्यनेचा काही अनुभव असेल तर नक्की सांगा मलाही तो जाणून घ्यायला आवडेल.
- राहुल अरुणाकिशन रणसुभे

No comments:
Post a Comment