Tuesday, November 4, 2025

I AM A WITCH


I am a witch
coming to you scare
come near me
if you have the dare
coming at midnight
riding on a broom
flying in the sky
lets say good bye!
- Rahul Ransubhe

Wednesday, January 31, 2024

विपश्यना आणि मी




आज बरोब्बर १३ वर्ष झाली.
३१ जानेवारी २०११ या दिवशी माझा इगतपूरी येथील विपश्यनाचा १० दिवसांचा कोर्स पूर्ण झाला. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. त्या दिवसानंतर माझं पूर्ण जीवनच बदलून गेलं. विपश्यनाला जाण्याचा माझा निर्णय माझ्याआयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय होता असं मला वाटतं. कारण त्या दिवसांनंतर मी कोणत्याच भावनेच्या आहारी गेलेलो मला तरी आठवतं नाही. कोणताही विचार, कोणतीही परिस्थिती, कोणतीही समस्या माझ्या मनाचा ताबा घेत नाही. मी आनंदाने हूरळून जात नाही, नी मनासारखं न झाल्याने दुःखी होत नाही. कोणतीच घटना माझ्या मनावर आघात करू शकत नाहीये. विपश्येनाला जाण्याआधी मी फार रागीट होतो. मला कोणतीही घटना आघात करू शकत होती. मी आनंदात हूरळून जायचो आणि टेन्शन आलं की कोलमडून जायचो. पण आता तसं काहीच माझ्यासोबत घडत नाही.

 

विपश्यनाला जाण्याचा मी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी मला नको जाऊस असं ही सांगितलं. १० दिवस घरच्यांना सोडून कसं राहशील. १० दिवस मौनव्रत म्हणजे कोणाशीही बोलायचं नाही हे सर्व तुला शक्य आहे का? अशा विविध गोष्टी मला सांगण्यात आल्या. पण माझा निर्णय ठाम होता. मी ऑनलाईन फॉर्म भरला आणि एकटाच इगतपूरीला गेलो. माझा वाढदिवस २३ जानेवारीला असतो. या वाढदिवसाला आपण स्वतःलाच एक विशेष गिफ्ट द्यायचं ठरवलं आणि मी विपश्यनेला गेतो. २१ जानेवारी ते ३१ जानेवारी २०११ असा हा कोर्स होता.

 

ते माझ्या आयुष्यातले १० दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. या १० दिवसांत मला माझ्या आयुष्यात घडलेल्या आणि माझ्या मनाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मिळाली. सोबतच ज्या गोष्टींनी मझ्या आयुष्यावर गंभीर परिणाम केला असता अशा सर्व गोष्टींतून परिस्थितीला सामोरे जाण्याचं धाडस मला या १० दिवसात मिळालं. मी स्वतःला ओळखू शकलो. माझ्या मनातील भावनांना ओळखू शकलो. या भावना मनात कशा निर्माण होतात हे मला दिसू लागलं. आपण नेहमी भूतकाळातील गोष्टी आणि भविष्याची चिंता यामध्ये गुरफटलेलो असतो. तसं न करता वर्तमानात कसं जगायचं हे मी शिकलो.

 

विपश्यना ही केवळ एक विद्यानसून ते आपल्या शरीराचं सर्व्हिसींग असल्याप्रमाणे आहे. गाडीला जसं सर्व्हिसींग केल्यावर गाडी नवीन असल्या सारखी भासू लागते. अगदी तसेच विपश्यना केल्यानंतर माणसाला आपला नवीन जन्म झाला आहे असं वाटायला लागतं. प्रत्येक गोष्ट नव्याने समजते. प्रत्येक गोष्ट का घडतेय याचं कारण समजतं. तुम्ही इतरांना दोष देणं बंद करतात. तुम्ही स्वतःच्या चुका शोधायला शिकता. तुम्ही भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतात. प्रत्येक क्षणाला तटस्थपणे पाहायला शिकता. इतरांवर प्रेम करायला शिकता. प्रत्येक गोष्टीत तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून पाहायला लागतो.

 

आयुष्यात प्रत्येकाने एकदातरी विपश्यना करायला हवी असं मी मानतो. पण कोणाला बळजबरी विपश्यनेला पाठवून त्या व्यक्तीला त्याचा उपयोग होईलच असं नाही. तुम्हाला आतून वाटायला पाहिजे आपण विपश्यना करायला हवी. तेव्हाच या विपश्यनेचा अधिक चांगला उपयोग होतो. हे माझं वैयक्तिक मत आहे.

 

तुमचा विपश्यनेचा काही अनुभव असेल तर नक्की सांगा मलाही तो जाणून घ्यायला आवडेल.

 
- राहुल अरुणाकिशन रणसुभे




 

Wednesday, August 9, 2023

वेळ काढावा लागतो, तो मिळत नाही..

१० ऑगस्ट २०११

आपल्या आयुष्यात आपल्याला खुप काही करायचं असतं, परंतु दैनंदिन जीवनाच्या धकाधकीत आणि पैसे कमवण्याच्या नादात अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. विद्यार्थी दशेत असताना आपण अनेक गोष्टी या नोकरी लागल्यावर करुयात असा विचार करतो. आपण खुप काही गोष्टी करायच्या ठरवतो आणि नोकरी लागल्यावर ज्या गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या त्याच विसरुन जातो. पुन्हा मग आपल्या भविष्याच्या चिंतेत आपला वर्तमानसुध्दा घालवतो. हे प्रत्येकाचे होत असते. परंतु आपला आज किती महत्वाचा आहे आणि आपण पाहिलेली स्वप्न आपल्यासाठी, आपल्या आनंदासाठी किती महत्त्वाची आहेत, हे आपल्याला कळतच नाही.

काल मी सलग ३ आठवड्यांच्या प्रयत्नांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट पाहिला. पुन्हा एकदा एक दर्जेदार आणि अनेक प्रश्नांची उकल करणारा चित्रपट पाहण्याचा हा योग आला. 

चित्रपट आपल्याला काय शिकवतील हे कोणीच सांगू शकत नाही. मला हा चित्रपट पहायचा होता, परंतु नेहमी काही ना काही अडचण येत होती. नंतर नंतर माझ्या सोबत कोणीही हा चित्रपट पाहण्यास तयार नव्हते… कारण सर्वांनीच हा चित्रपट पाहिला होता. अनेकांना विचारल्यानंतर शेवटी मी हा चित्रपट लॅपटॉपवर पाहायचं ठरवल. परंतु चित्रपटाच्या सुरुवातीलाच असलेल्या 'डीप सी डायव्हींग'च्या दृष्यानंतरच्या हृतीक रोशनच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहिल्या आणि लॅपटॉप बंद करुन हा चित्रपट थिएटरवरच पाहायचे ठरवले. शेवटी माझा मित्र (सागर) माझ्यासोबत येण्यास तयार झाला आणि काल रात्रीचा (९ ऑगस्ट २०११) मुहुर्त लागला. त्यानंतर पुन्हा एक अविस्मरणीय अनुभव, आणि आयुष्य जगण्याच्या कलेची एक मोठी शिदोरी मला मिळाली.

आपल्या दैनंदिन जिवनात वेळ मिळत नाही म्हणणारे अनेक लोक मिळतील, परंतु त्यांना हे माहित नाही की, वेळ कधीच मिळत नसतो तो काढावा लागतो. वेळेचे नियोजन आणि आपल्या आवडी निवडी या दोन गोष्टी खुप महत्वाच्या आहेत. आपण नुसते काम-काम आणि फक्त काम एवढेच करत असतो. मित्र मैत्रीणींचा फोन आल्यावर त्यांना वेळ नाही, खूप काम आहे, जमणार नाही अशी अनेक सबब त्यांच्या समोर मांडत असतो. परंतु असे करत असताना मला 'थ्री इडीयट्स' या चित्रपटातील एका दृष्याचे इथे उदाहरण द्यावेसे वाटते. हे संवाद अगदी अचूक आहेत असे नाही, परंतु तो मला तो सीन महत्वाचा वाटतो म्हणून त्याचं मी इथे उदाहरण देतो…

दृष्य काही असे आहे, 
जिथे त्या कॉलेजमधील एका मुलाचे सबमिशन वेळेवर पुर्ण होत नाही आणि तो मुलगा त्यांच्या प्राचार्यांना व्ही सहस्त्रबुध्दे (बोमन इराणी) यांना विनवणी करतो की, मला अजून थोडा वेळ पाहिजे. मी परिक्षानंतर दोन महिने कॉन्संट्रेशन करु शकलो नाही. तेव्हा बोमन इराणी म्हणतो की, तु दोन महिने जेवण सोडले का, अंघोळ सोडली का.. मग सबमिशनसाठी वेळ कशाला हवाय…
हा संवाद वरवर पाहिला तर अगदी साधा संवाद वाटेल, परंतु नीट विचार केला तर खरंच आपण एवढे बिझी, कामात व्यस्त, वेळ नाही असे काही इतरांना सांगत असतो. पण ते खरंच बरोबर असतं का.. खरंच आपण आपल्या कामासाठी आपल्या जेवणाचा वेळ, झोपण्याचा वेळ, दैनंदीन गरजांचा वेळ हा वापरतो का... नाही ना.. याचा अर्थ असा की आपल्याकडे वेळ असतो.. फक्त आपण तो काढत नाही..

नीट विचार केला तर आपण उगाच दाखवत असलेल्या बिझीपणामुळे आपल्या आयुष्यातील अनेक अनमोल क्षण गमावत असतो. हे क्षण कितीही पैसा मोजला तरी ते विकत घेऊ शकत नाही. अथवा वेळ गेल्यानंतर आपण कितीही वेळ या क्षणांकरीता मोजलेत तरी ते क्षण परत येत नाहीत. त्यामुळे वेळीच आपण वेळातून वेळ काढून आपल्याला जे काही करायचे आहे, जे कराव्याशा वाटतात त्या गोष्टी करायला हव्यात. कारण हे जीवन एकदाच मिळते आणि वेळ कोणासाठीच थांबत नसते. त्यामूळे प्रत्येक क्षण जगण्यातच आपल्या जीवनाचा खरा आनंद आहे.

जिंदगी ना मिलेगी.... मध्ये सुध्दा अशा अनेक प्रश्नांची उकल होते. आपण जीवनात ज्या गोष्टींना घाबरतो आणि ज्या गोष्टी आपण कधीच केल्या नाहीत, त्या करण्याचा धाडस करणे आणि जीवनातील प्रत्येक क्षण जगणे किती सुखदायी.. आनंद देणारे आहे याची अनेक उदाहरणे या चित्रपटात आहेत. आज हा चित्रपट पाहिल्यानंतर जीवन जगण्याकडे पुन्हा एकदा एका वेगळ्या दृष्टीने पाहण्याची वेळ आली आहे असे वाटते.

जाता जाता पुन्हा एका चित्रपटातील संवाद मला इथे सांगावासा वाटतो... राजेश खन्नाच्या 'आनंद' चित्रपटातील हा संवाद खुप छोटा आहे परंतु त्या संवादातून जे व्यक्त होते त्यासाठी एक कादंबरी सुध्दा कमी आहे.... तो संवाद काही असा आहे...
''जीन्दगी बडी होनी चाहीये लंबी नही''


जीन्दगी ना मिलेगी दोबारा मधील कवीता...

दिलोमें तुम अपनी बेताबीयॉ लेके चल रहे हो..
तो जीन्दा हो तुम !
नजर मे ख्वाबोंकी बिजलीयॉं लेके चल रहे हो
तो जीन्दा हो तुम !

हवा के झोंको के जैसे आझाद रहना सिखो
तुम एक दरीया के जैसे, लहरों में बहना सिखो
हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें
हल एक पल एक नया समा देखीये

जो अपनी आखोंमे हैरानिया लेके चल रहे हो
तो जीन्दा हो तुम
दिलोमें तुम अपनी बेताबीयॉ लेके चल रहे हो..
तो जीन्दा हो तुम !



Saturday, July 25, 2020

दोन रेषा आनंदाच्या


रेश्मा आणि माझ्या लग्नाला ६ वर्षे होऊन गेली. १५ डिसेंबर २०१४ ला आमचे लग्न झालं. आमचं एरेंज्ड मॅरेज. अनेक तरुण तरूणींप्रमाणे आमचीही काही स्वप्न होती. अरेंज मॅरेज असल्यामुळे एकमेकांना ओळखायला वेळ लागतोच. त्यामुळे एक वर्ष त्यासाठीच द्यायचं. मग ठरलं, एक वर्ष फॅमिली प्लॅनिंग करायचं ते. एक वर्ष मस्त मौजमस्तीत गेलं. तेव्हा मी औरंगाबादला एका वृत्तपत्रात काम करत होतो. रेश्माही छोटे मोठे जॉब करत होती. तसं मी लग्न ठरल्या ठरल्या आमच्यासाठी फ्लॅट बुक केला होता. एव्हाना त्याचे हप्तेही सुरू झाले होते. तेव्हा माझा पगार थोडाच होता. तेवढ्यातही घराचे हप्ते फेडून मी रेश्मा आणि आईबाबा असं आमच्या कुटुंबाचं व्यवस्थित चालू होतं. काही कमी जास्त लागलं तर दोन मोठे भाऊ होतेच मदतीला. त्यामुळे काहीच कमी नव्हतं. लग्नाच्या दोन वर्षांनंतर बीबीसी मराठीत येतंय असं ऐकलं आणि मग त्या ठिकाणी नोकरी लागावी यासाठी प्रयत्न सुरू झाले. 
सांगायचं झालं तर, मला जन्मल्यापासून कोणतीही गोष्ट सहजरित्या मिळाली नाही. खुप खटाटोप, वाट पाहाणे, तरसून तरसून प्रत्येक गोष्ट मिळाली आहे. मात्र जे पाहिजे ते मिळालंय हे नक्की.


"मुलं किती?" 
इथेही तसंच झालं. बीबीसीला अप्लाय केल्यानंतर एक एक परिक्षा उत्तीर्ण होत ४ महिन्यात बीबीसीतून फोन आला की तुमचं सिलेक्शन झालंय. मग काय आमच्या आनंदाला कुठे सीमाच उरली नाही. पण यात फक्त पंचायत ही होती की, नोकरी दिल्लीला होती. पण माझी तयारी होती चांगल्या नोकरीसाठी कुठेही शिफ्ट व्हायची. त्यामुळे मनाची तयारी होतीच. जून २०१७ ला बीबीसीत मी रुजू झालो. यात आनंदाची गोष्ट म्हणजे माझी पोस्टींग दिल्लीला नसून मुंबईला झाली होती. तोपर्यंत आम्हाला अजून मुल नव्हतं. कारण पगार ही थोडा होता. त्यामुळे आम्हीही त्याकडे जास्त लक्ष दिलं नव्हतं. देवाच्याच हातात म्हणून सोडून दिलं होतं सारं. झालं तर चांगलं, नाही झालं तर काही नाही. मात्र बीबीसीत रुजू झाल्यानंतर आम्ही दोघे मुंबईत आलो. मात्र इथे आम्ही दोघेच असल्याने आता वाटायला लागलं की, आपल्याला ही मुल हवं. इतके दिवस औरंगाबादेत भावाची मुलं-मुली होते सोबत. ते माझ्या आणि रेश्माच्या फार जवळ होते, त्यामुळे तिथे काही मुलाची कमी भासली नाही. मात्र मुंबईत त्याची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. तसंच ऑफिसात, फिल्डवर बातमीसाठी कुठेही गेलो तर हा उल्लेख हमखास व्हायचा... की "मुलं किती?" 
तेव्हा मग मी सांगायचो अजून झालं नाही. तर लगेचच त्या लोकांकडून फुकटचे सल्ले येण्यास सुरूवात व्हायची. 
शक्यतो मुंबईमध्ये कोणीही इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करत नाही. मात्र तुम्ही मुंबई बाहेर पडलात की मग हा प्रश्न एकदम सहज कानावर पडायचा. 

दवाखान्यात दाखवायला सुरूवात
तसं मला त्या प्रश्नाचा काही फरक पडत नव्हता. पण जस जसे वर्ष वाढत चालले होते. तेव्हा मात्र मनात कुठेतरी वाटायचं. २०१८ पासून मग माझ्या आईनेच मनावर घेऊन रेश्माला दवाखान्यात दाखवायला सुरू केले. आता रेश्माला दाखवलं तर मी कुठे सुटतोय त्यातून. मग मलाही मनात नसताना त्या दवाखान्यांचे खेटे झिजवावे लागतं. पण मी आईला वेळोवेळी स्पष्ट सांगतचं होतो की, देवाला द्यायचं असेल तर तो देईल नाही तर नाही. उगाच तुही चिंता करू नकोस आणि आम्हालाही चिंता लावू नकोस. तेव्हा ती चिडायची. रडायची. मला कळत होतं तिचं मन.. पण काय करणार या गोष्टी हातात नसतात ना..

पैशाने ही गोष्ट विकत आणता आली असती तर दुसऱ्या मिनिटाला घरात आणली असती. पण हे तसं नाही. या ठिकाणी पैसा-अडका सर्व व्यर्थ ठरतो आणि उरतं फक्त नशीब. आता नशिबात असेल तर ते मिळेल नाही तर नाही, हे माझं मत पुर्वीपासून होतं. कारण मला मिळणारी प्रत्येक गोष्ट ही फार फार उशीरा मिळाली आहे. हे तर मला माहितचं होतं. त्यामुळे माझ्या मनात हे नक्की झालं होतं की आपल्याला अपत्यप्राप्ती काही सहजासहजी मिळणार नाही. पण मिळेल अशी खात्री होती.

परंतु एक एक उदाहरण लोकांकडून ऐकायला मिळायचे तेव्हा कधी कधी मन खचून जायचं. रेश्माला डॉक्टरांनी अनेक उपचार करायला सांगितले, काही ट्रीटमेंटही होत्या... पण मी तिला त्या करू देणार नाही हे मी पक्क ठरवलं होतं. कारण माझ्या वंशाला वारस तिचं शरीर खराब करून नको होता. जे काही होईल ते नैसर्गिकपध्दतीनेच अन्यना नाही झालं तरीही चालेल असं माझं मत होतं. पुत्रसुखासाठी लोकं काहीही करू शकतात हे डॉक्टरांना चांगलंच माहित आहे. त्यामुळे काही डॉक्टरांनी हा धंदा करून ठेवलाय (काही डॉक्टर चांगलेही आहेत. मी सर्वांना दोष देत नाही.) 

"तुम्हाला कधीच मुलं होणार नाहीत"
आमच्या नात्यामधीलच एका महिलेची दोन वेळा लेप्रोस्कोपी करण्यात आली, मात्र तरीही काहीही उपयोग झाला नाही. मात्र त्या महिलेला गर्भपिशवीचा कॅन्सर झाला. परिणामी तिला अपत्यप्राप्तीशिवाय पिशवीच काढून टाकावी लागली. हे उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होतं. त्यामुळे माझा डॉक्टरांच्या उपचारांवर जास्त भरवसा नव्हता. तरीही आई आणि बायकोच्या हट्टामुळे मला हतबल व्हावंच लागत होतं. पण एक मात्र बरं होतं की, मी एखाद्या गोष्टीला नकार दिला तर त्या दोघी माझ्या शब्दाबाहेर नव्हत्या. आईने आर्युवैदिक उपचार सुरू करण्यास सांगितले. तसे आम्ही केलेही. मात्र त्याचा काही फरक जाणवला नाही. तर माझ्या मेव्हणीला पनवेलच्या एका डॉक्टरचा गुण आला होता त्यामुळे तिने आम्हाला त्या डॉक्टरची भेट घेण्यास सांगितले. आम्ही तिथे सर्व टेस्ट रिपोर्ट घेऊन गेलो. रिपोर्ट पाहून ती डॉक्चर म्हणाली की आता खूप उशीर झाला आहे. तुमची ट्रीटमेंट माझ्याकडे होणार नाही. तुम्ही ताबडतोब कुर्ल्यातील या ठिकाणी भेट द्या असं सांगत त्या डॉक्टरने आम्हाला एका IVF सेंटरचा पत्ता दिला.  तसंच सांगितलं की, "जर तुम्ही लवकरात लवकर हे उपचार घेतले नाही तर तुम्हाला कधीच मुलं होणार नाहीत."

...पण १०० टक्के गॅरंटी देऊ शकत नाही
हे ऐकल्यावर आमच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आम्ही दुसऱ्याच दिवशी त्या IVF सेंटरला गेलो. तिथे पाहिलं तर एखाद्या हॉटेलला लाजवेल अशी सजावट होती. अनेक जोडपी तिथे रांगेत त्यांचा नंबर कधी येतो याची वाट पाहात होती. तर काही जोडपी त्यांच्या बाळांसोबत आली होती. हे पाहून आम्हालाही आनंद झाला. त्या दवाखान्याच्या भिंतीवर एक स्क्रीन लावण्यात आली होती आणि त्यावर त्यांच्या सेंटरमार्फत उपचार घेतल्यानंतर किती बाळांनी जन्म घेतला याची आकडेवारी होती. ही आकडेवारी काही हजारांमध्ये होती. हे पाहून माझा आत्मविश्वास वाढला. आमचा नंबर आला. तेव्हा डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या आणि काही टेस्ट बाहेरून करून आणण्यास सांगितले. तसेच ते म्हणाले जर IVF टेस्ट फेल गेली तर आपल्याला पुन्हा IVF टेस्ट करावी लागेल. जर ती सुद्धा फेल गेली तर आपल्याकडे टेस्टट्यूब बेबीचा पर्याय आहेच.. असं ती सांगत होती. पण प्रत्येक IVF टेस्टचा खर्च वेगळा. एका टेस्टसाठी किमान दीड ते दोन लाख रुपये लागणार होते. पण जर अपत्यसुख मिळणार असेल तर ही रक्कम काही जास्त नव्हती.  पण मग जेव्हा मी त्यांना मुल होईल का याची १०० टक्के गॅरंटी आहे का?  तर तेव्हा  त्या डॉक्टरने सांगितलं की, आम्ही आमचे सर्व प्रयत्न करणार पण १०० टक्के गॅरंटी देऊ शकत नाही. ते देवाच्या हातात आहे. 

शरीराची जी हानी होईल ती वेगळीच.. 
तिथून बाहेर आल्यावर अनेक प्रश्न डोक्यात घर करायला लागले. एवढे पैसे घालून जरी गॅरंटी नाही तर हे करायचंच कशाला. कारण आपण मध्यमवर्गीय लोकांससाठी ही रक्कम काही छोटी नाही. शिवाय रेश्माच्या शरीराची जी हानी होईल ती वेगळीच.. 
पण बायकोला वाटायला नको की मी पैशाकडे पाहातोय.. म्हणून मी होकार दिला. मात्र लगेचच टेस्ट करायची नाही. घरच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्यायचा ठरवलं. त्यानंतर काही दिवसांनी औरंगाबादला गेल्यावर आईला मी हे सांगितलं. माझ्या मावशीच्याच नातीनेही IVF टेस्ट केली मात्र ती फेल झाल्याचं तिनं मला सांगितलं. तेव्हा मग माझं मन पुन्हा विचलीत झालं. 
मग तो उपाय आम्ही करायचा सोडून दिला. तेही वर्ष तसंच गेलं.

लग्नाच्या पाच वर्षांनंंतर...
आता २०१९ वर्षही संपत आलं होतं. लग्नाला आता पाच वर्ष पुर्ण होत होती तशी चिंताही वाढत होती. माझ्या मेव्हणीने रेश्माला एका डॉक्चरांचा पत्ता दिला. ते वजन कमी करण्याची ट्रिटमेंट सांगतात असे सांगितले. त्यांच्या उपचाराचा  सकात्मक फायदा माझ्या मेव्हणीला झाला होता. तेव्हा रेश्माने त्या डॉक्टरकडे जाण्याचा हट्ट धरला. बायकोचा हट्ट मग तिकडेही जायचं ठरलं. ते डॉक्टर मिरारोडला राहात होते आणि आम्ही बदलापूरला..

सुटीचा एक दिवस काढून सकाळी लवकरच आम्ही मिरारोडला जायला निघालो. त्या डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी काही चुर्ण, काही गोळ्या आणि काही पथ्य करण्यास माझ्या पत्नीला सांगितले. त्यानंतर रेश्मासुद्धा त्या डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायांप्रमाणे डाएट फॉलो करायला लागली. तिने एका महिन्यात ६ किलो वजन कमी केले.त्यानंतर ते पथ्य पाळणं तिलाही जड जायला लागले. तिने पथ्य पाळणे सोडून दिले मात्र वजन कमी करायचा तिचा प्रयत्न सुरू होता. तोपर्यंत २०२० लागला होता. लग्नाला आता पाच वर्ष पुर्ण झाली होती. मी आता ठरवले होते की आपण एकदा का होईना आपण IVF चा पर्याय निवडायचा. भविष्यात असं नको वाटायला की, आपण हा पर्याय वापरला असता तर यश मिळाले असते.. त्यामुळे मी रेश्माच्या मनाचीही तयारी करायला लावत होतो. मात्र हा मार्चमध्ये कोरोना आला आणि सर्वकाही फिसकटलं. लॉकडाऊनमध्ये तर मी वर्क फ्रॉम होम करत होतो. त्यामुळे आम्ही दोघेही घरीच बसून होतो. खायचं, काम करायचं आणि झोपायचं हेच काम सुरू होतं. त्यामुळे वजन वाढणं सहाजिकच होतं. मार्च -एप्रिल असाच गेला. मात्र एप्रिलच्या शेवटी मला औरंगाबादला काही बातम्यांसाठी जावं लागलं तेव्हा आम्ही दोघे तिकडे गेेलो. दोन महिने माझ्या भावाच्या मुला-मुलींसोबत रेश्माने आणि मी खुप वेळ घालवला. कुटुंबासमवेत वेळ घालवला. वर्क फ्रॉम होम तिथेही सुरूच होतं. मात्र आमचा  विकेंड धमाल असायचा. जुलैच्या सुरूवातीला आम्ही परत मुंबईत आलो. तितक्यात आईचा मला फोन आला की, इकडे खुल्दाबाद येथे एक बाबा आहे त्याचा अनेकांना गुण आलाय. तुम्ही परत या आणि आपण त्या बाबाला जाऊन भेटूयात.. तेव्हा मी तिला रागावलो.. हे बूवाबाजी मला पसंद नाही. मी नाही येणार.. तिनेही रागात फोन ठेवला.. दिवस असेच गेले.

त्या दोन रेषा आनंदाच्या
जसा ऑगस्ट महिना लागला तसं तसं वाटायला लागलं की, या महिन्यात आपली इच्छा पुर्ण होणार.. मी याबद्दल रेश्मालाही वेळोवेळी सांगत होतो की, मला असं वाटतंय की हा महिना आपल्यासाठी सकारात्मक असेल आणि शेवटी तसंच झालं. २४ ऑगस्टलला रेश्माने मला प्रेग्नसी किट आणायला सांगितलं. मात्र तिने जेव्हा चेक केलं तेव्हा त्यावर कसल्याल रेषा आल्या नव्हत्या. आम्हा दोघांना टेन्शन आलं. ती जेव्हा ते कीट डस्टबीनमध्ये टाकायला निघाली, तेव्हा मी तिला थांबवलं आणि ते कीट तसंच ठेवायला सांगितलं. तो दिवस निराशेचाच होता आमच्यासाठी. दुसऱ्यादिवशी माझी सकाळची शिफ्ट असल्याने मी लवकर उठलो आणि अंघोळीसाठी गेलो तेव्हा त्या किटवर अगदी फिकट अशा दोन रेषा उमटल्याचं दिसलं. मी जोरात रेश्मा असा तिला आवाज दिला. तिनेही जेव्हा ते कीट पाहिलं तर तिलासुद्धा आनंद झाला. पण मग मी त्या प्रेग्नंसी किटवरील सुचना वाचल्या तेव्हा तिथे स्पष्ट लिहिले होते की, "सिर्फ पाच मिनट के अंदर परिणाम देखे और किट को नष्ट करें.." तेव्हा मनाची धाकधूक अजूनच वाढली. दोघांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन स्पष्टपणे जाणवत होतं. मग ठरवलं की पुन्हा एकदा किट आणून चेक करायचं. मी सकाळीच मेडिकलमध्ये गेलो. पण एवढ्या सकाळी मेडिकल कुठे उघडे असतात.. तेव्हा मेडिकलच्या शोधात पुढे पुढे जात होतो. तेव्हा एक मेडिकल नुकतंच उघडलं होतं. त्याच्याकडून ते किट घेतलं आणि घरी आलो. रेश्माला पुन्हा चेक करायला सांगितलं आणि अखेर त्या किटवर दोन्ही रेषा स्पष्ट उमटल्या होत्या... तेव्हा जो आम्हाला आनंद झाला तो शब्दात न मांडता येण्यासारखा आहे. 

Wednesday, July 15, 2015

भव्य सेट असलेला अर्धवट 'बाहुबली' (दिव्य मराठी ब्लॉग)


अभिनय उत्कृष्ट, ग्राफीक्स उत्कृष्ट, वेशभुषा उत्कृष्ट, चित्रिकरण उत्कृष्ट, प्रमोशन उत्कृष्ट, मात्र कथानक... कमी दर्जाचे..
'बाहुबली' हा चित्रपट एकाच भागात संपायला हवा होता आणि जर दोन भाग करायचेच होते तर, पहिल्या भागाच्या शेवटावर चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी अधिक विचार करायला हवा होता. सध्याचा चित्रपट एखाद्या डेलीसोप सिरियल प्रमाणेच भासतो... म्हणजे प्रेक्षकांची उत्सूकता शिगेला न्यायची आणि मध्येच To be Continue! असे सांगायचे. त्यासाठी प्रेक्षकांना मग दुसर्‍या दिवशी अथवा दुसर्‍या आठवड्यात ती सिरियल पाहायला भाग पाडायचे. मात्र एक दिवस अथवा एक आठवडा भारतीय प्रेक्षकांना अंगवळणी पडलंय. मात्र तब्बल १ वर्ष थांबायचे म्हणजे जरा जास्तच होतं.

हॅरी पॉटर या चित्रपटाचे ८ भाग निघाले. मात्र प्रेक्षक सिनेमागृहातून कधीच असंतुष्ट होऊन बाहेर पडला नाही. त्यांनी प्रत्येक चित्रपटाचा शेवट अगदी योग्य पध्दतीने आखला होता. विशेष म्हणजे एकाच कादंबरीचे आठ भाग असूनसुध्दा कोणताच भाग प्रेक्षकांना अर्धवट वाटत नाही. मात्र बाहूबली हा काल्पनिक कथेवर आधारित चित्रपट असूनही तो प्रेक्षकांना निराश करतो.

मुळात ही निराशाही दिग्दर्शकांनीच केलेली आहे. कारण चित्रपटाचे प्रमोशन, त्यासंदर्भातील बातम्या, भारतातील सर्वात जास्त बजेट असलेला चित्रपट, सर्वात मोठा सेट अशा अनेक बाबी प्रेक्षकांच्या मनावर बिंबवून दिग्दर्शकांनी या चित्रपटाची प्रचंड उत्सूकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली होती. मात्र ही प्रेक्षकांची उत्कंठा टिकवून धरण्यास दिग्दर्शक कुठेतरी कमी पडले आहेत. अथवा त्यांचा अंदाज चुकला आहे. त्यामुळेच अनेकांनी चित्रपटाला केवळ ३.५ स्टार दिले आहे.

एक गोष्ट मात्र खरी आहे, ज्यांनी हिंदीतील 'मुघल-ए-आझम', 'जोधा अकबर', टॉलिवूडचा 'मगधिरा', हॉलिवूडचा 'ट्रॉय', 'ग्लॅडिएटर' आणि '३००' हे चित्रपट पाहिले नाहीत त्यांना हा चित्रपट आवडू शकतो. पण त्यांचीसुध्दा या चित्रपटाची पटकथा निराशा करेल. मात्र ज्यांनी हे इतर चित्रपट पाहिले आहेत. त्यांची मात्र घोर निराशाच होईल हे मात्र नक्की!

Monday, April 27, 2015

BLOG: 'सल मनातली' - खरंच आपण बाबांसोबत असं वागायला नको होतं!

अनेक दिवसांपासून इच्छा होती की एखादी चांगली नोकरी असावी आणि एक चांगला स्मार्टफोन असावा. शेवटी मुंबईला चांगल्या पगाराची नोकरी लागली आणि स्वप्न पुर्ण झाले. विशेष म्हणजे मी घेतलेल्या HTC च्या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा खुपच छान होता. मला फोटोग्रापीची आवड होतीच. त्यामुळे मी त्याच्याने खुप फोटो काढले. मनसोक्त फोटो काढले. मला भेटायला माझे आईबाबा मुंबईला आले होते, तेव्हा त्यांना 'एलिफंटा' दाखवायला घेऊन गेलो, त्यावेळीसुध्दा याच मोबाईलने त्यांचे भरपूर फोटो काढले. त्या फोटोतील अनेक आठवणी मनात अजून ताज्या आहेत. सोबत अनेक आठवणी त्या मोबाईलशी नकळत जोडल्या गेल्या. नंतर मुंबईची नोकरी सुटली आणि पुन्हा औरंगाबादला परतलो. औरंगाबादला परतल्यावर काही दिवसातच तो मोबाईल खराब झाला. अनेक ठिकाणी रिपेअरींगसाठी दाखवून सुध्दा तो रिपेअर होऊ शकला नाही. त्या मोबाईलची बॅटरी फुगली होती. त्यामुळे बॅटरीचा प्रॉब्लेम असेल म्हणून 650 रुपयांची नवीन बॅटरी मी दिल्लीवरून मागवली. ८ -१५ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर ती बॅटरी आली. आता वाटले मोबाईल सुरू होईल. मात्र बॅटरी लावून सुध्दा मोबाईल सुरू झाला नाही. त्यानंतर मी एका दुकानात मोबाईल रिपेअरिंगसाठी दिला. तेथे कळाले की मदरबोर्डमध्ये खराबी होती. विशेष म्हणजे जेथे मी हा मोबाईल रिपेअरिंगसाठी दिला होता त्या व्यक्तीने सांगितले की, या सिरिजच्या अनेक स्मार्टफोनमध्ये सेम असाच प्रॉब्लेम असल्याचे कळावे. ऐकून दुःखच झाले. मात्र मी ठरवले की, दुसरा मोबाईल मी घेणार नाही आणि हा असाच जपून ठेवणार. त्यानंतर अनेक दिवस मी माझा जुनाच की पॅडचा मोबाईल वापरत राहिलो. तो HTC चा मोबाईल घरात जपून ठेवला. जेव्हा जेव्हा तो नजरेस पडायचा तेव्हा थोडे दुःख व्हायचे, तसेच मी घेतलेला पहिला महागडा स्मार्टफोन म्हणून थोडे बरेही वाटायचे. तो मोबाईल 17000 रुपयांचा होता आणि माझ्या आयुष्यात एवढी मोठी इनव्हेंस्टमेंट मी फार कमी वस्तूंसाठी केली होती. त्यापैकीच तो एक.

माझे लग्न ठरले. होणाऱ्या पत्नीला मी एक चांगला स्मार्टफोन गिफ्ट केला. व्हॉट्सअप, फेसबुक यावर ती चांगलीच अॅक्टीव्ह झाली. मात्र माझ्याकडे साधा मोबाईल असल्याने ती नाराजही होती. तीला माझ्याशी चॅटींग करता येत नव्हते. अनेक वेळा तीने इच्छा बोलून दाखवल्यावर मीसुध्दा नवीन मोबाईल घेतला. या दरम्यान माझ्या मोठ्या भावाने वडीलांना एक MP3 किपॅडचा मायक्रोमॅक्सचा मोबाईल घेऊन दिला. त्यावर ते नेहमी गाणे ऐकत असायचे. त्यांना तो मोबाईलही खुप आवडला होता. ते नेहमी गाणे लावून सकाळी फिरायला जात. मात्र अनेक दिवस आवडीने वापरल्यानंतर त्यांच्याही मोबाईलला प्रॉब्लेम येऊ लागला. त्यांच्या मोबाईलवर कॉलच येत नव्हता. त्यामुळे त्यांची फार घालमेल होत होती. त्यांना दुसरा मोबाईल दिला आम्ही वापरायला मात्र त्यांना त्यांच्या जुन्या मोबाईलशिवाय करमत नव्हते. हीच त्यांची घालमेलपाहून आम्ही त्यांना नवा XIAOMI RED MI 2 हा  नवा स्मार्टफोन गिफ्ट केला. तो त्यांना खुप आवडला. तोपर्यंत माझे लग्न झाले होते. त्यामुळे आमच्या घरात सर्वांकडेच स्मार्टफोन होते. केवळ आई आणि बाबाच बाकी होते. त्यातही बाबांना मोबाईल घेतल्यामुळे ती कमीसुध्दा पुर्ण झाली, तर आईला असला मोबाईल आवडत नव्हता. नवीन मोबाईल आल्यामुळे बाबा चांगलेच खुष होते. तरीही त्यांना त्यांचा जुना मोबाईल ठिक व्हावा अशी इच्छा होती. त्यांनी मला ती अनेकदा बोलूनही दाखवली. मात्र माझ्या आळशीपणामुळे मी त्यांना नेहमी टाळाटाळ करत राहिलो. शेवटी त्यांनीच त्यांच्या एका मित्राच्या मुलाच्या मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात तो मोबाईल दाखवला. तेथे त्यांना कळाले की, याच्या सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम आहे. ते मोबाईल माझ्याकडे घेऊन आले आणि त्यांनी सांगितले तु जिथे मोबाईल रिपेअरिंगला टाकला होता, तेथे माझासुध्दा मोबाईल रिपेअरींगला टाक. सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे. अनेक वेळा पाठीमागे लागल्यानंतर मी त्यांचा मोबाईल रिपेअरिंगला टाकला. बाबांना आल्यावर सांगितले की, मोबाईल रिपेअरिंगला टाकला आहे आणि त्याला 150 रुपये खर्च येईल. बाबा म्हणाले, फक्त दिडशे रुपये, चांगले आहे. कधी देणार आहे तो मोबाईल असे त्यांनी विचारले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
माझ्या कामाच्या गडबडीत मला तो मोबाईल आणायचे लक्षातच राहिले नाही. दोन दिवस झाले तो मोबाईल काही ना काही अडचणींमुळे आणायचे राहिलेच. या दरम्यान एका दिवशी मी ऑफिसमध्ये असताना आईचा फोन आला.
ती म्हणाली, "तुझा जुना मोबाईल जो बंद पडला होता, तो बाबांनी 200 रुपयांना भंगारवाल्याला विकला."
हे ऐकताच मला मोठा धक्का बसला. मला फार वाईट वाटले. मला काय बोलावे कळत नव्हते. मी आईला ओरडलो. मात्र फार उशीर झाला.
भावाने आईकडून फोन घेत सांगितले की, "जाऊ दे आता कोणावर ओरडू नकोस. विषय सोडून दे."
मी फोन ठेवला.
पुन्हा ऑफिसात कामाला लागलो. मात्र, कामात मन लागत नव्हतं. राहून राहून तोच विषय मनात खदखदत होता. ऑफिसमधून घरी गेलो. वडीलांशी जास्त बोललोच नाही. कारण मला माहिती होते, मी जर बोललो तर काही तरी उलटे सुलटे बोलून बसेन. म्हणून मी शांतच होतो. रात्री जेवलो आणि झोपलो. मात्र झोप लागत नव्हती. सारखा सारखा तोच विषय मनात खदखदत होता. कशी तरी झोप लागली. सकाळी उठलो आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार झालो. तितक्यात बाबा म्हणाले, "अरे तो मोबाईल रिपेअरिंगला टाकला होता, तो कधी आणणार!"
तितक्यात आई म्हणाली, अहो त्याचा मोबाईल विकल्याने तो अपसेट झाला आहे.
हे ऐकताच माझा बांध तुटला आणि मी बडबडायला लागलो. बाबांना रागाच्या भरात काही वाही बोललो. तुम्हाला कळतयं की नाही.  "तो मोबाईल नाही, तर माझी आठवण आहे." असे नाही नाही ते बरेच बोललो आणि ऑफिसला निघून गेलो.
ऑफिसला जाताना मनाला प्रश्न विचारले की, आपण आज जे काही केले ते बरोबर होते का?
उत्तर 'नाही' असे मिळाले . आपण चुकीचेच वागलो आहे हे पटायला लागले.
तेव्हा एकदम आठवले की, लहानपणी बाबांनी अत्यंत आवडीने अनेक वस्तू घरात आणल्या होत्या. त्यापैकी अनेक वस्तू आम्ही तोडल्या होत्या, काही हरवल्या होत्या. त्यावेळी त्यांना राग आलाही असेल, मात्र ते आमच्या हातून घडले असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्षच केले होते. त्यांनी अत्यंत आवडीने आणलेली लोलक असलेल्या घड्याळीची काच मी आणि माझ्या भावाने घरात बॉल खेळताना फोडली होती. त्यावेळी आम्ही फार घाबरलो होतो. बाबा नोकरीवरून घरी आले. त्यांनी ते पाहिले मात्र ते आम्हाला काहीच म्हणाले नाही. त्यांनी त्या काचेच्या ठिकाणी एक मेनकापड (प्लास्टीक) लावले आणि पुन्हा ती घड्याळ सुरू केली. अशा अनेक आठवणी मनात तरळू लागल्या. मन गहिवरून आले. हे सर्व मनात सुरू असताना ऑफिस कधी आले कळालेच नाही.
ऑफिसला गेलो. काम करण्यास सुरूवात केली. तितक्यात आईचा फोन आला.
ती म्हणाली  "बाबा सकाळीच त्या भंगारवाल्याला शोधायला गेलेत. काहीच खाल्लं नाही त्यांनी. तु बाहेर पडलास, त्यानंतर ते लगेच बाहेर पडले. त्यांना त्या भंगारवाल्याचे दुकानही कोठे आहे माहित नाही."
मला काय बोलावे ते कळतच नव्हते. मी फोन ठेवला आणि तसाच कामाला लागलो. राहुन राहुन मनाला फार खात होतो. सारखे साऱखे आपल्या चुकीची जाणीव होत होती. पण आता फार उशीर झाला होता. त्यानंतर दुपारी आईचा पुन्हा फोन आला.
ती म्हणाली "बाबांनी त्या भंगारवाल्याकडून तो मोबाईल परत आणला."
मी म्हणालो कसं काय? मग ती सांगायला लागली.
"तु ऑफिसला गेल्यावर बाबा सकाळीच घराबाहेर पडले. नाश्ताही केला नाही. तसेच उन्हात गेले. नतंर दुपारी घरी आले. मी विचारलं त्यांना कुठे गेला होतात. तेव्हा म्हणाले त्या भंगार वाल्याला शोधायला गेलो होतो. त्यानंतर मी त्यांना त्याच्या दुकानाचा पत्ता सांगितला. तेव्हा ते लगेचच त्या दुकानाकडे गेले. तिथेच उन्हात दीड दोन तास वाट पाहिल्यानंतर तो भंगारवाला आला आणि त्यांनी विनंती करून मोबाईल परत आणला."
आई बोलत होती, मात्र मला काय बोलावे ते कळतच नव्हते. खुप वाईट वाटले आणि फोन मिळाल्याच्या आनंदपेक्षा बाबांना बोलल्याचे दुःख मनात जास्त सलत होते. संध्याकाळी ऑफिसवरून घरी जाताना बाबांचा रिपेअरींगला टाकलेला मोबाईल घेतला आणि घरी गेलो. बाबांना त्यांचा मोबाईल दिला. त्यांना तो मोबाईल सुरू झाल्याचे पाहून आनंद झाला, पण मला आतून फार वाईट वाटत होते. थोड्या वेळाने आईने मला माझा मोबाईल परत केला.
ती म्हणाली हाच,  "आहे ना तो... नीट बघून घे."
मला तर काहीच बोलावेसे वाटत नव्हते. मी तो मोबाईल घेतला आणि माझ्या कपाटात ठेवला.

त्या दिवशी मनाला प्रश्न पडला. आपण खरंच असं का वागलो?
बाबांनी तो मोबाईल कदाचित त्यांच्या मोबाईलला लागणारे 150 रुपये घरातील पडीक सामानातून जमवण्याचा तर प्रयत्न केला नसेल.
त्यांना आपण बोलल्यावर काय वाटले असेल?
त्यांच्या मनात असा विचार आला असेल का?, की याच मुलानी माझ्या कित्येक आवडीच्या गोष्टी तोडल्या, फोडल्या तेव्हा मी काहीही म्हणालो नाही, मात्र आता याची एक बंद पडलेली गोष्ट विकली तर तो किती बोलतोय?
अथवा ते मनातल्या मनात स्वतःला खात होते, की आपण तो मोबाईल विकायला नको होता..
अशा एक ना शंभर प्रश्नांनी मनात गर्दी केली.

Friday, January 24, 2014

आई-मुलींच्या भावनांची 'दंगल'



काल 'दंगल' हा चित्रपट पाहिला. एक प्रेक्षक म्हणून हा चित्रपट खुपच छान आहे. वेळोवेळी चित्रपटात उत्कंठा वाढवणारे दृष्य आहेत. काही दृष्य हृदयाचा ठाव घेतात, काही अंगावर शहारे आणतात तर काही डोळ्यात पाणीही आणतात. एकंदर काय तर फुल्ल टू पैसा वसूल चित्रपट. परंतु या चित्रपटाची एवढीच व्याख्या करणे चुकीचे आहे. मुळात हा चित्रपट केवळ प्रेक्षकांच्या नजरेतून पाहाणेच चुकीचे आहे. या चित्रपटाला अनेक अँगलमधून पाहाता येईल. म्हणजेच वडीलांच्या नजरेतून, एका जिद्दी नवऱ्याच्या बायकोच्या नजरेतून, दोन मुलींच्या आईच्या नजरेतून तसेच आपल्या खेळण्या बागडण्याच्या वयात स्वातंत्र्य हरवून बसलेल्या मुलींच्या नजरेतून हा चित्रपट पाहिल्यास या चित्रपटातील वेगवेगळ्या छटा आपल्याला जाणवायला लागतील. 


एका आईच्या भावनेचा संघर्ष, पुरूषी मानसिकेत वाढणाऱ्या समाजात वावरणाऱ्या वडीलांचा संघर्ष, बालपणातील सोनेरी क्षण हरवून वडीलांच्या हट्टापायी कुस्ती शिकणाऱ्या मुलींचा संघर्ष अशा विविध छटांमधून चित्रपट पाहाताना कोण बरोबर आणि कोण चुकीचे असे ठरवणे अवघड होऊन जाते. 

वडीलांच्या नजरेतून पाहाताना वाटते की, वडील जे करत आहेत ते मुलींच्या भविष्याच्या दृष्टीने योग्यच आहे. त्यांना पुढे समाजात मान उंच करून वावरता येईल. जे करतोय त्यांच्या भल्यासाठीच करतोय, असे कदाचित एखाद्या वडिलांना वाटून जाऊ शकते. 

तर आईच्या नजरेतून पाहाताना वाटते की, नवऱ्याच्या मुलासाठीच्या हट्टापायी चार वेळेस प्रसूतीच्या मरण यातना सोसलेल्या त्या बिचाऱ्या महिलेला स्वतःच्या मुलींच्या भविष्याबद्दल काहीही ठरवता येत नाही. ती उघडपणे आपल्या नवऱ्याला बोलूही शकत नाही. नवऱ्याचा शब्द तो शेवटचा शब्द अशा पुरूषी मानसिकतेत अडकलेल्या आईची ती घालमेल, पुरूषी अहंकारात वावरणाऱ्या महिलांना आपलीशी वाटू शकते. 

मुलींच्या नजरेतून पाहाताना असे वाटू शकते की, आपले वडील स्वतःची स्वप्ने बळजबरीने त्यांच्या मुलींकडून पुर्ण करून घेण्यासाठी अत्यंत अमानवी प्रयत्न करत आहेत. त्या मुलींच्या खेळण्या बागडण्याच्या वयात त्यांना कुस्तीपटूंप्रमाणे अमानवी कसरत करायला लावणे हे कदाचित खटकू शकते. मनात नसताना आपल्याला मुलांप्रमाणे कपडे घालायला लावणे, केस कापणे, शाळेत त्या मुलींची टर उडवणे या गोष्टीही एखाद्या आजच्या मुलीला खटकण्यासारख्या ठरू शकतात. 

केवळ चित्रपट म्हणून या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. अनेक ठिकाणी याची चर्चाही सुरू आहे. युजर्स सोशल नेटवर्कींवर या चित्रपटाबद्दल भरभरून बोलतही आहेत. मात्र त्यांना कोण योग्य आणि कोण अयोग्य असे विचारल्यास तेही थोडे विचारात पडू शकतात. कदाचित तुम्हीही याबद्दल विचार केला असेल. 

ते म्हणतात ना, प्रत्येक इतिहास घडताना न कळत अनेकांचा बळी गेलेला असतो. मात्र त्यांची कुठेच चर्चा होत नाही. चर्चा होते ती फक्त यशाची. ते यश ज्याने मिळवले आहे त्याची. तो व्यक्ती कसा घडला याची. दंगलमध्येही तसेच घडले आहे. महाविर सिंगच्या स्वप्नासाठी त्या चिमुरड्या मुलींच्या बालपणाचा, त्यांच्या इच्छा, अपेक्षांचा, एका आईच्या भावनांचा बळी गेलेला प्रेक्षकांना तसूभरही आठवत नाही. लक्षात राहाते ते केवळ महाविर यांचे गोल्ड मेडल आणि गीताचे यश!