Tuesday, November 8, 2011

प्रेम फक्त प्रेम


०७ नोव्हेंबर २०११

काल मला एक मेसेज आला. तुझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणता असा प्रश्न त्या मेसेज मधून करण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर काय द्यावे हेच कळत नव्हते. कारण माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय व्हावा अशाच पध्दतीने मी प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करतो आणि हेच उत्तर मी त्या मेसेजला रिप्लाय म्हणून पाठवले.

काही क्षणातच मला एक क्षण आठवला जो की मी कधीच विसरु शकणार नाही आणि त्या क्षणामुळे मला जीवनातील एक मोठे सत्य अनुभवायला मिळाले होते.

मी बेंगळूरला नोकरीसाठी होतो. नोकरी लागून नुकतेच १५ दिवस झाले असावे. जन्मल्यापासून मी घरच्यांपासून पहिल्यांदाच इतक्या लांब आलो होतो आणि नोकरी म्हणजे मी आता कायमचाच लांब होणार. त्यामुळे त्या गोष्टीची सल मनात कुठे तरी होती. १५ डिसेंबरला नोकरी लागली होती आणि ३० डिसेंबरला माझ्या घरील सर्वजण तिरुपतीला जाणार होते. त्यामुळे त्यांनी मला फोन करुन सांगितले की, तु ३० तारखेला तिरुपतीला भेट. बंगळूरवरून तिरुपती जवळपास ८ तासाचे अंतर. मी २९ ला रात्री तिरुपतीसाठी निघालो. आई-वडील भाऊ हे सर्वजण मला तिरुपतीच्या बसस्टॅंडवरच भेटणार होते. मी त्यांना भेटणार असल्यामुळे मनात एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होता. पहाटे ४ च्या सुमारास मी तिरुपतीला पोहचलो. आई-वडीलांना येण्यास थोडा उशीर होणार होता. मी तिथेच बसस्थानकावर वाट पहायचे ठरवले. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे थंडी कडाडून होती. मी तसाच स्वेचर अंगाला लपटून एका खुर्चीवर बसलो होतो. डोळे लागत होते. परंतु सामान कोणी घेऊन जाईल म्हणुन मी हडबडून जागा व्हायचो. वाट बघत, डूळक्या लागत दीड तास गेला. मी त्यांची वाट पाहून थकलो होतो. मी त्या स्थानकातून बाहेर पडण्याचे ठरवले आणि समोर असलेल्या मुख्या रस्त्यावर आलो आणि तेथे उभारुन त्यांची वाट पहायला लागलो. ते सर्व टाटा सुमो मध्ये येणार होते. सुमो आमचीच असल्यामुळे मला सर्व माहित होते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीकडे मी निरखून पाहत होतो. अंधार असल्यामुळे गाड्यांचे फक्त लाईटच दिसत होते त्यामुळे जो पर्यंत गाडी जवळ येत नाही तो पर्यंत काही कळत नव्हते. जवळपास अर्धा तास झाला असावा. मला मागून कोणी तरी आवाज दिला. मी मागे वळून पाहतो तर एक सुमो येऊन थांबली होती. मी निरखून पाहत होतो कोणाची आहे ती सुमो याकडे. तितक्यात गाडीतून कोणीतरी उतरले. ती माझी आईच होती. तिला पाहिल्यावर काहीच न कळता डोळ्यातून पाणी यायला सुरु झाले. ती सुध्दा रडतच माझ्याजवळ येत होती आणि मी सुध्दा रडतच तिच्याजवळ गेलो. नंतर जवळपास अर्धातास हे रडण काही थांबलं नाही. एक शब्द सुध्दा बोलता येत नव्हते. मी गाडीत बसलो आणि पुढे तिरुमलासाठी निघालो. तिरुमलासाठी जात असताना एक लहानपणीची गोष्ट आठवली....

मी लहान असताना आम्ही मामाच्या गावाला जायचो. आम्हाला परत येताना मामा, मावशी, आजी सर्वच जण सोडायला यायचे. आमची गाडी सुरु होताच आजी, मावशी आणि माझी आई एकसारखं रडायचे.. हे रडण चालूच असायच आणि मी नुसतं मुर्खासारखं त्यांना पहात असायचो. मला तेव्हा एक प्रश्न नेहमी पडायचा की हे लोक का रडतात. यांना कोणी मारलं नाही, की कोणी यांच्याशी भांडल नाही. तर यांना काहीच दुखण नाही तर हे लोक का रडतात मुर्खासारखे... यांना काही कळत नाही का..

रडाण्यासारखे काहीच घडले नसताना सुध्दा हे का रडतात... असे अनेक प्रश्न डोक्यात घर करुन असायचे... आणि त्या प्रश्नांचे उत्तर मला त्या दिवशी जवळपास २० वर्षानंतर मिळाले होते.


या प्रत्येक अश्रुमध्ये सामावलय प्रेम फक्त प्रेम. एक असं प्रेम जे व्यक्त करता येत नाही, कोणाला दाखवता येत नाही, कोणाला सांगता येत नाही की लिहून दाखवता येत नाही.. 
हे प्रेम फक्त अनुभवायचं असतं. हे प्रेम जे फक्त मनातून मनापर्यंत पोहचत... 
असं प्रेम.... 

Thursday, August 25, 2011

आज थोडं...

आज थोडं उदास वाटतंय
पुन्हा मागे पहावसं वाटतंय
मागे सोडून आलेल्या क्षणांना
मागे जाऊन भेटावसं वाटतंय

आज थोडं फिरावसं वाटतय
पाय मोकळे करावसं वाटतयं
ज्यांची साथ सोडली होती मध्येच
त्यांच्या सोबत चालावसं वाटतंय

आज थोडं गुणगुणावंस वाटतय
मनातील शब्दांना बाहेर पाडावंस वाटतंय
जे आजवरं कधीच बोलू शकलो नाही
ते गीत गावंस वाटतंय

आज थोडं लिहावसं वाटतयं
थांबलेल्या लेखणीला चालवावं वाटतंय
भावभावनांच्या आतील गुंता
शब्दरुपात मांडावसं वाटतंय

आज थोडं भिजावसं वाटतंय
पावसांच्या थेंबांना झेलावसं वाटतयं
तिच्या सोबतचे पावसातले क्षण
आज पुन्हा जगावसं वाटतयं...

आज पुन्हा जगावसं वाटतयं...
मागे जाऊन तिला भेटावसं वाटतयं...
सोबत तिच्या चालावसं वाटतंय...
समोर तिच्या ते गीत गावसं वाटतंय...
शब्दरुपात तिच्यासमोर मांडावसं वाटतयं
आज पुन्हा जगावसं वाटतं...
तिला जाऊन भेटावसं वाटतंय

- राहुल अरुणाकिशन रणसुभे
२५ ऑगस्ट २०११
वेळ ४.४० संध्या.








Saturday, July 30, 2011

एफ.सी. रोड व हत्ती...(30 जुलै 2011)

एफ.सी. रोड व हत्ती... 

पुण्यात गणपतीला खुप मान आहे. गणेश उत्सवाच्या वेळी पुण्याची खरी रौनक बघावयास मिळते. अनेक शहरांतून लोक फक्त येथील गणेश उत्सवाचे देखावे पाहण्यास, येथील मुर्त्यापाहण्यास, गणपतीचे दर्शन घेण्यास येतात. लोकमान्य टिळकांनी पुण्यातच पहिल्यांदा सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली होती आणि तेव्हा पासून ते आजतागायत हा उत्सव तितक्याच धूमधडाक्यात आणि तेवढ्याच श्रध्देने येथे मनवला जातो. युवक युवतींची झुंबडच्या झुंबड गणेश उत्सवादरम्यान रात्री उशीर पर्यंत शहरातील रस्त्यांवर वावरतांना दिसतात. त्यांच्यासाठी हा गणेश उत्सव म्हणजे गंम्मत जंम्मत, मौज मजा करण्याची एक पर्वणीच असते. मी आता पर्यंत पुण्यात कधी गणेश उत्सवाला आलो नव्हतो. परंतु याबाबत बरेच काही ऐकून होतो. या वर्षी पहिल्यांदा मी येथील गणेश उत्सव पाहणार आहे.. त्यामुळे माझी उत्सूकता डबल झाली आहे.

ऑफिसला जाताना एफ.सी. रोड वर आज काल एक मित्र रोज भेटतो. अनेकजण त्याला पाहून आनंदीत होतात. त्याचे ते भव्य शरीर, ते दिमाखात चालणं, येणाऱ्या जाणाऱ्यांचे सहजच लक्ष वेधून घेते. मी सुध्दा त्याला पाहून थोडा आनंदीत होतो आणि मग पुन्हा अनेक विचारांनी मनात काहूर उठतं.
माझा हा मित्र म्हणजे एक हत्ती.. एफ. सी. रोडवर एक माहूत रोज त्या हत्तीला घेऊन निघतो. माझी ऑफिसला यायची वेळ आणि त्यांची घराबाहेर पडण्याची वेळ कदाचीत एकच असावी. म्हणून रोज आमची नजरा नजर होते. एफ.सी. रोडवर फर्ग्यूसन कॉलेज आहे तसेच हा रोड पुण्याच्या श्रीमंतीची तसेच सौंदर्याची खरी शान आहे. त्यामुळे येथे तरुण तरुणींची वर्दळ कायम असते. हा हत्ती आला की अनेक तरुण तरुणींचे हात आपल्या मोबाईल कडे वळतात आणि या हत्तीचे भव्य रुप आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये बंद करण्याचा मोह त्यांना आवरत नाही. अनेक मुलींना या हत्तीची भिती तर वाटते परंतु त्याच्या सोबत फोटो काढण्याचा मोह न आवरल्यामुळे लांबूनच का होईना पण त्याला आपल्यासोबत कॅमेऱ्यामध्ये बंद करण्यास त्यांची धडपड चालू असते. त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. परंतु हे सर्व बघत असताना एका गोष्टीची सारखी जाणीव होते, ती म्हणजे त्या हत्तीच्या स्वातंत्र्याची. त्याच्या अस्तीत्वाची.

हत्ती हा प्राण्यांमधील सर्वात मोठा तसेच सर्वात शक्तीशाली प्राणी आहे. त्याच्यासमोर चांगल्या चांगल्यांचा निभाव लागत नाही. परंतु वाढत्या नागरीकरणामुळे, जंगल तोडी मुळे त्यांचे जंगलातील अस्तीत्व धोक्यात आले आहे. जंगलातील हत्तींना मारुन त्यांच्या दातांच्या वस्तूंची मोठी मागणी आहे आणि या वस्तूंसाठी लोक कितीही किंमत मोजायला तयार असतात. तसेच इतर हत्तींच्या पिल्लांना काही लोक पकडून त्यांना प्रशिक्षण देऊन गुलाम बनवतात आणि अशाच हत्तीकडून शहरांमध्ये गावांमध्ये विविध कामं करुवून घेतली जातात. आज शहरांमध्ये फिरणारे हत्तीचे अस्तीत्व हे एका खेळण्यासारखेच झाले आहे. जत्रेत जसे आकाश पाळणे, रात पाळणे असतात, या पाळण्यांमध्ये बसायचे असेल तर १० रु. द्या आणि ते तुम्हाला पाळण्यांची सैर करुन आणतात, तशीच काही गत या शहरातील हत्तींची झाली आहे. रस्त्यातील लहान मुलांना त्यांच्या पाठीवरुन फिरवून माहूत त्यातून मिळालेल्या पैशात स्वतःचे पोट भरतो (आणि कदाचित हत्तीचे सुध्दा).

कॉलेज मध्ये शिकणाऱ्या तरुण तरुणींना या हत्तीला पाहून जो आनंद होतो तो आनंद त्या हत्तीला त्यांच्याकडे पाहून होत असेल का, कॉलेजचे वय हे खेळण्याचे बागडण्याचे वय असते, याच वयात मुले-मुली बहरतात, त्यांच्या आयुष्यातील सर्वात आठवणींचे आणि आनंदाचे दिवस म्हणजे हेच क़ॉलेजचे दिवसं. परंतु अशाच खेळण्या बागडण्याच्या वयात या हत्तीला कोणीतरी जंगलातून पकडून आणलं असेल आणि तेव्हा पासून त्याच्या गुलामगिरीला सुरुवात झाली असावी.

एकीकडे गणेश उत्सवात नाचणारी, गाणारी ही तरुण मंडळी, एकीकडे या हत्तीसोबत फोटो काढण्यास उत्सूक असणारी कॉलेजची मुले-मुली आणि दुसरीकडे हा दुःखी हत्ती आणि त्याचे स्वातंत्र्य. खरंच किती विसंगती आहे या सर्वांत.

Friday, July 8, 2011

एक ई-मेल (07 July 2011)

एक ई-मेल
आज या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात संपूर्ण जग जवळ आल्याचे म्हटले जाते. परंतु यामूळे माणूस माणसाच्या दूर जात असल्याचे सुध्दा बोलले जात आहे. कारण आज मोबाईल, इंटरनेट या गोष्टींमूळे आपण आपल्या दूरवर असलेल्या नातेवाईकांशी तसेच मित्र मैत्रीणीशी क्षणभरात बोलू शकतो, संदेश पाठवू शकतो तसेच आपल्या भावना विविध मार्गाने व्यक्त करु शकतो आणि हे सहज शक्य होत असल्यामूळे व्यक्तीच्या मनातून इतरांशी जाऊऩ भेटावे अशी भावना संपत चालली आहे. कारण अप्रत्यक्षरित्या आपल्या आवडीची व्यक्ती ही आपल्या जवळच आहे असा भास हे तंत्रज्ञान निर्माण करत आहे आणि आजची व्यक्ती याच भासाला सत्य मानून चालत आहे. परंतु सत्य तर हेच आहे ना की आपल्या जवळची व्यक्ती ही आपल्या जवळ नसून ती दूर कुठेतरी आहे.
असो मी आज काही या आधुनिक तंत्रज्ञान फायद्याचे आहे की तोट्याचे या विषयावर नाही बोलणार कारण आजचा विषयच मुळी वेगळा आहे. माझ्या आयुष्यात सर्वात जास्त मित्र मैत्रीण हे कॉलेजच्या दिवसांत झाले. परंतु जसे कॉलेज संपले तशी नवीन मित्र मैत्रीण व्हायचे सुध्दा थांबले. कॉलेज जीवन संपताच माझ्या हाती इंटरनेट सारखे एक माध्यम आले की, ज्यामुळे मी माझ्या जुन्या सर्व मित्रांच्या कायम संपर्कात राहू शकेल. इंटरनेटवर असलेल्या ईमेल तसेच फ्री मोबाईल मेसेज सेवांमुळे मी प्रत्येकाच्या संपर्कात राहायला लागलो. आज माझ्याकडे शाळेपासून ते पोस्ट ग्रॅज्यूएशन पर्यंतच्या अनेक मित्रांचे नंबर आहेत आणि त्यांना मी मोबाईल मेसेजच्या माध्यमातून भेटत असतो. त्यानंतर माझ्या हाती सोशल नेटवर्कींग सारखे माध्यम आल्याने मी नवीन मित्र मैत्रीणी तर करु शकतच होतो तसेच जूने, जवळचे मित्र जे की शाळेनंतर दूर गेले होते त्यांना सुध्दा शोधणे शक्य झाले होते. सोशल नेटवर्कींगने मला अनेक मित्रांच्या पुन्हा जवळ नेले. त्याबाबत मी सोशल नेटवर्कींगचा ऋणी आहे.
मी माझ्या कामाची तसेच कथा-कवीतांची ईमेलस् माझ्या ईमेल बॉक्समध्ये जेवढे ईमेल आयडी असतील त्या सर्वांना पाठवतो. त्या निमित्ताने मी त्या सर्वांच्या इनबॉक्स मध्ये तरी पोहचू शकतो ही माझी आयडीया. एकदा असेच मी माझ्या कॉमिक्सच्या कामाचे ईमेल परिचीत अपरिचीत सर्व ईमेल आडयीवर पाठवले आणि काही दिवसांत मला एक ईमेल आला की, 'तू राहूल रणसुभे म्हणजे कोण? तुमची कास्ट कोणती?' हा ईमेल होता एका मुलीचा. मग मी तीला रिप्लाय दिला की, मी औरंगाबादला राहतो आणि मी भावसारच आहे. तुम्ही कोण आहात?.. मग दोन – तीन दिवसांनी तीचा पुन्हा रिप्लाय आला की, 'हो मी सुध्दा भावसारच आहे'.. एवढं बोलून बोलणं थांबलं काही दिवस. मग मी काही प्रश्न विचारली आणि तीने रिप्लाय दिला, मग तिने काही प्रश्न विचारली आणि मी रिप्लाय दिला, असे अनेक वेळेस चालायचे. एक दिवस ह्या ईमेलच्या देवाण-घेवाणीला कंटाळून मी तीला मोबाईल नंबर मागितला व माझा सुध्दा नंबर तिला दिला. सुरुवातीला मोबाईल नंबर बाबत मला नकार आला नंतर मग मिळाला. कधी मेसेज कधी फोन असे होत होते. परंतु ते ही महिन्या-दोन महिन्यातून एकदा. हळूहळू ते ही बंद पडलं. मी तीला पाहिले नव्हते परंतु तीने मला पाहिले होते. कारण मी तिला माझ्या कामाचे फोटो पाठवले होते. आता मला तीला पहायचे होते. मी तशी तिच्या जवळ विचारणा केली परंतु तीने फोटो पाठवण्यास नकार दिला. पण नंतर काही दिवसांनी तीने फोटो सुध्दा पाठवला. छान होती दिसायला. मग मी तीला आपण भेटायचे का? असे विचारले. तेव्हा तिला मला भेटण्यास जास्त उत्सूकता नव्हती. परंतु माझा एक नियम आहे की, मैत्री करायची तर भेटलेच पाहिजे. कारण या मोबाईल आणि चॅटींगवर माझा विश्वास नाही. लोक सर्रास खोट बोलतात याच्यावर! परंतु समोरा-समोर बोलताना ते शक्य नसते. जरी कोणी खोटं बोललं तर लगेच कळते. ती भेटायला तयारच नव्हती. मी सांगितले की, मी तूझ्या गावाला येतच असतो तेव्हा भेटू कारण माझ्या नातेवाईकांचे गाव व तिचे गाव एकच आहे. ती हो चालेल असे तर म्हणाली परंतु त्यानंतर माझे त्या नातेवाईकांकडे कधीच जाणे झाले नाही. मग मी तिला औरंगाबादला येण्यास सांगितले परंतु तिने नकार दिला. तिला नाही जमणार असे सांगितले. ती म्हणाली माझे पुण्यात नेहमी येणे जाणे असते जमलस तर तिथेच भेटू परंतु मी औरंगाबादला होतो आणि माझे पुण्यात काहीच काम नसायचे. मग काय सर्व कार्यक्रम बारगळला. हे असे 2 वर्ष चालले. नंतर 6 महीने तीचा फोन नाही की माझा फोन नाही. कधी तरी एखाद तीन महिन्याने तीचा एसएमएस यायचा आणि मी ही कधी तरी रिप्लाय द्यायचो तिच्या मेसेजला. मी तर अपेक्षाच सोडली होती तिला भेटायची.
नंतर काय मला पुण्यात नोकरी लागली आणि मी इथे आलो. एक दिवस असाच तिचा मेसेज आला की, 'काय करत आहेस?'.. मी रिप्लाय दिला, 'मी सध्या पुण्यात आहे. मला पुण्यात नोकरी लागली आहे इथे.' तीने अभिनंदन केले. मी तिला भेटण्याचा विचारचं सोडल्यामुळे मला पुन्हा तिला विचारायचे धाडस नव्हते. परंतु नंतर तिने मला तिच्या ऑफिसच्या कामासाठी मी पुण्यात येणार आहे असे सांगितले तेव्हा मी सहजच विचारले की, आपण भेटायचे का? तर तिने होकार दिला आणि भेटण्याची तारीख व वेळ ठरली. मला तर धक्काच बसला. मला वाटलं सुध्दा नव्हते की, ती इतक्या सहज होकार देईल म्हणून. परंतु तीचा होकार मिळाला होता. मग काय त्या दिवसाची वाट पहायची होती आणि तो दिवस आज उजडला. दूपारी 12.30 वाजता तीला भेटायला स्टेशनवर जायचे होते. मी 10 वाजताच बसच्या प्रतिक्षेत वाड्याजवळच्या बस स्टॉपवर वाट पाहत होतो. परंतु जेव्हा गडबड असते तेव्हा सर्व गोष्टी अडून पाहतात आणि नेमका तेव्हाच उशीर होतो. आजही तसेच झाले. बस काही येत नव्हती. मी अभिषेकला फोन केला. तो इथे एक वर्षापासून राहत असल्यामूळे त्याला इथलच्या बस व रस्ते सर्व माहीत आहे. मग त्याने मला एक बसस्टॉप सांगितला की जेथून स्टेशनला 5-5 मिनिटाला बस आहेत. मग मी धावत पळत त्या बसस्टॉप वर पोहचलो तर तेथून एक स्टेशनची बस नूकतीच सुटली होती. मी पळत पळत त्या बसला गाठले आणि बसमध्ये चढलो. परंतु हे माझ्या कोणत्या जन्मीचे पाप होते की, ती बस सुध्दा अशी गल्ल्याबोळातून जात होती की बस्स.. मला तर वैतागच आला होता. एक तर बस 11.30 भेटली आणि त्यातल्या त्यात पुण्याचे ट्रॅफीक. तिचा मेसेज आला की, मी स्टेशनवर येऊन पोहचली आहे आणि तूझी वाट पाहत आहे. मला कोणाला माझी वाट पाहण्यास लावायला मुळीच आवडत नाही आणि त्यातल्या त्यात आमची ही पहिली भेट, त्यात मी उशीरा जायचे, हे माझ्यासाठी फारच लाजिरवाण्या सारखे होते. परंतु काय करणार शेवटी दगडाखाली बोट होते माझे. बस शिवाय मी पोहचू शकत नव्हतो आणि बस मला वेळेवर पोहचवणार नव्हती. कशी-बशी गल्लीतली कुत्री, गटारं, झोपडपट्टी दाखवत दाखवत बसने मला स्टेशन जवळच्या बसस्टॉपवर सोडले. बसस्टॉप पासून स्टेशनचे अंतर 5 मि. होते. तेवढ्यात तिचा मेसेज आला की, 'मी निळा ड्रेस घातला आहे. तू लवकर ये. किती वेळ लागले तूला.' मी रिप्लाय दिला की, 'बस 5 मि. पोहचतोय.'
मी पळत पळत स्टेशवर गेलो. इकडे तिकडे तिला शोधू लागलो. ती इन्क्वायरी ऑफिसजवळ बसलेली आहे असे तीने मेसेज मध्ये सांगितले होते. मी मेन गेटने आत गेलो तर मला इन्क्वायरी ऑफिसच सापडत नव्हते. एक दोन जणांना विचारल्यावर मला त्यांनी तिथे जाण्याचा रस्ता सांगितला. मी गडबडीत तिथे गेलो. त्या ऑफिसात प्रवेश करताच तेथील बाकावर बघायला लागलो. त्या बाकावर सर्वत्र मुले आणि म्हतारे लोकच होती. एकाद दूसरी बाई दिसायची. मग एकदम नजर गेली ती एका आकाशी रंगाचा ड्रेस घातलेल्या मुलीवर. तीच होती ती. तीने मला ओळखलं आणि मी तीला. आज पहिल्यांदा मी तिला समक्ष पाहिलं होतं आणि तिने मला.
आमच्या ईमेलला सुरुवात होऊन आज तीन वर्ष झाली होती. आज किमान 3 वर्षानंतर तरी आमची भेट झाली असल्याने मी तर खूष होतोच आणि ती सुध्दा खूष असावी. आम्ही एक-दीड तास तेथे होतो. बऱ्याच गोष्टी शेअर केल्या, गप्पा मारल्या आमच्या दोघांच्या कामाविषयी जाणून घेतले. माझ्या ऑफिसची वेळ होत होती म्हणून मी तेथून निघालो. तिला सुध्दा काही तरी काम होते म्हणून ती सुध्दा निघण्याच्याच तयारीत होती. आम्ही दोघांनी मग तीन वर्षानंतरच्या भेटीचा निरोप घेतला. एका ईमेलने सुरु झालेली मैत्रीचे आज भेटीत रुपांतर झाले होते आणि या भेटीनंतर पुन्हा अनेक ईमेलचा प्रवास सुरु होणार होता...

Thursday, July 7, 2011

कोण चुक कोण बरोबर...! (06 July 2011)

कोण चुक कोण बरोबर...!
मला नेहमी एक प्रश्न पडतो काही लोकांच्या बाबतीत, की लोक मैत्री कशी काय विसरतात. खरंतर मैत्रीचेच नाते एक असे आहे की, ते इतर सर्व नात्यांपेक्षा खूप मोठे मानले जाते. मैत्रीची व्याप्तीच इतकी मोठी आहे की, इतर सर्व नाते त्यासमोर गौण ठरतात. ज्या मनुष्याला जास्त मित्र आहेत तो खरा श्रीमंत मनूष्य मानला जातो. संपत्ती काय कपाटात ठेवायची असते. परंतु मैत्री ही हृदयात ठेवायची असते. त्यामुळे जितके जास्त मित्र तितके जास्त तुमच्या हृदयात लॉकर. त्यामुळे ज्याला मित्र-मैत्रीण नाही त्यापेक्षा दूसरा गरीब माणूस कोणी नसेल असे मी तरी मानतो.
मला खूप मित्र-मैत्रीणी आहेत. शाळेत असताना मी खूप शांत असायचो. मी जास्त हूशार नसल्याने मागच्या बाकावर बसायचो. बाकावरील मित्र तेच माझे एक-दोन मित्र बस तेवढेच.. हे असं चक्क 12 वी पर्यंत चाललं. पण पुढे बी.. ला प्रवेश घेतला आणि तेथून माझ्या मैत्रीच्या बॅंकेत अनेकांनी खाती उघडली आणि त्यातील बरीचशी खाती आजता गायत चालू आहेत. बी.. मध्ये मी बोलका झालो. तोपर्यंत माझ्यातील विनोदी वक्ता जागा झाला होता. अनेक मित्र आणि त्याहून अधिक मैत्रीणींचा लवाजमा घेऊन मी बी.. ला फिरत असायचो. शितल, सुनिल, रवी, भास्कर, चंद्रशेखर, शितल, अर्चना, मधूकर, कल्याणी असे खूप सारे मित्र मैत्रीण माझ्या अवती भोवती असायचे. माझा संगीत विषय असल्याकारणाने तीथे मुलींची संख्या खूप जास्त होती आणि मुलांची बोटावर मोजण्या इतकी. त्यामुळे माझ्या मित्रांच्या यादीत मैत्रीणीच खूप होत्या. त्यातल्या बऱ्याच जणींचे लग्न झाले आणि काही जणींचे काय झाले हे माहीत नाही, म्हणजे त्यांची आठवण आहे परंतु त्यांनीच कॉन्टेक्ट तोडला होता माझ्याशी. त्यातलीच एक म्हणजे सायली.
माझ्या बी..च्या दूसऱ्याच वर्षाला सायली कॉलेज सोडून निघून गेली. एक वर्ष आम्ही खूप धम्माल केली होती. ती जरी आमच्यात मिसळत नव्हती तरी संगीताच्या लेक्चरला आम्ही खूप मज्जा करायचो. आमचा एक ऑर्केस्ट्रा होता. म्हणजे आम्ही सर्व संगीत विषयाचे विद्यार्थी लेक्चर संपले की, पेटी, तबला घेऊन पिक्चरची गाणी म्हणत बसायचो. सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत आमचा हा धिंगाणा चालू असायचा. त्यात सायली सुध्दा सामिल व्हायची. परंतु दुसऱ्या वर्षी ती निघून गेली. नंतर मला कळाले की, ती औरंगाबादला तीच्या आत्याकडे राहायची. ती मूळची पुण्याची होती. ती पुन्हा घरी आली होती पुण्यात. पुण्यात येऊन तीने इंटेरीयर डेकोरेशनचा क्लास लावला होता. एवढ्या पर्यंतच मला तीची माहिती होती. नंतर कोणी तिचा विषय सुध्दा काढला नाही आणि तीने सुध्दा कोणाशीच कॉन्टेक्ट ठेवला नाही. कारण काय होते याचे माहित नव्हते. परंतु मला ती अधूनमधून आठवायची.
चालत असतं अस कधी कधी.. असो..
आज माझ्या ऑफिसचा टाईम हा संध्याकाळी 4 ते रात्री 12 होता. मी लवकरच घरुन निघालो. ऑफिसात जाऊन ब्लॉग अपडेट करायचा होता त्यासाठी मी 3. वाजताच जायचे ठरवले. मी भरभर जात होतो. शेवटी ऑफिसच्या जवळ असलेल्या फुटपाथ वरून मी निघालो. पुण्यात रहदारी खूप असल्याने प्रत्येक जण या फुटपाथचा वापर करतो. तसेच मी ही केले. फुटपाथच्या एका बाजूला दूकाने होती आणि दूसऱ्या बाजूला रस्ता. रस्त्याकडे काय पहायचे म्हणून मी दूकानाकडे पाहत निघालो. तर मध्येच एका स्टेशनरी दूकानात एक चेहरा ओळखीचा वाटला. ती म्हणजे सायली. तशी ती मला दोन तीन वेळा दिसली होती. मी जास्त काही लक्ष दिले नव्हते त्यावेळेस, शिवाय त्या दूकानात एक वयस्कर मनुष्य सुध्दा असायचा; तिचे वडील असतील ते. आज तसे दुकानात तिच्या शिवाय कोणी नव्हते. मी तीला पाहिले आणि तसाच पुढे गेलो पुन्हा वाटले की, नाही आपण आज बोलायला हवे. परंतु एक मन म्हणत होते ती विसरली असेल मला. 7 वर्षा पूर्वीची गोष्ट म्हणजे 2004 ची गोष्ट आणि आता 2011. कोण लक्षात ठेवणार एवढ्या जून्या गोष्टी शिवाय ती एकच वर्ष होती आणि आमच्यात जास्त मैत्री नव्हती. त्यामुळे मन घाबरत होते तिच्याशी बोलायला. तरीही एकदा प्रयत्न करुन बघूच म्हणून मी दूकानाकडे निघालो. खिशात पैसे होते वाटलं काही तरी पेन, पेन्सील घेऊयात. जर तीने ओळखलं तर ती विचारेल आणि नाहीच ओळखलं तर आपण पेन घेऊन निघून जाऊ. मग ठरलं. मी पैसे घेऊन तीच्या दूकानासमोर उभा झालो. तितक्यात एक गिऱ्हाईक आलं आणि ती थोडी बिझी झाली. तिने मला पाहिले की नाही माहित नाही परंतु ती त्या गिऱ्हाईकाशीच जास्त बोलत होती. थोड्यावेळाने ते गिऱ्हाईक निघून गेले आणि ती म्हणाली, काय राहूल कसा आहेस.. इकडे कस काय. मी खिशातील पैसे खिशातच ठेवले. मनाला आनंद झाला की तिने मला ओळखले. मग काय गप्पा सुरू झाल्या. मी सांगितले की, मी सकाळ पेपर मध्ये जॉईन झालो आहे इथेच राहतो वैगेरे वैगेरे.. मी तीला विचारले की, तू मध्येच बी.. सोडून इकडे का आलीस आणि नंतर कोणाशी कॉन्टेक्ट ठेवलास की नाही. तेव्हा ती बोलली अरे मला अडीच वर्षाची मुलगी आहे. मी औरंगाबादवरुन इकडे येऊऩ इंटेरीअरचा क्लास केला नंतर जॉब केला. काही वर्षातच माझे लग्न झाले. संसारात अडथळा नको म्हणून मी कोणाशीच कॉन्टेक्ट ठेवला नाही. कारण मग मैत्रीला आणि सासरच्यांना संभाळायला खूप अवघड जात. त्यामुळे मी मुलांशी तर सोडच परंतु माझ्या जवळच्या मैत्रीणींशी सुध्दा कधी संपर्क साधला नाही. तीचे बोलणे मला कळाले नाही. परंतु तीचे बरोबर असेल असं वाटलं थोडा वेळ. मला ऑफिसला उशिर होत होता म्हणून थोड्या वेळाने मी तेथून निघालो.
तिच्या दूकानापासून ऑफिसचे अंतर केवळ दोन मिनिटाचे परंतु या दोन मिनिटात मला असंख्या प्रश्नांनी वेढले. वाटलं तीचे उत्तर बरोबर होते का?, सायलीने जो मार्ग निवडला होता कॉन्टेक्ट न ठेवण्याचा तो बरोबर होता का? ती कसे काय सर्व मित्र मैत्रीणींना विसरु शकते. जरी तीला सर्वांची नावे माहित असतील तरीही सात वर्षे ती कोणाशीच का बोलली नाही. खरचं का संसारात मैत्री अडसर बनते का? आणि मैत्री ही इतकी शुल्लक असते का की, ज्याला इतक्या सहज नाकारता येईल. जर तिने सर्वांशी मैत्री ठेवली असती तर खरचं का तीच्या सासरवाडीत प्रॉब्लेम झाले असते. मुलांशी बोलली नाही एकवेळेस तर ठिक आहे परंतु मैत्रीणींशी सुध्दा संपर्क तीने का तोडावा? बर मैत्री ही मैत्रीच असते तीचे सर्व प्रॉब्लेम तीच्या मित्र मैत्रीणींनी समजून नसते घेतले का?
अशा अनेक प्रश्नांनी माझ्या डोक्याला भंडावून सोडले होते.
शेवटी काय,
वाटलं, ती तिच्या ठिकाणी बरोबरच असेल आणि मी माझ्या ठिकाणी. कारण जगात कोणीच चुकीचा नसतो. प्रत्येक जण स्वतःच्या ठिकाणी बरोबर असतो. फक्त आपल्या सारखी लोकं त्यांना चुकीचे ठरवत असतात. कारण आपल्याला त्यांची परिस्थिती माहित नसते. त्यांनी घेतलेला निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला आहे, त्यामागचे मुळ कारण काय आहे हे आपल्याला माहित नसते आणि आपण दूसऱ्याला चुकीचे ठरवून मोकळे होतो, असे अनेकजण करत असतात. ते ही त्यांच्या ठिकाणी बरोबर असतात. एखाद्यावेळेस तेही चुक असू शकतील.
माहीत नाही. नेमके काय. कोण बरोबर आहे आणि कोण चुक! पण हे असेच चालू असते जीवनभर...

Wednesday, July 6, 2011

एक कप चहा...! (05 July 2011)

एक कप चहा...!
माझे संपूर्ण 17 वी (पदव्यूत्तर) पर्यंतचे शिक्षण हे माझ्या शहरात म्हणजे औरंगाबाद मध्येच झाले. त्यामूळे मला कधीच हॉस्टेलची मजा अनूभवता आली नाही. लहानपणी म्हणजे शाळेत असताना मी जेव्हा जेवणाबाबत अथवा एखाद्या वस्तू बाबत हट्ट धरायचो तेव्हा घरचे रागात म्हणायचे की, याला बोर्डींग मध्ये टाकायला पाहिजे. इथे सर्व आयतं मिळतंना म्हणून खूप नाटकं सुचतात याला. परंतु ते असेच प्रेमाने म्णायचे, मुळात त्यांनाच मला दूर ठेवायला आवडत नव्हते. मी कॉलेजला असताना अनेक बाहेरगावची मुले औरंगाबादला शिक्षणासाठी रहायला यायची त्यातली काही हॉस्टेलला असायची. ते नेहमी त्यांच्या रुमवरच्या हॉस्टेलवरच्या गप्पा सांगत असायचे. त्या दिवसात हॉस्टेल वरील गंमती जमती, मित्रांच्या फजिती अथवा फिरायला गेलेल्या आठवणी, कोणाचे भांडण झालेले अथवा हॉस्टेलला पाणी नसले की उडणारी धांदल अशा अनेक आठवणी ते मला सांगायचे. तेव्हा कुठेतरी मनात वाटायचं की, आपण काही तरी मिस करतोय. आपल्या अनुभवांमध्ये हॉस्टेलचा अनुभव कधी येईल का? का तो येणारच नाही. घरात कसे सर्व काही मनमुराद मिळते परंतु बाहेर असणारे माझे मित्र त्यांना प्रत्येक गोष्टीचे नियोजन करावे लागायचे. मेसची वेळ झाली की, डबे घ्यायला अथवा जेवायला, रविवार आला की कपडे धूणे, कपड्यांना इस्त्री करणे इत्यादी. तसेच एखादी कॉमन सुट्टी मिळाली की, चित्रपटाला जाणे अथवा फिरायला जाणे अशा खूप गंमती जमती ते करायचे आणि मला सांगायचे. परंतु त्यांच्या त्या गंमती- जमतीची मला फक्त ऐकून मजा माहित होती पण त्याचा अनुभव मला कधीच आला नव्हता.
ठिक आहे.. होत असत.. असं...
काल मंगळवार होता. म्हणजे माझ्या सुट्टीचा वार. मी आणि अभिषेक दोघं दिवसभर घरीच होतो. तसेच माझ्या मोबाईलचे इंटरनेट सुध्दा सुरु झाले होते, त्यामुळे बाहेर फिरायला जाण्याचा प्रश्नच येत नव्हता. दिवसभर फेसबूकवर होतो. संध्याकाळी अभिषेकला कॉलेज बॅग आणि बेल्ट घ्यायचा होता म्हणून आम्ही एफ.सी. रोडवरील मार्केट मध्ये गेलो. तेथे त्याची बॅग आणि बेल्ट घेतला तेथून पुढे त्याने मला संभाजी बागेत नेले. ही बाग थोडी प्रसिध्द आहे परंतु ती म्हणजे झेड ब्रीज सारखी... आठवलंना झेड ब्रीज.. मागील लेखामध्ये उल्लेख केलेला ब्रीज.... आठवलं का.. हा तोच.. येथे सुध्दा अनेक कपल्स असतात आणि तेच त्यांचे अश्लिल प्रकार चालू असतात. थोडा वेळ फिरलो आणि तेथून लगेच घराकडे वळालो. रात्रीचे 8.30 झाले होते. मेसला सुध्दा जायचे होते. घरी आल्याआल्या धूवायला टाकलेले कपडे धूवून घेतले आणि तोपर्यंत सागर आला होता. मग आम्ही मेसला गेलो. तेथे गजानन सुध्दा होता. गजाननने त्याच्या रुमवर माझ्या ब्लॉगबद्दल सर्वांना सांगितले होते आणि फक्त सांगितलेच नाही तर इंटरनेटवरुन सर्व ब्लॉग कॉपीकरुन त्याने त्याच्या मित्रांना वाचायला दिले होते. त्यामुळे त्यांच्या रुममध्ये मी सर्वांच्याच परिचयाचा झाललो आहे असे तो सांगत होता. जेवण करुन येताना मला माझ्या त्याची प्रचीती आलीच. कारण गजाननच्या रुममधील धीरज आमच्या वाड्याजवळ आला होता. त्याने माझ्यासोबत माझ्या ब्लॉगच्या बाबतीत बोलायला सुरुवात केली. त्याला ते खूप आवडले असे तो सांगत होता. आम्ही सगळे म्हणजे मी, सागर, धीरज, अभिषेक आणि गजानन वाड्या खाली गप्पा मारत उभे होतो. विवेक सुध्दा जेवण करुन आमच्यात सामिल झाला. आमच्या मैफिलीत तशी पावसाने सुध्दा क्षणभर हजेरी लावली होती. त्यामुळे वातावरण थोडे थंड झाले होते आणि आमची मैफिल सुध्दा गप्पांच्या रंगात होती. तितक्यात विवेकला चहा पिण्याची हुक्की आली. चहाचे नाव ऐकल्यावर मला सुध्दा आता रहावेनासे झाले. मग काय चहा पियायला जायचे ठरले... रात्रीचे 10.30 वाजले असल्याने चहाचे दूकान उघडे असणे थोडे अशक्यच होते. मग मी पर्याय शोधला तो स्वारगेट बसस्थानकाचा. तेथे चहा हमखास मिळतो. परंतु स्वारगेट दूर असल्याकारणाने सर्वांनी तेथे जाण्याचा नकार दिला आणि जवळच कुठे तरी एक चहाची हॉटेल आहे असे गजाननने सांगितले. मग काय.. आम्ही सर्वजण त्या जवळचं असलेल्या चहाच्या हॉटेलच्या शोधात निघालो. त्यावेळस आम्हाला 11. वाजले असतील. मग गजानन पुढे चालत होता आणि आम्ही सर्वजण त्याच्या मागे. गजानन हा एम. आर आहे... एम. आर. म्हणजे (मेंटली रेटार्डेड नाही बरं का!) एम. आर. म्हणजे मेडीकल रिप्रेसेंटेटीव्ह.... तो एम आर. असल्याकारणाने तो पुण्यातील त्या सदाशिव पेठेतल्या प्रत्येक गल्लीतील दवाखान्याचे, मेडीकलचे निरिक्षण करीत चालला होता प्रत्येक दवाखाना अथवा मेडीकल दिसले की तो आम्हाला काहीतरी माहिती सांगायचा.. आम्ही त्याच्या पाठीमागे चालतच होतो.. चालत चालत खूप पुढे आलो, परंतु हॉटेल काही सापडली नाही. तसेच चालत डावी कडे वळालो. तेथे सुध्दा सर्व रस्ता सामसूम होता. रस्त्याने फक्त आमचाच आवाज ऐकायला येत होता. मध्ये कोणाची टपरी चालू असली तर असली नाही तर फक्त रस्त्यावरील दिव्यांचे प्रकाश आणि आम्ही. एवढ्या रात्री धीरजला फोटो काढण्याची हुक्की आली. रस्त्यात थांबून तो पोझ देऊन मला फोटो काढायला सांगायचा. माझा मोबाईलचा दोन मेगा पिक्सलचा कॅमेरा, त्यातल्यात्यात अंधार आणि त्यातल्यात्यात धीरज मग काय.. फोटो कसा येणार यात काही वेगळे सांगायचे नको.. तरीही त्याचा हट्ट फोटो काढण्याचा. मग असेच दोन चार फोटो काढत काढत आम्ही पुढे पुढे जात होतो. हॉटेल काही दिसत नव्हते. गजानन आपला इकडे तिकडे वरती कोणी डॉक्टर, हॉस्पीटल दिसतय का पाहत चालला होता.. पुन्हा तो डावी कडे वळाला. आम्ही सुध्दा त्याच्या मागेच. नंतर वाटायला लागले की, याला हॉटेलशी काही घेणं देणं नसाव हा फक्त येथील दवाखान्यांची माहिती काढत असावा. आम्ही गजाननला विचारले अजून किती लांब आहे रे. तो म्हणाला बस इथे पूढेच कुठेतरी ती टपरी आहे. पण कशाच काय. सर्व दूकाने बंद आता 11.30 झाले होते. एकही दूकान चालू नव्हते. जे होते ते सुध्दा बंद करायच्या तयारीत होते. अजून पुढे गेल्यावर गजानन पुन्हा डावीकडे वळाला. आम्ही सुध्दा त्याच्या मागेच.. असेच डावी कडे वळत वळत आम्ही पुन्हा आमच्या वाड्याकडे आलो होतो. मग काय बसलो ओट्यावर. परंतु मला आज चहा पियायचीच होती मग मीच म्हणालो की आता गाड्या काढा आणि स्वारगेटला जाऊन चहा पिऊनच येऊ. गजानन पहिल्यांदा इतक्यादूर चालला होता. तो गाडी शिवाय कधीच फिरत नाही असे कळाले होते. तरीही मी त्याला चहासाठी फोर्स करत होतो. सागरचे मन नव्हते चहा पिण्यासाठी एवढ्या दूर जायचे परंतु सर्वांच्या इच्छेसमोर त्याने सुध्दा त्याचा विचार बदलला. मग काय.. दोन गाड्या आणि सहा मुले. एका गाडीवर तीन असे आम्ही स्वारगेटला गेलो आणि गरम गरम चहाची ऑर्डर दिली. मला बाटलीत पिण्यासाठी पाणी भरुन घ्यायचे म्हणून मी आणइ अभिषेक पाणी आणण्यासाठी गेलो. अभिषेकचे जेवण आज पोटभर झाले नव्हते. त्याला भूक लागली होती. म्हणून आम्ही दोन पारले बिस्कीटचे पुडे घेतले. तोपर्यंत आमचा चहा आला होता. मस्त मग रात्री 12.वाजता चहा बिस्कीटाचा बेत झाला. खूप मज्जा वाटत होती तेव्हा एक कप चहासाठी एवढ्या उठाठेव करायला. चहा घेऊन घराकडे निघालो.
माझ्या मनात कॉलेज जीवनात राहिलेली ती हॉस्टेलची सल आज पूर्ण झाल्यासारखी वाटत होती. एवढी चांगली मित्र आणि अशा धम्माल मज्जा असणाऱ्या गोष्टी. हेच तर करायचे होते मला आणि आज त्याची सुरुवात झाली होती. मागच्या रविवारचा तो मॉल आणि आज रात्रीचा हा चहा.. खरंच खूप आठवणीतील गोष्टी होत्या या दोन्ही. बस असेच मजेत दिवस जात राहिले पाहिजे एवढेच वाटत आता..

उद्य़ा काही तरी नवीन घेऊन भेटेन...! (04 July 2011)

उद्य़ा काही तरी नवीन घेऊन भेटेन...!

आजच्या दिवशी काही विशेष असं लिहण्यासारखं घडले नाही. अथवा घडले सुध्दा असेल परंतु मला ते दिसले नसावे. ठिक आहे. एक दिवस असा सुध्दा जायला हवा आयुष्यात. सकाळी उठायचे, आवरुन कामाला जायचे आणि संध्याकाळी बॅक टू पवेलियन. बस्स.. बऱ्याच लोकांची हीच दैनंदीनी असते. त्यांच्या जिवनात काही रोमांचक, काही तरी नवीन, आठवणीत राहण्यासारखं असते की नाही कुणास ठाऊक. त्यांना तसेच आयुष्य जगण्यास आवडत असावे. ठिक आहे ना.. मग त्यांना जसं जगायचं आहे तसं जगू दे. परंतु आज मी एवढेच लिहून माझे लिखाण थांबवणार आहे.. उद्या काही तरी नवीन घेऊन भेटेन...

धन्यवाद...

Tuesday, July 5, 2011

पिवळा, हिरवा आणि मेहंदी.... (03 July 2011)

पिवळा, हिरवा आणि मेहंदी....
सुट्टीचा वार म्हणजे रविवार. प्रत्येक जण रविवारी काय करायचं याचे प्लान संपूर्ण आठवडाभर करत असतो आणि एखादा तरुण, विद्यार्थी जर नवीन शहरात राहायला गेला तर त्याचे प्लानिंग तर हमखास ठरलेले असते. मग ते कुठे बाहेर फिरायला जायचे असो अथवा आठवडाभर वापरलेले कपडे धूवायचे असो. एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जायचे असो अथवा एखादा चांगला चित्रपट पहायचा असे अनेक बेत नवीन शहरात आलेल्या मित्रामित्रांमध्ये ठरत असतात.
मला मात्र रविवारी सुट्टी नसते. त्यामुळे मला असे बेत ठरवणे काही शक्य होत नाही. तरी चांगले आहे की, माझ्या ऑफिसचा टाईम रविवारी संध्याकाळी 5 ते रात्री 1 असतो. संध्याकाळ जरी माझी ऑफिसात जात असली तरी पूर्ण दिवस माझ्या हातात असतो, त्यामुळे मी सागरला आज कुठेतरी बाहेर जायचे असे सांगितले होते. त्याने पर्याय विचारल्यावर सिंहगडला जायचे म्हटले तर संध्याकाळी 5 पर्यंत येणे होणार नव्हते आणि लोणावळ्याला सुध्दा जायचे म्हणजे तोच प्रॉब्लेम. मग

मीच ठरविले की शहरातल्या शहरात कुठेतरी फिरायचे. एखादा स्पॉट शोधायला लागलो आणि मी नवीन असल्यामुळे मला कोणतेच ठिकाण माहित नव्हते नंतर आठवले की इथे एक सर्वात मोठा मॉल तयार झालाय. त्याचे नाव इशान्य मॉल होते. मग तेथेच जायचे ठरले. इशान्यला सागर आणि मी असे दोघेच जाणार होतो. कारण विवेक देल्ही-बेल्ली मुव्हीला जाणार होता आणि मंदारचे काय प्लानिंग आहे माहित नव्हते. त्यामुळे आम्ही दोघांनीच जाण्याचा निर्णय घेतला. सकाळीच मी तयार झालो. सागरला आवरायला थोडा वेळ लागतो म्हणून त्याला मी लवकर आवर असे सांगत होतो. विवेकने मला विचारले तुम्ही कुठे जाणार आहात, तेव्हा मी सांगितले की इशान्यला जाणार आहे.. विवेक लगेच उत्तरला सिंहगड का.. मी म्हणालो अरे नाही इशान्यला जाणार आहे.. विवेक पुन्हा म्हणाला माहिती आहे सिंहगडच की.. असे मग माझ्या लक्षात आले याला इशान्य म्हणजे दिशा वाटत असावी. मग मी लगेच त्याला सांगितले की, इशान्य मॉल ला जाणार आहोत. तेव्हा त्याला समजले.
विवेकचा मुव्हीचा प्लान बारगळणार होता हे माझ्या लक्षात आले होते कारण त्याला कोणीच सोबत नव्हते. त्यामुळे तो आमच्या सोबत येईल असे वाटू लागले आणि झाले सुध्दा तसेच विवेक आमच्या सोबत यायला तयार झाला. मंदारचा काही प्लान नसल्याने तो सुध्दा आमच्या सोबत निघायला तयार झाला. आम्ही आता चौघे झालो होतो. सर्व जण तयार झाले. रविवार म्हणजे सर्वांनाच सुट्टी. त्यातल्यात्यात पुण्यात म्हणजे तरुणांसाठी आणि तरुणींसाठी रविवार हा मजेचा फिरायचा आणि मुले मुली पाहण्याचा वार. त्यामुळे प्रत्येक जण जमेल तेवढे नटून-थटून निघतो. आम्ही मुले असल्याकारणाने आम्ही नटण्यामध्ये काय तर साधा फॉर्मल ड्रेस सोडून फक्त जिन्स आणि टी शर्ट घालणार. तसा फॅशन सेन्स आहे पण तो मेंन्टेन करण्या एवढे पैसे खर्च करणे आम्हाला नाही आवडत. मग आम्ही सर्वांनी टी-शर्ट आणि जिन्सच घातल्या. विवेकचा पिवळा टीशर्ट होता. माझा हिरवा आणि सागरचा मेहंदी कलरचा. मंदारचा तसा पिकट पिवळा होता.. परंतु आमच्या तीघांच्या टीशर्टचे रंग एकदम खुलून दिसायचे. मला आमच्या तिघांवर रस्त्यात एक गाण आठवलं..
अनहोनीला होनी करतो.. होनी ला अनहोनी..
एकाच ठिकाणी जेमल तिघे..
पिवळा, हिरवा आणि मेहंदी....
हे गाणं सर्वांना आवडले की नाही माहित नाही परंतु हे गाणं म्हटल्यावर सर्वजण खूप हसायचे. मंदारच्या टीशर्टचा रंग फिकट असल्यामुळे मला त्याला गाण्यात सामिल करता नाही आलं. कदाचित त्याला त्याच्या शर्टाचा राग आला असावा. कारण त्या गाण्यात त्याला वाळीत टाकल्यासारखं वाटत असावं. मी यावरुन त्याला खूप चिडवायचो. मंदार तू पण एखादा निळा किंवा लाल गडद रंगाचा टिशर्ट घातला असता तर तुला सुध्दा या गाण्यात सामिल करुन घेतलं असतं. तो शांतच बसायचा. काहीच प्रतिक्रीया न देता तो सरळ पुढे चालायचा. मी मंदारला मुद्दाम छेडायचो. नंतर नंतर तर मी मंदारला काही म्हणालो की विवेक मध्येच बोलायचा, जस काय मी त्यालाच बोलल्या सारखे. असे नेहमी होत होते.
आमच्या चौंघांपैकी कोणालाच इशान्य मॉल कुठे आहे हे माहित नव्हते. आम्ही बसने कल्याणीनगर येथे गेलो. त्याच रस्त्यावर मॉल आहे एवढे सागरला माहित होते. परंतु नेमके कुठे हे माहित नव्हते. बस कल्याणी नगरला थांबली. आम्ही चौघे उतरलो आणि रस्त्यावरील एकाला विचारले की, इशान्य मॉल कुठे आहे? त्यानी सांगितले की तुम्ही फार पुढे आलात. मागे शास्त्रीनगरच्या चौकातून उजवीकडे आत तो मॉल आहे. आम्ही सगळे परेशान झालो. कारण मला 5 वाजता ऑफिसला जायचे होते. आता 1 वाजला होता. पुन्हा मागे चालत जा, तेथून इशान्य मॉल खूप लांब होता या सर्वात 4 वाजले असते. मग आम्ही समोरच असलेल्या बिग मार्ट नावाच्या मॉल मध्ये जायचे ठरविले. तो मॉल सुध्दा छानच दिसत होता. मग सर्वांच्या एकमताने आम्ही बिगमार्ट मध्येच गेलो. मध्ये गेल्यावर कळाले की हा मॉल सुध्दा खूपच चांगला आहे. आज तिथे या मॉलमध्ये फॅशन शोची प्रॅक्टीस चालू होती. आम्ही जस्ट आत एन्ट्री केली की समोरच काही सुंदर सुंदर मुली रॅम्पवरुन चालत असताना दिसल्या. मुली म्हणटले की मुलांना तर अजून काय पाहिजे. आणि त्यातल्या त्यात फॅशन शोच्या मुली मग तर विचारुच नका.. तिथे अनेक तरुणांनी तसेच इतर लोकांनी गर्दी केली होती. त्यात मग आम्ही सुध्दा शामिल झालो. ही फॅशन शोची तालीम असल्यामुळे तुम्ही विचार करत असाल तशा तोटक्या कपड्यांतील मुली इथे नव्हत्या. काहींचे कपडे जरी थोडे छोटे असले तरी ते लिमिट मध्ये होते. त्यामुळे कोणीही लाळ गाळायचे काम नाही.
आम्ही सर्वजण त्या रॅम्पच्या बाजूला असलेल्या एका बाकावर बसून ते बघत होतो. नंतर लगेचच वर असलेल्या सिलिंग कडे नजर गेली. तेथे सर्वत्र छत्र्या लावलेल्या होत्या. ह्या छत्र्या याकरीता लावल्या होत्या कारण सध्या पावसाळा ऋतू चालू आहे ना.. त्याचा फिल आणण्यासाठी ह्या छत्र्या त्या मॉलच्या इंटेरीअर वाल्यांनी लावल्या असाव्यात असे वाटले. परंतु त्या रंगी बेरंगी छत्र्यापाहून माझा फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही. मग काय मोबाईल कॅमेऱ्याने जे फोटो काढण्याचे काम सुरु झाले ते काही केल्या थांबले नाही. त्या छत्र्यांनंतर आमच्या मित्रांचे फोटो सेशन, विवेकने तर त्याचा मोबाईल त्या फॅशन शो वाल्या मुलींसाठीच बुक करुन टाकला होता. आम्ही इतरत्र आत फिरत होतो परंतु त्याचे पाय काही त्या फॅशन शोच्या रॅम्प पासून हटत नव्हते. त्याने तर फोटो सोबत चक्क व्हिडिओ शुटींगच केली. मंदारने आपल्या आवडत्या मुलींचे जसे पाहिजे तसे परंतु थोडे फोटो काढले आणि तो पण आमच्यात शामिल झाला. सागर आणि माझे पुण्यातील हे पहिले फोटो होते. तसे सर्वांसोबत फिरण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे प्रचंड आनंद होत होता. अनेक फोटो काढले आणि नंतर आम्ही मॉलच्या बाहेर पडलो. दूपारचे 3 वाजले होते आम्ही बाहेर आलो तरीही विवेक आतच होता त्या रॅम्प समोर. मग त्याला कॉल करुन आम्ही बोलावून घेतले बाहेर.
बाहेर आल्यावर पुढील बेत ठरला तो म्हणजे इशान्य मॉलचा शोध घ्यायचा. माझे मन नव्हते जाण्याचे परंतु इतक्या दूर आलो तर निदान तो मॉल शोधून तर काढू या उद्देशाने आम्ही त्या मॉलच्या शोधात निघालो. शार्प 4 वाजता तेथून निघायचे ठरले कारण माझा 5 वाजता जॉब होता. मग चालत चालत, लोकांना विचारत शेवटी इशान्य मॉल सापडला. मॉल खूपच भव्य होता परंतु त्याचे अजून कन्स्ट्रक्शन पुर्ण झाले नसल्याने तो आम्हाला आकर्षित करु शकला नाही. थोडा वेळ आत फिरल्यानंतर 4.00 वाजता आम्ही बाहेर पडलो. तेथून एकही बस माझ्या ऑफिसकडे जात नव्हती. त्यामुळे आम्ही तीन कि.मी चालून अहमदनगरच्या रस्त्यावरच्या स्टॉपजवळ आलो. त्या बसस्टॉप वरुन सुध्दा एकही बस लागत नव्हती. 4.30 झाले होते. मग मी रिक्षा करुन जाण्याचे ठरविले. एक रिक्षा पकडली आम्ही चौघांनी आणि वेळेच्या आत म्हणजे शार्प 5. वाजता मी ऑफिसात पोहचलो.
आजचा दिवस जरी धावपळीचा गेला असला तरी मला खूप मज्जा करता आली. मना सारखे मित्रांसोबत फिरता आले. आणि रविवारी सुट्टी नसल्याचे दुःख जे होते ते आज नाहीसे झाले. आता मी दर रविवारी असेच छोटे पण गमतीदार बेत आखण्याचे ठरविले आहे...

Monday, July 4, 2011

आमचं पोट भरलं ना! बस्स... मग (02 July 2011)

आमचं पोट भरलं ना! बस्स... मग
मुलगा-मुलगी शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी घराबाहेर पडले की, त्याचा सर्वात मोठा प्रश्न असतो ते म्हणजे जेवण. त्यातल्या त्यात हा मुलामुलींपेक्षा त्यांच्या आईवडीलांना याची खूप मोठी चिंता असते. माझे लेकरु काय जेवत असेल. तीथे त्याला पोटभर जेवायला मिळते की नाही. चांगले जेवायला मिळते की नाही असे अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यात सुरू असतात. जर त्यांचा फोन आला तर पहिले ते विचारतात जेवण केलं का, मेस चांगली आहे का.. पोटभर जेवतोस ना... एवढे प्रश्न झाल्यावर मग इतर गोष्टी सुरु होतात. हे तर झालं घरच्यांचे परंतु घराबाहेर असलेल्या मुला मुलींना सुध्दा याचे टेन्शन असतेच की, ज मेस मध्ये जेवायला काय असेल, एक वेळची मेस असेल तर संध्याकाळी कुठे जेवायला जायचे, त्यातल्या त्यात मेस खराब असेल तर मुलं जेवण नीट करत नाहीत, असे असंख्य प्रश्न असतात. त्यामुळे घराबाहेर असताना जेवण मात्र चांगलं मिळाले की सर्व काही चांगल वाटायला लागतं.
माझी मेस चांगली आहे. एक आजी ही मेस चालवतात. आम्ही त्यांना माई म्हणतो. रोज गरम गरम त्या जेवायला वाढतात. दर रविवारी एखादा गोड पदार्थ असतो जेवणात. तसेच महिन्यातून कधी मधी, पावभाजी, दोसा, इडली असे बदल करुन त्या आम्हाला खूष करतात. मी आल्यापासून त्यांच्याकडेच जेवायला जातो परंतु कधीच मी मेसचे जेवतो आहे असे आतापर्यंत जाणवले नाही. त्यांच्या घरातील इतर सदस्य सुध्दा सर्व मेसचे मुले जेवल्यावर जेवण करतात. मला सागरने या मेस मध्ये नेले होते. तो इथे आल्यापासून माईंकडेच आहे. याला आता जवळपास 1 वर्ष होत आले आहे. सध्या आम्ही दोघांनी एक वेळचीच मेस लावली आहे. कारण आमच्या नोकऱ्यांच्या टाईम हा दिवसभर असतो आणि नोकरीचे ठिकाण हे मेस पासून खूप दूर आहे. त्यामुळे रात्रीचे जेवण आम्ही माईंकडे करतो आणि दूपारचे कुठेतरी बाहेर करतो. हा आमचा नेहमीचा दिनक्रमच झाला आहे. माझ्या नोकरीची शिफ्ट बदलत असल्यामुळे मी कधी दूपारी तर कधी रात्री असे एक टाईम माईंकडे जेवायला जातो. परंतु आमच्या रुममधला विवेक याची चांगलीच जेवणाची पंचायत होते. त्याच्या नोकरीचा टाईम फक्त जाण्याचा ठरलेला असतो परंतु येण्याचा टाईम फिक्स नसतो. सकाळी तो 9 वाजता जातो तर रात्री 10 तर कधी कधी 12 सुध्दा वाजतात त्याला येण्यासाठी आणि इतक्या रात्री कोणतीच मेस चालू नसते. माईंची मेस तर 10लाच बंद होते. त्यामुळे विवेकचे रोजचेच जेवणाची प्रॉबलेम असतात. दूपारचे जेवण तो ऑफिसकडे असलेल्या एखाद्या हॉटेल मध्ये करतो. रात्रीच्या जेवणाची पंचाईत होते म्हणूतो सागरला फोन करुन डब्बा आणायला सांगतो. डब्बा म्हणजे जेवणाचे पार्सल. परंतु त्याची आवडती मेस ही सुध्दा 10 वाजता बंद होते आणि तो बऱ्याच वेळा सागरला फोन करायला विसरतो. त्याला फोन करायचे आठवते तेव्हा जवळपास 10.30 वाजलेले असतात. हे त्याचे नेहमीचेच झाले.
आज सागर, गजानन, मंदार आणि मी आम्ही फिरायला गेलो होतो. रात्र तशी खूप झाली होती. फिरता फिरता सागरने आम्हाला एका पराठा सेंटरवर नेले. मी त्याला विचारले की आपण इथे का आलो आहोत तेव्हा तो म्हणाला, की अरे विवेकसाठी पार्सल घ्यायचे आहे. तीथे पराठा 20 रु पासू 35 रु. फक्त एक पराठा मिळायचा. पुण्यात सर्वच गोष्टी महाग आहेत. आणि खाण्या पिण्याच्या गोष्टी तर खूप महाग. म्हणजे तूम्ही जास्त पैसे देऊन थोडेसेच खायला मिळणार असे. विवेकचा पगार सुध्दा असा खूप काही नाही. त्याच्या या रोजच्या जेवणाचे पैसे खर्च करुन त्याला किती उरतात ते देव जाणे. परंतु त्याचा हा रोजचाच दिनक्रम आहे. कधी तो लवकर आला तर मग तो त्याच्या आवडीच्या मेस वर जेवायला जातो. परंतु असे फार क्वचीतच घडते. आणि आज हा महागडा पराठा. मी सागरला एक उपाय सुचवला की, आपण त्या चायनिज गाडीवरचे फ्राईड राईस घेऊ. तसे विवेकला भात खूप आवडतो. आणि ते फ्राईड राईस एका प्लेट मध्येच खूप येते. त्यामुळे मी सागरला फ्राईड राईसच घेण्यास सांगितले. सागरला सुध्दा हा उपाय आवडला. त्याने विवेकला फोन लावला आणि विवेकने सुध्दा होकार दिला. मग आम्ही त्या राईसचे पार्सल घेऊन घराकडे निघालो.
घराकडे निघताना पुन्हा प्रश्न पडायला लागले की, आज विवेक वर असा प्रश्न आला आणि तो नोकरीला असल्याने त्याला हे जेवण सुध्दा परवडणारे होते. परवडणारे म्हणजे तो याचा खर्च उचलू शकतो. परंतु आज या मोठ्या शहरात असे हजारो कुटूंब, मुले, मुली आहेत ज्यांना एकवेळचे जेवण मिळवण्यासाठी सुध्दा काय धडपड करावी लागते. परंतु एवढी धडपड करुन सुध्दा त्यांना मिळणारा मोबदला या महागाईचा सामना करु शकत असेल का.. का त्यांना त्यांच्या जवळ असलेल्या पैशातून दोन दिवसातून एकदाच जेवण करावं लागत असेल. कारण पुण्याची महागाई ही तर औरंगाबादच्या महागाई पेक्षा सुध्दा डबल आहे. आणि गरीबांना मिळणारा मोबदला हा जवळपास सारखाच असतो. त्यामुळे ते या ठिकाणी कसे काय जगत असतील हा विचार मला सतावू लागला. आज मोठ्या शहरात कुपोषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचे एक कारण म्हणजे ही महागाईच आहे. काय होईल या शहराचे, देशाचे आणि या देशात राहणाऱ्या गरीब जनतेचे..
प्रत्येक जण आपण व्यवस्थित आहोत ना मग जगाची चिंता कशाला करायची हाच विचार करत असतो.. तसेच काही आमचे सुध्दा झाले असावे.. आम्ही सुध्दा असेच पार्सल कधीतरी आणतो जेवतो आणि शांतपणे झोपून राहतो.. आमचं पोट भरलं ना बस्स..मग..

...फक्त अठरा वर्षांपूढील लोकांसाठी! (01 July 2011)

...फक्त अठरा वर्षांपूढील लोकांसाठी!

पुण्यात सर्वात जास्त मुले मुली हे शिक्षणासाठी येतात. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे नोकरीस येणाऱ्या मुलामुलींचा. आईवडील आपल्या मुलामुलींना येथे चांगले व दर्जेदार शिक्षण मिळते म्हणून पाठवतात. अनेक पालक आपल्या मुलांना एक चांगले आयुष्य मिळावे यासाठी धडपडत असतात आणि त्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. मग मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना आपल्या हृदयाच्या तुकड्याला म्हणजेच मुलगा अथावा मुलगी कोणी असो त्यांना शिक्षणासाठी दूर असलेल्या मोठ्या शहरांत पाठवावे लागते. महाराष्ट्रात तर शिक्षणासाठी पुणेच सर्वात जास्त प्रसिध्द आहे. पालकांचे आपल्या पाल्याकडून अनेक स्वप्न असतात. स्वतःच्या पोटाला मारुन अनेक पालक आपल्या दूर असलेल्या पाल्याच्या सर्व गरजा पुर्ण करण्यास धडपडत असतात. आपल्या मुलाला/मुलीला काहीच कमी पडायला नको अशी त्यांची भावना असते आणि त्यासाठी ते दिवसरात्र कष्ट घेत असतात.

आज मी इथे नोकरीला असल्यामुळे मी सुध्दा माझ्या आईवडीलांपासून थोडा दूरच आलो होतो. इथे आल्यापासून मला विशालचा अनेक वेळा फोन येऊन गेला. विशाल हा माझा औरंगाबादचा मित्र. मित्र काय तर लहान भावा सारखाच. तो माझ्या घरासमोर राहतो. लहानपणा पासूनची आमची ओळख. जसा सागर आणि मी तसाच मला विशाल. तो सुध्दा येथे एका कंपनीत सेफ्टी ऑफिसरचा जॉब करतो. तो माझ्या आधीपासून पुण्यात आहे. तो मला नेहमी औरंगाबादला असताना म्हणायचा की, एकदा पुण्याला येउन जा. माझ्याकडे रहायला ये! परंतु मला तेव्हा कधी ते जमले नव्हते आणि आता तर मी पुण्यातच रहायला असून सुध्दा मला ते जमत नव्हते. कारण त्याला रविवारी सुट्टी असायची आणि मला मंगळवारी. त्यातल्यात्यात त्याचे घर आणि जॉब पिंपरीमध्ये म्हणजे पुण्याच्या बाहेर त्यामुळे आमची भेट होणे जवळपास अशक्यच व्हायचे. परंतु आज संध्याकाळी मला त्याचा फोन आला. तेव्हा 8 वाजायचे होते. 8 वाजता माझे ऑफिस सुटणार असल्याने मला त्याला भेटणे शक्य होते. तो मला भेटायला बोलवत होता. तो म्हणाला की, मी जंगली महाराज रोडवर आहे, तु ये ईकडे भेटायला. मला जंगली महाराज रोड माहित होता परंतु ऑफिसकडून तेथे जाण्याचा मार्ग मला निट माहीत नसल्यामुळे मी त्याला जवळच असलेल्या झेड ब्रीजवर थांबायला सांगितले. त्याने ठिक आहे म्हणून फोन ठेवला आणि मी सुध्दा काम संपवून त्याला भेटायला निघालो.
झेडब्रीज म्हणजे पुण्याच्या कॉलेज कपल्सचा आवडते ठिकाण. तसे मी इथे आल्यापासून अनेकांनी मला झेडब्रीजचे अनेक किस्से सांगितले होते. त्यामुळे झेडब्रीजचे आकर्षण माझ्या मनात न कळत वाढत होते. दोन वेळेस झेड ब्रीजला भेट दिल्यामुळे झेड ब्रीज पहाणे झाले होते परंतु ते ही खुप रात्री. झेड ब्रीज म्हणजे पुण्यातील वाहतूकीची कोंडी होत असल्यामुळे सदाशिव पेठ मार्गे स्वारगेट कडे जाणाऱ्या रस्त्याला एक पर्याय म्हणून झेड ब्रीजचा निर्माण करण्यात आला. झेड ब्रीज हा केवळ दूचाकी वाहनांसाठी असून यात दूचाकी वाहनांना येण्या व जाण्यासाठी मार्ग आहेत. मार्गांच्या दोन्ही बाजूला पायी चालणाऱ्यांसाठी वाट असून येणाऱ्या व जाणाऱ्या रस्त्याच्या मध्ये दुभाजक (डिव्हायडर) आहे. झेड ब्रीज हा मुठा नदीवर बांधण्यात आला असून त्याचा आकार झेड सारखा असल्यामुळे त्याला झेड ब्रीज हे नाव पडले. हा त्याचा इतिहास.
मी मागे रात्री एकदा झेड ब्रीजवर गेलो होतो तेव्हा तेथे एक पोलीसाची गाडी गस्त घालताना दिसली होती. ती एकच चारचाकी सुमो त्या झेड ब्रीज वरुन जाताना दिसली होती. त्यावेळेस मला त्याचे कारण समजू शकले नाही. नाहीतरी मोठ्या शहरात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त घालतच असतात.
असो....
मी विशालला भेटायला भरभर चालत झेड ब्रीज पर्यंत पोहचलो. रस्त्यावर वाहतूक असल्यामुळे मी ब्रीजच्या पायी चालण्यासाठी असलेल्या फुटपाथ वरुन जात होतो. मध्येच काही ठिकाणची लाईट बंद असल्यामुळे तेथे काळोख होता. चालता चालता अनेक जोडपी (कपल्स) तेथे बसलेली दिसू लागली. रस्त्याच्या कडेला फुटपाथकडे तोंड करुन ही कपल्स बसलेली होती. आणि काही कपल्स फक्त बसलेली नसून काही तरी अश्लील चाळे करताना सुध्दा आढळली. इतके दिवस मित्रांकडून, इतरांकडून ऐकलेल्या गोष्टी आज पहायला मिळत होत्या. मी तसाच पुढे पुढे जात होतो. माझी नजर विशालला शोधत होती. परंतु या ठिकाणी दोन्ही बाजूच्या फुटपाथवर ही अनेक जोडपी बसलेली आढळली. प्रत्येक जण काही ना काही करत होता. कोणी गळ्यात हात घालून बसलेले होते तर कोणी काय... मला त्या फुटपाथ वरुन चालायला लाज वाटायला लागली म्हणून मी दोन्ही रस्त्यामधील दुभाजकावरुन चालू लागलो.
विशालला फोन केला व मी दिसतोय का विचारले. त्याने होकार दिला आणि ब्रीजच्या शेवटी एका कोपऱ्याला तो बसलेला दिसला. अनेक दिवसांनी झालेली भेट खरंच खुप छान होती. आम्ही दोघांनी जेवण केले. खुप गप्पा मारल्या. रात्री 10 वाजले आम्हाला निघायला. त्याने गाडी आणल्यामुळे तो गाडी घेऊऩ निघून गेला परंतु मी पायीच होतो. मी घराच्या रस्त्याने वळालो. घराकडे जात असताना मागे असलेल्या झेड ब्रीजकडे पुन्हा एकदा नजर फिरवीली आणि मनात अनेक प्रश्नांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. वाटायला लागले की, आईवडीलांनी आपल्या मुलीला/मुलाला इथे इतक्या लांब शिकायला पाठवले होते हे विसरलेत का ही मुलं. आपण काय करतोय याचे थोडे सुध्दा भान नाही का त्यांना. इतक्या विश्वासाने मुला मुलींना इतक्या दूर ठेवणाऱ्या पालकांना जेव्हा हे कळेल की माझा मुलगा/मुलगी रस्त्यावर असी कामं करतात तेव्हा त्यांना काय वाटेल. स्वातंत्र दिले म्हणजे ते असे वापरावे का.. ठिक आहे मी मान्य करतो की हे वय असचं असतं, या वयात हे होतचं असत. परंतु ही अशी लाज सोडून रस्त्यावर करण्यापर्यंतची मजल जाणे म्हणजे काय.. तुमच्या भावना तुम्हाला आवरता येत नसतील तर पटकन लग्न करुन मोकळे व्हा. हे काय सार्वजनिक ठिकाणाचा गैरवापर करत आहेत. इतरांना त्या फुटपाथवरुन चालत जाण्याची लाज वाटेल इतकी कशी लाज सोडून वागतात ही मुलं.
ज्या उद्देशाने हा ब्रीज बांधण्यात आला तेव्हा त्या बांधणाऱ्या इंजीनीअरने सुध्दा अशी कधी कल्पना केली ऩसेल की, या पुलाचा असा सुध्दा वापर केला जाऊ शकेल. ते फुटपाथ बनवण्या मागचे कारण हे होते की, पायी जाणाऱ्यांना या दुचाकींचा त्रास होऊ नये परंतु इथे तर दुचाकीचा त्रास होणे दूर तर त्या जोडप्यांचा त्रास नागरीकांना होत आहे. मला तर वाटते वयस्कर लोक आवर्जून हा रस्ता टाळत असतील. हे जर असच चालू राहीले तर पुढे काही दिवसांनी या ब्रीजच्या दोन्ही बाजूस एक पाटी लावावी लागेल... ती म्हणजे फक्त अठरा वर्षांपूढील लोकांसाठी....
खरंच लोक कशाचा कसा फायदा घेतील काहीच सांगता येत नाही...