Thursday, July 7, 2011

कोण चुक कोण बरोबर...! (06 July 2011)

कोण चुक कोण बरोबर...!
मला नेहमी एक प्रश्न पडतो काही लोकांच्या बाबतीत, की लोक मैत्री कशी काय विसरतात. खरंतर मैत्रीचेच नाते एक असे आहे की, ते इतर सर्व नात्यांपेक्षा खूप मोठे मानले जाते. मैत्रीची व्याप्तीच इतकी मोठी आहे की, इतर सर्व नाते त्यासमोर गौण ठरतात. ज्या मनुष्याला जास्त मित्र आहेत तो खरा श्रीमंत मनूष्य मानला जातो. संपत्ती काय कपाटात ठेवायची असते. परंतु मैत्री ही हृदयात ठेवायची असते. त्यामुळे जितके जास्त मित्र तितके जास्त तुमच्या हृदयात लॉकर. त्यामुळे ज्याला मित्र-मैत्रीण नाही त्यापेक्षा दूसरा गरीब माणूस कोणी नसेल असे मी तरी मानतो.
मला खूप मित्र-मैत्रीणी आहेत. शाळेत असताना मी खूप शांत असायचो. मी जास्त हूशार नसल्याने मागच्या बाकावर बसायचो. बाकावरील मित्र तेच माझे एक-दोन मित्र बस तेवढेच.. हे असं चक्क 12 वी पर्यंत चाललं. पण पुढे बी.. ला प्रवेश घेतला आणि तेथून माझ्या मैत्रीच्या बॅंकेत अनेकांनी खाती उघडली आणि त्यातील बरीचशी खाती आजता गायत चालू आहेत. बी.. मध्ये मी बोलका झालो. तोपर्यंत माझ्यातील विनोदी वक्ता जागा झाला होता. अनेक मित्र आणि त्याहून अधिक मैत्रीणींचा लवाजमा घेऊन मी बी.. ला फिरत असायचो. शितल, सुनिल, रवी, भास्कर, चंद्रशेखर, शितल, अर्चना, मधूकर, कल्याणी असे खूप सारे मित्र मैत्रीण माझ्या अवती भोवती असायचे. माझा संगीत विषय असल्याकारणाने तीथे मुलींची संख्या खूप जास्त होती आणि मुलांची बोटावर मोजण्या इतकी. त्यामुळे माझ्या मित्रांच्या यादीत मैत्रीणीच खूप होत्या. त्यातल्या बऱ्याच जणींचे लग्न झाले आणि काही जणींचे काय झाले हे माहीत नाही, म्हणजे त्यांची आठवण आहे परंतु त्यांनीच कॉन्टेक्ट तोडला होता माझ्याशी. त्यातलीच एक म्हणजे सायली.
माझ्या बी..च्या दूसऱ्याच वर्षाला सायली कॉलेज सोडून निघून गेली. एक वर्ष आम्ही खूप धम्माल केली होती. ती जरी आमच्यात मिसळत नव्हती तरी संगीताच्या लेक्चरला आम्ही खूप मज्जा करायचो. आमचा एक ऑर्केस्ट्रा होता. म्हणजे आम्ही सर्व संगीत विषयाचे विद्यार्थी लेक्चर संपले की, पेटी, तबला घेऊन पिक्चरची गाणी म्हणत बसायचो. सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत आमचा हा धिंगाणा चालू असायचा. त्यात सायली सुध्दा सामिल व्हायची. परंतु दुसऱ्या वर्षी ती निघून गेली. नंतर मला कळाले की, ती औरंगाबादला तीच्या आत्याकडे राहायची. ती मूळची पुण्याची होती. ती पुन्हा घरी आली होती पुण्यात. पुण्यात येऊन तीने इंटेरीयर डेकोरेशनचा क्लास लावला होता. एवढ्या पर्यंतच मला तीची माहिती होती. नंतर कोणी तिचा विषय सुध्दा काढला नाही आणि तीने सुध्दा कोणाशीच कॉन्टेक्ट ठेवला नाही. कारण काय होते याचे माहित नव्हते. परंतु मला ती अधूनमधून आठवायची.
चालत असतं अस कधी कधी.. असो..
आज माझ्या ऑफिसचा टाईम हा संध्याकाळी 4 ते रात्री 12 होता. मी लवकरच घरुन निघालो. ऑफिसात जाऊन ब्लॉग अपडेट करायचा होता त्यासाठी मी 3. वाजताच जायचे ठरवले. मी भरभर जात होतो. शेवटी ऑफिसच्या जवळ असलेल्या फुटपाथ वरून मी निघालो. पुण्यात रहदारी खूप असल्याने प्रत्येक जण या फुटपाथचा वापर करतो. तसेच मी ही केले. फुटपाथच्या एका बाजूला दूकाने होती आणि दूसऱ्या बाजूला रस्ता. रस्त्याकडे काय पहायचे म्हणून मी दूकानाकडे पाहत निघालो. तर मध्येच एका स्टेशनरी दूकानात एक चेहरा ओळखीचा वाटला. ती म्हणजे सायली. तशी ती मला दोन तीन वेळा दिसली होती. मी जास्त काही लक्ष दिले नव्हते त्यावेळेस, शिवाय त्या दूकानात एक वयस्कर मनुष्य सुध्दा असायचा; तिचे वडील असतील ते. आज तसे दुकानात तिच्या शिवाय कोणी नव्हते. मी तीला पाहिले आणि तसाच पुढे गेलो पुन्हा वाटले की, नाही आपण आज बोलायला हवे. परंतु एक मन म्हणत होते ती विसरली असेल मला. 7 वर्षा पूर्वीची गोष्ट म्हणजे 2004 ची गोष्ट आणि आता 2011. कोण लक्षात ठेवणार एवढ्या जून्या गोष्टी शिवाय ती एकच वर्ष होती आणि आमच्यात जास्त मैत्री नव्हती. त्यामुळे मन घाबरत होते तिच्याशी बोलायला. तरीही एकदा प्रयत्न करुन बघूच म्हणून मी दूकानाकडे निघालो. खिशात पैसे होते वाटलं काही तरी पेन, पेन्सील घेऊयात. जर तीने ओळखलं तर ती विचारेल आणि नाहीच ओळखलं तर आपण पेन घेऊन निघून जाऊ. मग ठरलं. मी पैसे घेऊन तीच्या दूकानासमोर उभा झालो. तितक्यात एक गिऱ्हाईक आलं आणि ती थोडी बिझी झाली. तिने मला पाहिले की नाही माहित नाही परंतु ती त्या गिऱ्हाईकाशीच जास्त बोलत होती. थोड्यावेळाने ते गिऱ्हाईक निघून गेले आणि ती म्हणाली, काय राहूल कसा आहेस.. इकडे कस काय. मी खिशातील पैसे खिशातच ठेवले. मनाला आनंद झाला की तिने मला ओळखले. मग काय गप्पा सुरू झाल्या. मी सांगितले की, मी सकाळ पेपर मध्ये जॉईन झालो आहे इथेच राहतो वैगेरे वैगेरे.. मी तीला विचारले की, तू मध्येच बी.. सोडून इकडे का आलीस आणि नंतर कोणाशी कॉन्टेक्ट ठेवलास की नाही. तेव्हा ती बोलली अरे मला अडीच वर्षाची मुलगी आहे. मी औरंगाबादवरुन इकडे येऊऩ इंटेरीअरचा क्लास केला नंतर जॉब केला. काही वर्षातच माझे लग्न झाले. संसारात अडथळा नको म्हणून मी कोणाशीच कॉन्टेक्ट ठेवला नाही. कारण मग मैत्रीला आणि सासरच्यांना संभाळायला खूप अवघड जात. त्यामुळे मी मुलांशी तर सोडच परंतु माझ्या जवळच्या मैत्रीणींशी सुध्दा कधी संपर्क साधला नाही. तीचे बोलणे मला कळाले नाही. परंतु तीचे बरोबर असेल असं वाटलं थोडा वेळ. मला ऑफिसला उशिर होत होता म्हणून थोड्या वेळाने मी तेथून निघालो.
तिच्या दूकानापासून ऑफिसचे अंतर केवळ दोन मिनिटाचे परंतु या दोन मिनिटात मला असंख्या प्रश्नांनी वेढले. वाटलं तीचे उत्तर बरोबर होते का?, सायलीने जो मार्ग निवडला होता कॉन्टेक्ट न ठेवण्याचा तो बरोबर होता का? ती कसे काय सर्व मित्र मैत्रीणींना विसरु शकते. जरी तीला सर्वांची नावे माहित असतील तरीही सात वर्षे ती कोणाशीच का बोलली नाही. खरचं का संसारात मैत्री अडसर बनते का? आणि मैत्री ही इतकी शुल्लक असते का की, ज्याला इतक्या सहज नाकारता येईल. जर तिने सर्वांशी मैत्री ठेवली असती तर खरचं का तीच्या सासरवाडीत प्रॉब्लेम झाले असते. मुलांशी बोलली नाही एकवेळेस तर ठिक आहे परंतु मैत्रीणींशी सुध्दा संपर्क तीने का तोडावा? बर मैत्री ही मैत्रीच असते तीचे सर्व प्रॉब्लेम तीच्या मित्र मैत्रीणींनी समजून नसते घेतले का?
अशा अनेक प्रश्नांनी माझ्या डोक्याला भंडावून सोडले होते.
शेवटी काय,
वाटलं, ती तिच्या ठिकाणी बरोबरच असेल आणि मी माझ्या ठिकाणी. कारण जगात कोणीच चुकीचा नसतो. प्रत्येक जण स्वतःच्या ठिकाणी बरोबर असतो. फक्त आपल्या सारखी लोकं त्यांना चुकीचे ठरवत असतात. कारण आपल्याला त्यांची परिस्थिती माहित नसते. त्यांनी घेतलेला निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला आहे, त्यामागचे मुळ कारण काय आहे हे आपल्याला माहित नसते आणि आपण दूसऱ्याला चुकीचे ठरवून मोकळे होतो, असे अनेकजण करत असतात. ते ही त्यांच्या ठिकाणी बरोबर असतात. एखाद्यावेळेस तेही चुक असू शकतील.
माहीत नाही. नेमके काय. कोण बरोबर आहे आणि कोण चुक! पण हे असेच चालू असते जीवनभर...

No comments:

Post a Comment