एफ.सी. रोड व हत्ती... पुण्यात गणपतीला खुप मान आहे. गणेश उत्सवाच्या वेळी पुण्याची खरी रौनक बघावयास मिळते. अनेक शहरांतून लोक फक्त येथील गणेश उत्सवाचे देखावे पाहण्यास, येथील मुर्त्यापाहण्यास, गणपतीचे दर्शन घेण्यास येतात. लोकमान्य टिळकांनी पुण्यातच पहिल्यांदा सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली होती आणि तेव्हा पासून ते आजतागायत हा उत्सव तितक्याच धूमधडाक्यात आणि तेवढ्याच श्रध्देने येथे मनवला जातो. युवक युवतींची झुंबडच्या झुंबड गणेश उत्सवादरम्यान रात्री उशीर पर्यंत शहरातील रस्त्यांवर वावरतांना दिसतात. त्यांच्यासाठी हा गणेश उत्सव म्हणजे गंम्मत जंम्मत, मौज मजा करण्याची एक पर्वणीच असते. मी आता पर्यंत पुण्यात कधी गणेश उत्सवाला आलो नव्हतो. परंतु याबाबत बरेच काही ऐकून होतो. या वर्षी पहिल्यांदा मी येथील गणेश उत्सव पाहणार आहे.. त्यामुळे माझी उत्सूकता डबल झाली आहे.
ऑफिसला जाताना एफ.सी. रोड वर आज काल एक मित्र रोज भेटतो. अनेकजण त्याला पाहून आनंदीत होतात. त्याचे ते भव्य शरीर, ते दिमाखात चालणं, येणाऱ्या जाणाऱ्यांचे सहजच लक्ष वेधून घेते. मी सुध्दा त्याला पाहून थोडा आनंदीत होतो आणि मग पुन्हा अनेक विचारांनी मनात काहूर उठतं.
माझा हा मित्र म्हणजे एक हत्ती.. एफ. सी. रोडवर एक माहूत रोज त्या हत्तीला घेऊन निघतो. माझी ऑफिसला यायची वेळ आणि त्यांची घराबाहेर पडण्याची वेळ कदाचीत एकच असावी. म्हणून रोज आमची नजरा नजर होते. एफ.सी. रोडवर फर्ग्यूसन कॉलेज आहे तसेच हा रोड पुण्याच्या श्रीमंतीची तसेच सौंदर्याची खरी शान आहे. त्यामुळे येथे तरुण तरुणींची वर्दळ कायम असते. हा हत्ती आला की अनेक तरुण तरुणींचे हात आपल्या मोबाईल कडे वळतात आणि या हत्तीचे भव्य रुप आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये बंद करण्याचा मोह त्यांना आवरत नाही. अनेक मुलींना या हत्तीची भिती तर वाटते परंतु त्याच्या सोबत फोटो काढण्याचा मोह न आवरल्यामुळे लांबूनच का होईना पण त्याला आपल्यासोबत कॅमेऱ्यामध्ये बंद करण्यास त्यांची धडपड चालू असते. त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. परंतु हे सर्व बघत असताना एका गोष्टीची सारखी जाणीव होते, ती म्हणजे त्या हत्तीच्या स्वातंत्र्याची. त्याच्या अस्तीत्वाची.
हत्ती हा प्राण्यांमधील सर्वात मोठा तसेच सर्वात शक्तीशाली प्राणी आहे. त्याच्यासमोर चांगल्या चांगल्यांचा निभाव लागत नाही. परंतु वाढत्या नागरीकरणामुळे, जंगल तोडी मुळे त्यांचे जंगलातील अस्तीत्व धोक्यात आले आहे. जंगलातील हत्तींना मारुन त्यांच्या दातांच्या वस्तूंची मोठी मागणी आहे आणि या वस्तूंसाठी लोक कितीही किंमत मोजायला तयार असतात. तसेच इतर हत्तींच्या पिल्लांना काही लोक पकडून त्यांना प्रशिक्षण देऊन गुलाम बनवतात आणि अशाच हत्तीकडून शहरांमध्ये गावांमध्ये विविध कामं करुवून घेतली जातात. आज शहरांमध्ये फिरणारे हत्तीचे अस्तीत्व हे एका खेळण्यासारखेच झाले आहे. जत्रेत जसे आकाश पाळणे, रात पाळणे असतात, या पाळण्यांमध्ये बसायचे असेल तर १० रु. द्या आणि ते तुम्हाला पाळण्यांची सैर करुन आणतात, तशीच काही गत या शहरातील हत्तींची झाली आहे. रस्त्यातील लहान मुलांना त्यांच्या पाठीवरुन फिरवून माहूत त्यातून मिळालेल्या पैशात स्वतःचे पोट भरतो (आणि कदाचित हत्तीचे सुध्दा).
कॉलेज मध्ये शिकणाऱ्या तरुण तरुणींना या हत्तीला पाहून जो आनंद होतो तो आनंद त्या हत्तीला त्यांच्याकडे पाहून होत असेल का, कॉलेजचे वय हे खेळण्याचे बागडण्याचे वय असते, याच वयात मुले-मुली बहरतात, त्यांच्या आयुष्यातील सर्वात आठवणींचे आणि आनंदाचे दिवस म्हणजे हेच क़ॉलेजचे दिवसं. परंतु अशाच खेळण्या बागडण्याच्या वयात या हत्तीला कोणीतरी जंगलातून पकडून आणलं असेल आणि तेव्हा पासून त्याच्या गुलामगिरीला सुरुवात झाली असावी.
एकीकडे गणेश उत्सवात नाचणारी, गाणारी ही तरुण मंडळी, एकीकडे या हत्तीसोबत फोटो काढण्यास उत्सूक असणारी कॉलेजची मुले-मुली आणि दुसरीकडे हा दुःखी हत्ती आणि त्याचे स्वातंत्र्य. खरंच किती विसंगती आहे या सर्वांत.
No comments:
Post a Comment