पिवळा, हिरवा आणि मेहंदी....
सुट्टीचा वार म्हणजे रविवार. प्रत्येक जण रविवारी काय करायचं याचे प्लान संपूर्ण आठवडाभर करत असतो आणि एखादा तरुण, विद्यार्थी जर नवीन शहरात राहायला गेला तर त्याचे प्लानिंग तर हमखास ठरलेले असते. मग ते कुठे बाहेर फिरायला जायचे असो अथवा आठवडाभर वापरलेले कपडे धूवायचे असो. एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जायचे असो अथवा एखादा चांगला चित्रपट पहायचा असे अनेक बेत नवीन शहरात आलेल्या मित्रामित्रांमध्ये ठरत असतात.
मला मात्र रविवारी सुट्टी नसते. त्यामुळे मला असे बेत ठरवणे काही शक्य होत नाही. तरी चांगले आहे की, माझ्या ऑफिसचा टाईम रविवारी संध्याकाळी 5 ते रात्री 1 असतो. संध्याकाळ जरी माझी ऑफिसात जात असली तरी पूर्ण दिवस माझ्या हातात असतो, त्यामुळे मी सागरला आज कुठेतरी बाहेर जायचे असे सांगितले होते. त्याने पर्याय विचारल्यावर सिंहगडला जायचे म्हटले तर संध्याकाळी 5 पर्यंत येणे होणार नव्हते आणि लोणावळ्याला सुध्दा जायचे म्हणजे तोच प्रॉब्लेम. मग
मीच ठरविले की शहरातल्या शहरात कुठेतरी फिरायचे. एखादा स्पॉट शोधायला लागलो आणि मी नवीन असल्यामुळे मला कोणतेच ठिकाण माहित नव्हते नंतर आठवले की इथे एक सर्वात मोठा मॉल तयार झालाय. त्याचे नाव ‘इशान्य’ मॉल होते. मग तेथेच जायचे ठरले. इशान्यला सागर आणि मी असे दोघेच जाणार होतो. कारण विवेक देल्ही-बेल्ली मुव्हीला जाणार होता आणि मंदारचे काय प्लानिंग आहे माहित नव्हते. त्यामुळे आम्ही दोघांनीच जाण्याचा निर्णय घेतला. सकाळीच मी तयार झालो. सागरला आवरायला थोडा वेळ लागतो म्हणून त्याला मी लवकर आवर असे सांगत होतो. विवेकने मला विचारले तुम्ही कुठे जाणार आहात, तेव्हा मी सांगितले की इशान्यला जाणार आहे.. विवेक लगेच उत्तरला सिंहगड का.. मी म्हणालो अरे नाही इशान्यला जाणार आहे.. विवेक पुन्हा म्हणाला माहिती आहे सिंहगडच की.. असे मग माझ्या लक्षात आले याला इशान्य म्हणजे दिशा वाटत असावी. मग मी लगेच त्याला सांगितले की, इशान्य मॉल ला जाणार आहोत. तेव्हा त्याला समजले.
विवेकचा मुव्हीचा प्लान बारगळणार होता हे माझ्या लक्षात आले होते कारण त्याला कोणीच सोबत नव्हते. त्यामुळे तो आमच्या सोबत येईल असे वाटू लागले आणि झाले सुध्दा तसेच विवेक आमच्या सोबत यायला तयार झाला. मंदारचा काही प्लान नसल्याने तो सुध्दा आमच्या सोबत निघायला तयार झाला. आम्ही आता चौघे झालो होतो. सर्व जण तयार झाले. रविवार म्हणजे सर्वांनाच सुट्टी. त्यातल्यात्यात पुण्यात म्हणजे तरुणांसाठी आणि तरुणींसाठी रविवार हा मजेचा फिरायचा आणि मुले मुली पाहण्याचा वार. त्यामुळे प्रत्येक जण जमेल तेवढे नटून-थटून निघतो. आम्ही मुले असल्याकारणाने आम्ही नटण्यामध्ये काय तर साधा फॉर्मल ड्रेस सोडून फक्त जिन्स आणि टी शर्ट घालणार. तसा फॅशन सेन्स आहे पण तो मेंन्टेन करण्या एवढे पैसे खर्च करणे आम्हाला नाही आवडत. मग आम्ही सर्वांनी टी-शर्ट आणि जिन्सच घातल्या. विवेकचा पिवळा टीशर्ट होता. माझा हिरवा आणि सागरचा मेहंदी कलरचा. मंदारचा तसा पिकट पिवळा होता.. परंतु आमच्या तीघांच्या टीशर्टचे रंग एकदम खुलून दिसायचे. मला आमच्या तिघांवर रस्त्यात एक गाण आठवलं..
अनहोनीला होनी करतो.. होनी ला अनहोनी..
एकाच ठिकाणी जेमल तिघे..
पिवळा, हिरवा आणि मेहंदी....
हे गाणं सर्वांना आवडले की नाही माहित नाही परंतु हे गाणं म्हटल्यावर सर्वजण खूप हसायचे. मंदारच्या टीशर्टचा रंग फिकट असल्यामुळे मला त्याला गाण्यात सामिल करता नाही आलं. कदाचित त्याला त्याच्या शर्टाचा राग आला असावा. कारण त्या गाण्यात त्याला वाळीत टाकल्यासारखं वाटत असावं. मी यावरुन त्याला खूप चिडवायचो. मंदार तू पण एखादा निळा किंवा लाल गडद रंगाचा टिशर्ट घातला असता तर तुला सुध्दा या गाण्यात सामिल करुन घेतलं असतं. तो शांतच बसायचा. काहीच प्रतिक्रीया न देता तो सरळ पुढे चालायचा. मी मंदारला मुद्दाम छेडायचो. नंतर नंतर तर मी मंदारला काही म्हणालो की विवेक मध्येच बोलायचा, जस काय मी त्यालाच बोलल्या सारखे. असे नेहमी होत होते.
आमच्या चौंघांपैकी कोणालाच इशान्य मॉल कुठे आहे हे माहित नव्हते. आम्ही बसने कल्याणीनगर येथे गेलो. त्याच रस्त्यावर मॉल आहे एवढे सागरला माहित होते. परंतु नेमके कुठे हे माहित नव्हते. बस कल्याणी नगरला थांबली. आम्ही चौघे उतरलो आणि रस्त्यावरील एकाला विचारले की, इशान्य मॉल कुठे आहे? त्यानी सांगितले की तुम्ही फार पुढे आलात. मागे शास्त्रीनगरच्या चौकातून उजवीकडे आत तो मॉल आहे. आम्ही सगळे परेशान झालो. कारण मला 5 वाजता ऑफिसला जायचे होते. आता 1 वाजला होता. पुन्हा मागे चालत जा, तेथून इशान्य मॉल खूप लांब होता या सर्वात 4 वाजले असते. मग आम्ही समोरच असलेल्या बिग मार्ट नावाच्या मॉल मध्ये जायचे ठरविले. तो मॉल सुध्दा छानच दिसत होता. मग सर्वांच्या एकमताने आम्ही बिगमार्ट मध्येच गेलो. मध्ये गेल्यावर कळाले की हा मॉल सुध्दा खूपच चांगला आहे. आज तिथे या मॉलमध्ये फॅशन शोची प्रॅक्टीस चालू होती. आम्ही जस्ट आत एन्ट्री केली की समोरच काही सुंदर सुंदर मुली रॅम्पवरुन चालत असताना दिसल्या. मुली म्हणटले की मुलांना तर अजून काय पाहिजे. आणि त्यातल्या त्यात फॅशन शोच्या मुली मग तर विचारुच नका.. तिथे अनेक तरुणांनी तसेच इतर लोकांनी गर्दी केली होती. त्यात मग आम्ही सुध्दा शामिल झालो. ही फॅशन शोची तालीम असल्यामुळे तुम्ही विचार करत असाल तशा तोटक्या कपड्यांतील मुली इथे नव्हत्या. काहींचे कपडे जरी थोडे छोटे असले तरी ते लिमिट मध्ये होते. त्यामुळे कोणीही लाळ गाळायचे काम नाही.
आम्ही सर्वजण त्या रॅम्पच्या बाजूला असलेल्या एका बाकावर बसून ते बघत होतो. नंतर लगेचच वर असलेल्या सिलिंग कडे नजर गेली. तेथे सर्वत्र छत्र्या लावलेल्या होत्या. ह्या छत्र्या याकरीता लावल्या होत्या कारण सध्या पावसाळा ऋतू चालू आहे ना.. त्याचा फिल आणण्यासाठी ह्या छत्र्या त्या मॉलच्या इंटेरीअर वाल्यांनी लावल्या असाव्यात असे वाटले. परंतु त्या रंगी बेरंगी छत्र्यापाहून माझा फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही. मग काय मोबाईल कॅमेऱ्याने जे फोटो काढण्याचे काम सुरु झाले ते काही केल्या थांबले नाही. त्या छत्र्यांनंतर आमच्या मित्रांचे फोटो सेशन, विवेकने तर त्याचा मोबाईल त्या फॅशन शो वाल्या मुलींसाठीच बुक करुन टाकला होता. आम्ही इतरत्र आत फिरत होतो परंतु त्याचे पाय काही त्या फॅशन शोच्या रॅम्प पासून हटत नव्हते. त्याने तर फोटो सोबत चक्क व्हिडिओ शुटींगच केली. मंदारने आपल्या आवडत्या मुलींचे जसे पाहिजे तसे परंतु थोडे फोटो काढले आणि तो पण आमच्यात शामिल झाला. सागर आणि माझे पुण्यातील हे पहिले फोटो होते. तसे सर्वांसोबत फिरण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे प्रचंड आनंद होत होता. अनेक फोटो काढले आणि नंतर आम्ही मॉलच्या बाहेर पडलो. दूपारचे 3 वाजले होते आम्ही बाहेर आलो तरीही विवेक आतच होता त्या रॅम्प समोर. मग त्याला कॉल करुन आम्ही बोलावून घेतले बाहेर.
बाहेर आल्यावर पुढील बेत ठरला तो म्हणजे इशान्य मॉलचा शोध घ्यायचा. माझे मन नव्हते जाण्याचे परंतु इतक्या दूर आलो तर निदान तो मॉल शोधून तर काढू या उद्देशाने आम्ही त्या मॉलच्या शोधात निघालो. शार्प 4 वाजता तेथून निघायचे ठरले कारण माझा 5 वाजता जॉब होता. मग चालत चालत, लोकांना विचारत शेवटी इशान्य मॉल सापडला. मॉल खूपच भव्य होता परंतु त्याचे अजून कन्स्ट्रक्शन पुर्ण झाले नसल्याने तो आम्हाला आकर्षित करु शकला नाही. थोडा वेळ आत फिरल्यानंतर 4.00 वाजता आम्ही बाहेर पडलो. तेथून एकही बस माझ्या ऑफिसकडे जात नव्हती. त्यामुळे आम्ही तीन कि.मी चालून अहमदनगरच्या रस्त्यावरच्या स्टॉपजवळ आलो. त्या बसस्टॉप वरुन सुध्दा एकही बस लागत नव्हती. 4.30 झाले होते. मग मी रिक्षा करुन जाण्याचे ठरविले. एक रिक्षा पकडली आम्ही चौघांनी आणि वेळेच्या आत म्हणजे शार्प 5. वाजता मी ऑफिसात पोहचलो.
आजचा दिवस जरी धावपळीचा गेला असला तरी मला खूप मज्जा करता आली. मना सारखे मित्रांसोबत फिरता आले. आणि रविवारी सुट्टी नसल्याचे दुःख जे होते ते आज नाहीसे झाले. आता मी दर रविवारी असेच छोटे पण गमतीदार बेत आखण्याचे ठरविले आहे...