Thursday, June 30, 2011

झेड ब्रीज (29-06-2011)

झेड ब्रीज
औरंगाबादला असतांना सागर आणि मी आठवड्यातून दोन-तीन वेळेस तरी संध्याकाळी फिरायला जायचो. आमचे फिरण्याचे ठिकाण सुध्दा एकच होतं. घरापासून चालत निघालो की जवळच दोन कि.मी. अंतरावर कॅनॉट गार्डन म्हणून औरंगाबादचे एक प्रसिध्द गार्डन आहे. या गार्डनच्या आवारात खूप मोठे मार्केट आहे, तसेच हे गार्डन औरंगाबादच्या श्रीमंत वसाहतीच्या जवळ असल्याकारणाने इथली संध्याकाळ खूपच निराळी असते. कॉलेजची मुले-मुली, इतर जॉब करणारे सर्व जण इथे जमतात. त्यामुळे कॅनॉट म्हणजे औरंगाबादच्या तरुणांचे विशेष आवडीचे ठिकाण समजले जाते.
मला संध्याकाळ म्हटले की, खूपच कंटाळवाणे व्हायचे, त्यामुळे दररोज संध्याकाळी कोणत्या ना कोणत्या मित्राकडे जात असायचो आणि रात्री 9 पर्यंत पुन्हा घरी यायचो. हा माझा जणू दिनक्रम असायचा. परंतु जेव्हा जेव्हा मी सागर सोबत फिरायला जात होतो त्यावेळेस अनेक नवीन गोष्टी, नवीन विचार, वेगवेगळ्या विषयांवरील चर्चा, वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्वभावाविषयी आमचे मत अशा विविधांगी विषयांवर आमची चर्चा चालायची. सागर माझा लहान पणापासूनचा मित्र. त्याच्या 12 वी नंतरच्या काळात आमची मैत्री जास्त वाढली. वाढली म्हणजे आम्हाला एकमेकांचे विचार कळाले आणि स्वभाव सुध्दा जूळू लागला होता. मी थोडे भरभर आणि वेगळ्याच विचारांच्या गोष्टी करत असतो. सागर हा नेहमी माझ्या सहवासात असल्यामुळे त्याला माझे विनोद, माझे विषय, मला नेमके काय म्हणायचे आहे या सर्व गोष्टी चटकन समजतात. परंतु एखाद्या नवीन मुलाला माझे बोलणे कितपर्यंत समजते कोण जाणे. मला तर वाटते की त्यांच्या डोक्यावरुनच ते जात असावे.
माझ्यातील विचारशक्ती वाढण्याचा काळ आणि सागर व माझी मैत्री वाढण्याचा काळ हा जवळपास एकच होता. माझ्या डोक्यात आलेले विविध विचार मी त्याला सांगत असायचो सुरुवातीला त्याला माझे बोलणे समजत नव्हते परंतु नंतर नंतर त्याला सवयच पडली जणू. आता अशी परिस्थिती आहे की, माझ्या तोंडातून निघालेला एक शब्द मला काय म्हणायचे आहे हे त्याला सांगून जातो. त्यामुळे त्याच्याशी बोलायला मला जरा जास्तच आवडतं. त्याला सुध्दा खूप काही सांगायचे असते. जसा वेळ मिळेल तसा तो मला सर्व सांगत असतो. परंतु तो पुण्यात आल्यापासून आमचा दिनक्रमच बदलला होता. तो मी येण्याच्या 8 महीने आगोदर पुण्याला आला होता. त्यामुळे औरंगाबादला मनमोकळ्या गप्पा मारायला कोणीच नव्हते. मित्र खूप आहेत परंतु त्यांच्याशी त्यांच्या पध्दतीच्या गप्पा माराव्या लागतात. सागर एकच असा होता की, मी ज्याच्याशी सर्व विषयांवरील गप्पा मारु शकत होतो. परंतु तो इथे आल्यापासून माझ्या विषयांना मी मनातील एका कोपऱ्यात बंद करुन ठेवले होते.
मला आज पुण्यात येऊन पंधरा दिवस झाले. त्यातल्या त्यात सागरकडे रहायला असल्यामुळे तर अजूनच चांगले वाटत होते. आम्ही स्वप्नात सुध्दा विचार केला नव्हता की, आम्ही पुन्हा असे एकत्र येऊ. परंतु देवालाच आमची काळजी असावी.
आज माझा दिवस सुरुवातीला थोडा कंटाळवाणाच गेला. ऑफिसात सुध्दा मन लागत नव्हतं. ऑफिस संपताना मी सागरला फोन केला आणि त्याला ऑफिसकडून यायला सांगितले. त्याच्याकडे गाडी असल्यामुळे तो मला बऱ्याचवेळा माझ्या ऑफिसकडून पिकअप करतो. त्याचा घरी जाण्याचा रस्ता तसा वेगळा आहे परंतु तो माझ्यासाठी पुण्याला फेरी मारुन येतो. आज सुध्दा तो आला होता. रात्रीचे 8.30 वाजले होते. मी सुध्दा ऑफिसातून बाहेर पडलो. आम्ही दोघे घरी आलो आणि लगेचच मेस मध्ये जेवायला गेलो. जेवण झाल्यावर मला थोडे फिरावेशे वाटले मी सागर आणि आमच्या सोबत अजून एक मित्र होता मंदार त्याला फिरायला जाऊ असे सांगितले. दोघांनी होकार दिला आणि आम्ही झेड ब्रीजच्या दिशेने निघालो.
झेड ब्रीज म्हणजे पुण्याच्या तरुणांचा जमायचा कट्टा. परंतु इथे जोडपेच जास्त असतात असे म्हणतात. मी आज दूसऱ्यांदा झेड ब्रिजवरुन जाणार होतो. पहिल्या वेळेस म्हणजे काल अभिषेक सोबत पावसात भिजत आलो होतो आणि आज सागर सोबत. माझा फिरायला जायचा उद्देश म्हणजे सहज थोडे मन मोकळे करावे तसेच मंदार सोबत सुध्दा बोलणे होईल, ओळख वाढेल अशा उद्देशाने मी फिरायला निघालो. सागर सोबत फिरताना मला तर औरंगाबादचेच दिवस आठवले. तशाच गप्पा, गोष्टी, विनोद चालू होते आमचे. परंतु मंदार एक शब्द सुध्दा बोलायला तयार नव्हता. का कुणास ठाऊक काय झाले होते त्याला. एरवी वाड्यात तो माझ्या रुममध्ये येऊन बोलत असतो. परंतु इथे तो जाणून बुजून शांत होता असे वाटत होते. माझा त्याला राग आला होता का, अथवा त्याला माझे विनोद आणि सागरच्या-माझ्या गप्पा आवडल्या नसाव्यात. मी तरी त्याला अधून मधून बोलायचो, त्याला बोलते करायचे प्रयत्न करायचो परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. माहित नाही त्याच्या मनात काय होते ते. तो शेवटपर्यंत जास्त बोललाच नाही. पण मी आणि सागरने खूप मनसोक्त आनंद घेतला त्या रात्रीचा. पुन्हा पहिले दिवस आठवले. तशीच रात्र, आम्ही दोघं, अनेक विषय तसेच विनोद, हास्य कल्लोळ, टॉन्ट पास करणे अनेक जून्या गोष्टी आज आठवत होत्या. खरंच आजचा दिवस एक छान आठवणीत राहणारा दिवस होता.

Wednesday, June 29, 2011

भेट (28 June 2011)

भेट
माझ्या आयुष्यात सर्वात मोठा बदल झाला तो म्हणजे माझ्या एम.एस.डब्ल्यू. नंतरच. एम.एस.डब्ल्यूच्या आधी मी एका वेगळ्याच मार्गावर वावरत होतो परंतु एम.एस.डब्ल्यू. मधील काही प्रसंग, घटना, आठवणी यांनी माझ्या आयुष्याला जे वळन दिले ते खरचं महत्वाचे होते. एम.एस.डब्ल्यू. नंतर मला माझ्या जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळाली होती अथवा त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यास एम.एस.डब्ल्यू. मध्ये मला मार्ग सापडला. याच काळात मी पहिल्यांदा प्रेमात पडलो आणि त्या प्रेमातून सुध्दा खूप काही शिकलो. तसे माझे एकतर्फी प्रेम होते. परंतु त्या व्यक्तीने मला या दोन वर्षात जे काही करायला भाग पाडले अथवा त्याच्यासाठी मी ज्या काही परिस्थितींना तोंड दिले त्यातून माझ्या जीवनाला एक वेगळे आणि चांगले वळण मिळाले त्यासाठी त्या व्यक्तीचा मी आयुष्यभर ऋणी आहे. या प्रेमामुळेच किंवा त्या व्यक्तीमूळे जो मी स्वतःच्या शोधात पडलो तेव्हा पासून ते आतापर्यंत मी स्वतःला खूप काही शोधले आहे. मला माझ्यातील चांगल्या तसेच वाईट गोष्टी दिसायला लागल्या. प्रत्येक मित्र, मैत्रिण तसेच इतर व्यक्ती यांच्याकडून चांगले काय घेता येईल याची सवय लागली. तसेच मनात जास्त विचार केल्यामुळे अनेक प्रश्न उभी राहत होती त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला मिळाली. जसे की, स्वतःतला आत्मविश्वास, दूरदृष्टीकोन, सकारात्मकता, व्यवहारीकता, वेळेचे नियोजन, (माणसे ओळखणे) मानसशास्त्र, इतरांना समजून घेणे, राग न करणे, इतर अशा खूप काही गोष्टी शिकण्यास मिळाल्या.
याच एम.एस.डब्ल्यूच्या दोन वर्षा दरम्यान माझी अजून एक मैत्रीण झाली होती. राखी. राखी असे तिचे नाव होते. ती खूप हूशार, स्वच्छंदी तसेच कलाकार वृत्तीची असल्यामुळे तीची माझी मैत्री खुप लवकर झाली. आम्ही जास्त बोलत नसलो तरी एकमेकांना समजून घेण्यात हूशारच होतो. शेवटी एक कलाकारच कलाकाराच्या भावना समजू शकतो हे खरेच आहे. आमच्या मध्ये एक गोष्ट कॉमन अशी म्हणजे आम्हा दोघांना इंटेरिअर डेकोरेशनचा क्लास करायचा होता. परंतु आम्ही दोघं ते न करता इथे एम.एस.डब्ल्यू. ला होतो. बरं झालं त्या निमित्ताने एक चांगली मैत्रीण तरी भेटली होती. तिला सुध्दा चित्रकलेची खूप आवड होती आणि क्रीएटीव्हीटी ही माझ्यापेक्षा थोडी तिच्यात जास्त होती. तिची एक गोष्ट खूप चांगली होती ती म्हणजे कोणतीही छोटे अथवा मोठे काम ती अगदी मन लावून बारकाईने व जितके चांगले करता येईल तितके चांगले करण्याचा प्रयत्न करत असायची. माझा हाच विक पॉईंट होता की, माझ्यात पेशन्स खूप म्हणजे खूप कमी होते. मी कोणतेही काम लवकरात लवकर संपवून मोकळे व्हायचे बघत असतो. मला माझ्यातील ही कमतरता माहीत होती. त्यामुळेच तिची ही गोष्ट मला खूप आवडायची. तिच्यासोबत मी एक दोन कार्यक्रमात सहभागी झालो असल्याने मला तिच्याकडून ह्या गोष्टी शिकता आल्या. आम्ही दोन वर्षात कुठेच फिरलो नाही, अथवा जास्त बोललो नाही. खूप आठवणीत राहतील अशी कोणतीच घटना आमच्यात घडली नाही. परंतु आम्ही चांगले मित्र-मैत्रिण होतो मी हे आवर्जून सांगेन.एम.एस.डब्ल्यू. च्या दोन वर्षानंतर ऱाखीने लग्न केले. तिचीसाठी अजून एक चांगली गोष्ट म्हणजे तीचे ज्या मुलावर प्रेम होते त्याच्याशीच तिच्या घरच्यांनी लग्न लावून दिले. आणि आता ते दोघे पुण्यातच स्थायिक झालेत.

आज माझा पुण्यातला तेरावा दिवस आणि दूसरा मंगळवार. मला मंगळवारी सुट्टी असते असे सांगितले तर माझे सर्व मित्र माझ्यावर हासतात. अभिषेक तर म्हणतो, मी लोकांना सोमवार ची सुट्टी, शनिवार, शुक्रवार इथपर्यंत की गुरुवारची सुट्टी सुध्दा ऐकली ही मंगळवारची सुट्टी जरा अजबच आहे. असे म्हणून ते माझी खूप मजा उडवतात. मी सुध्दा त्यांच्या मजे मध्ये सहभागी होऊन त्या क्षणाचा आनंद घेतो. आज पुन्हा सुट्टी असल्यामुळे मी आदोगरच काही प्लान करुन ठेवले होते. काल जीमेल वर चॅटींग करत असताना अचानक माझी मैत्रीण राखी भेटली. तीला मी पुण्याला आलोय असा मेल केला होता परवा. आणि काल अचानक ती ऑनलाईन दिसली. चॅटींगवर बोलता बोलता उद्या सुट्टी असल्याचे तीला सांगितले. उद्या भेटायचा प्लॅन ठरला. सकाळी फोन आला की दू. १ वाजता एस.पी. कॉलेज कडे भेटायचे ठरले. मी तयार होऊन तिला भेटायला गेलो. आज पुण्यात मी पहिल्यांदा माझ्या एम.एस.डब्ल्यू. मैत्रीणीला भेटणार असल्याने मला खूप आनंद होत होता.
मी एस.पी. कॉलेजसमोर उभा होतो. तीने रस्त्याच्या दूसऱ्या बाजूने मला आवाज दिला. आम्हा दोघांना एकमेकांना पाहून पुन्हा एम.एस.डब्ल्यू. चे जूने दिवस आठवायला लागले. आम्ही दोघे मग नाश्ता करायला गेलो. तिथेच सर्व मित्र-मैत्रीणींची खुशहालीची विचारपूस करत आमचा नाश्ता झाला. अनेक जून्या आठवणी, गमतीदार किस्से, तसेच इतर गोष्टींच्या आठवणींची गर्दी विषयांमध्ये होत होती. एक एक करत सर्व गोष्टींवर चर्चा झाली. तेरा दिवसांमधला आज तिसऱ्यांदा खूप छान दिवस वाटत होता. पहिले दोन दिवस तर घरच्यांना भेटलो होतो आणि आज राखी. एकंदरीत आजची सुट्टी कामाला आली होती. नंतर एक तासानंतर ती तिच्या कामावर निघाली आणि मी माझ्या घराकडे वळालो. पुन्हा भेट होईलच या आशेने एकमेकांचा निरोप घेतला. तिने घरी येण्याचे आमंत्रण दिले आणि ती निघून गेली.
ती गेल्यावर पुन्हा अनेक प्रश्न मनात येत होते. वाटत होतं की खरंच आमची मैत्री एवढी चांगली होती का? की, आज एवढ्या दिवसांनंतर एकमेकांना भेटल्यावर हा आनंद व्हावा. आम्ही कधीच जास्त भेटलो नाही अथवा बोललो नाही तरी सुध्दा आज या नव्या शहरामध्ये एकमेकांना भेटावे वाटले. मला स्वप्नात सुध्दा वाटले नव्हते की, ती लग्नानंतरच्या इतर फॉरमॅलिटीतून वेळ काढून मला भेटायला येईल.
मला आज खरंच खूप चांगले सुध्दा वाटत होते आणि खरंच आपण त्या दोन वर्षात काय-काय मिळवलं आणि त्या दोन वर्षानंतर काय काय गमावलं या गोष्टीवर आज पुन्हा विचार करण्याची वेळ आली होती.

Simple Day (27 June 2011)

Simple Day
आजचा दिवस फारच सरळ आणि साधा होता. म्हणजे आज स्पेशल असं काही घडल का हाच मोठा प्रश्न होता. मी सकाळी उठलो आणि आवरुन ऑफिसला निघालो. आज ऑफिसचा टाईम १२.३० ते ८.३० असा होता. काल रात्री आमच्या सरांचा आम्हा सर्व ईसकाळच्या सदस्यांना ईमेल आला होता. काल संपूर्ण दिवसभर आमची वेबसाईट अपडेन नसल्यामुळे सरांना खूप राग आला होता. या कारणामुळे आज आमची मिटींग ठेवली होती. त्यामुळेच मला थोडी भीती वाटत होती. तशी ही माझी पहिलीच मिटींग होती. दिवसभर काम केले संध्याकाळी ४वा. मिटींग झाली. नंतर संध्याकाळी मी घराकडे निघालो. सागर आला होता घ्यायला. मी ८.३० वा. दगडूशेठ मंदीराकडे गेलो. तिथे तो येऊन उभा होता. मग गाडीवर बसून आम्ही दोघे घरी आलो.

आई (26 June 2011)

आई
मी आमच्या घरात सर्वात लहान. माझे संपुर्ण शिक्षण घराकडेच म्हणजे औरंगाबादलाच झाले. जन्मल्यापासून ते पोस्ट ग्रॅज्यूएटपर्यंत मी घराच्या बाहेर कधीच एकटा राहिलो नव्हतो. त्यामुळे मला घरच्यांना सोडून राहण्याची कल्पना सुध्दा येत नव्हती. परंतु २००९ ला मला बंगलूरु (बंगळूर) ला नोकरी लागली आणि तिकडे पहिल्यांदा घर सोडून तीन महिने होतो. बंगलोर हे औरंगाबादपासून जवळपास १ हजार किमी होते. औरंगाबादवरुन तिकडे जाण्यासाठी थेट कोणतीच वाहन व्यवस्था नव्हती. रेल्वेने जावे म्हटले तर परभणी नाही तर पुणे यावरुन जावे लागत. आणि बस म्हटले की, उस्मानाबाद किंवा पुणेच परत. म्हणजेच औरंगाबाद पासून सरळ सोपे कोणतेच वाहन जाऊ शकत नव्हते. तेथे जाण्यासाठी जवळसाप ३० तास लागत होते. त्यामुळे मी एकदा बंगलुरु ला गेलो तर सलग तीन महिने घरी येण्याचा प्रश्नच नव्हता. घरापासून पहिल्यांदा ते पण इतक्यादूर इथे जास्तवेळ थांबण मला शक्यच नव्हतं. नेहमी फोन वर आईशी बोलताना रडू यायचे. एक दिवस हे सर्व असहाय्य झाले आणि तीसऱ्या महिन्यात कंटाळून सुट्टी घेऊन मी घरी आलो ते परत गेलोच नाही. घरी परतल्यावर मी पुन्हा शिक्षण करायचे ठरवले. २००९ च्या जून ला मी जर्नालिझमला पोस्ट ग्रॅज्यूएटसाठी प्रवेश घेतला आणि २०११ मध्ये उत्तीर्ण झालो आणि लगेच सकाळ पेपरला जॉईन केले आणि आज हा असा मी तुमच्या समोर आहे.
आई हा विषयच माझ्यासाठी संपूर्ण आयुष्याला पुरुन उरण्यासारखा आहे. हा फक्त माझ्यासाठीच नाही तर प्रत्येकासाठीच आहे. परंतु इथे मी फक्त माझ्या बाबतच बोलत आहे. मी घरात लहान असल्याकारणाने माझे खुप लाड आहे. मोठे दोन भाऊ आणि मी तीसरा. त्यामुळे मी शेंडेफळ आणि या शेंडेफळाचे सर्व लाड पूरवले गेले. घरच्यांपासून दूर राहण्याची सवय नाही आणि त्यातल्या त्यात आईचा खूप लाडका. माझ्या आईचे माझे ट्यूनिंग काही असे आहे की, मी कुठे ही असो माझ्या आवाजावरुन ती माझी परिस्थिती ओळखते. एखादी घटना घडली असेल तर तीला ते मी न सांगता बरोबर कळते. मागे एकदा पेपर वाटण्यासाठी जात असताना मला कुत्रं चावलं मी घाबरत घाबरत घरी आलो आणि गुपचुप आई समोर जाऊन शांत बसलो. आईने विचारलं की काय झालं असा शांत बसलास. मी काहीच बोललो नाही. नंतर ती म्हणाली कुत्र चावलं का काय तुला. त्यानंतर माझे एकदा माझ्या मैत्रीणीशी भांडण झाले होते. मी खुप दुखी झालो होतो. घरी येऊन पलंगावर झोपलो आई थोड्यावेळाने आली आणि विचारु लागली की का झोपलास मी पुन्हा उत्तर नाही दिलं तेव्हा ती म्हणाली कोणत्या मुलीशी भांडण करुन आलास. असे नेहमी काहीही घडलं की तिला बरोबर कळायचं. बंगळूरला असताना फोन वर बोलताना मी रडू आलं तरी खुप आवरुन निट बोलायचो तरीही माझ्या आईला बरोबर कळायचं की मी रडतोय ते. खरंच तेव्हा पासून आई काय असते या सर्व गोष्टींची इतकी पटापट उत्तर मिळत गेली की, माझ्यासाठी आज आईच सर्वस्व आहे.
आज दिंडी पुण्यातच मुक्कामी होती आणि त्यातल्या त्यात रविवार. माझ्या सर्व मित्रांना (मला सोडून) सुट्टी होती. त्यामुळे आम्ही सर्व जण माझ्या आई वडीलांच्या दिंडीत जेवायला जाणार होतो. काल उशीरा झोपल्यामुळे सकाळी अकरा वाजले उठायला. पटकन आवरुन विवेक, सागर आणि मी १२ पर्यंत त्या दिंडीकडे पोहचलो. आई वडील आमची वाटचं बघत होते. गेल्या गेल्या पंगतीत आम्हाला बसवलं. जेवण खुपच छान होतं. पोटभरं जेवलो. आईच्या तोंडावरील आनंद मला दिसत होता. कारण काल रात्री उपाशी गेल्याचे तिला दुःख झाले होते. परंतु आजच्या जेवणाने ते दुःख ती विसरुन आजच्या आनंदात होती. आम्ही जेवण झाले की, बोलत बसलो. मी विवेकची आई-वडीलांना ओळख करुन दिली. तो तसा आमच्या गावाकडचा (भालकी, कर्नाटक) चा असल्याने घरच्यांशी तो लवकर मिसळला. थोड्या वेळाने आम्ही घराकडे निघालो. माझे ऑफिस दू. .०० असल्याने मी तिकडून थेट ऑफिसात पोहचलो. संध्याकाळी पुन्हा जेवायला येतो असे सांगितले होते आईला. वडील म्हणाले की, पंगती बसल्या की मी तूला फोन करतो म्हणून, मी हो म्हणून ऑफिसात आलो. काम करत बसलो. संध्याकाळी जेवायला जायचे असल्यामुळे मी बाहेर काहीच खाल्ले नाही. रात्रीचे ९.०० झाले तरी घरचा फोन नाही आला. मी स्वतःहून फोन लावला परंतु वडील काही फोन उचलत नव्हते. .१५ झाले पुन्हा फोन लावला तो ही नाही उचलला. .३० झाले परंतु तेव्हा ही तसेच. शेवटी १०.०० वाजता फोन उचलला तेव्हा वडीलांना विचारले की, जेवण सुरु झाले की नाही तेव्हा वडीलांनी सांगितले की, इथे ७.०० लाच जेवण झाले सर्वांचे मला लक्षात राहिले नाही तुला फोन करायचे. मी फार चिडलो. मला राग येत होता मी वडीलांना म्हणालो, की मी किती वेळ पासून तुमच्या फोनची वाट पाहत होतो. नंतर वडीलांना सुध्दा थोडे चुकल्यासारखे वाटले. आणि मला सुध्दा वाईट वाटायला लागले नंतर मीच मग सांगितले की, जाऊ द्या मी इथेच बाहेर काही तरी खाईन. परंतु वडीलांचे मन काही मानत नव्हते. त्यांनी नंतर १५ मी. पुन्हा फोन केला आणि मला बोलावून घेतले. पंधरा मि. ये म्हणाले. मी धावत पळत पोहचलो तेव्हा किर्तन चालू होते. शेवटची पंगत बसलेली होती आणि ती ही उठायच्या मार्गावर होती. आई झोपायच्या तयारीत होती परंतु मला बघितल्यावर लगेच ती उठली आणि मला त्या पंगतीच्या शेवटच्या आसनावर नेऊन बसवले. नवीन व्यक्तीला वाढायला कोणाचीच तयारी नव्हती. ते आईला सांगत होते की, आता नवीन कोणाला बसवू नका. जेवण संपत आलं आहे. परंतु आई ती म्हणजे आईच. तीने स्वतःजाऊन ताट वाटी घेतली. भरभर सर्व जेवण ताटात ठेवले. वरण, भात, भाजी, पुरी, जीलेबी सर्व पदार्थ घेतले एकही सोडला नाही. पटकन ते ताट घेऊन माझ्याकडे आली आणि मला दिले. मी अजून जेवण सुरु करतो न करतो तोच पाण्याचा ग्लास सर्व भरुन माझ्या पुढे ठेवले. सर्व पंगतीतले लोक माझ्याकडे बघत होते. मला थोडे लाजीरवाणे जरी वाटत होते तरी आईकडे बघून मी जेवायला सुरुवात केली. आई तीकडे दूर बायकांमध्ये बसली होती. किर्तन चालू होते परंतु आईचे सर्व लक्ष माझ्याकडे की, हा पोटभर जेवतो की नाही, लाजून अर्धवटचं जेवतो की काय. पंगतीतले लोक जेवण संपवून उठत होते. आई माझ्याकडे पाहून हातवारे करुन पोटभर जेवण कर. लाजू नकोस लोक उठले तरी घाबरु नकोस. तूला अजून काही लागले तरी मी आणून देते. पोटभऱ जेव असे सांगत होती. ती जरी इशाऱ्याने बोलत असली तरी मला तीच्या भावना समजत होत्या. आज पुन्हा तिचे शेंडेफळ तिच्यापासून दूर पुण्यात नोकरीला आला होता. त्यामुळे पुन्हा तीची हीच चिंता की काय खात असेल कसा राहत असेल. परंतु इथे मी खुष असल्याचे तीला माझ्या बोलण्यावरुन राहण्यावरुन कळले होते. त्यामुळे ते सुध्दा थोडी निश्चिंत दिसत होती. मी माझे जेवण संपवले आणि हात धूवून ऑफिसकडे निघालो. जाताना आईला लांबूनच बघितले आणि मी जातो असा इथारा केला. आईने सुध्दा हसत टाटा केले. मी पुन्हा त्या ऑफिसच्या रस्त्याच्या वाटेवर होतो. जाताना पुन्हा एक विचार मनात सारखा येत होता की, खरंच मी किती भाग्यवान आहे...


Sunday, June 26, 2011

पालखी... भेट (25 June 2011)

पालखी... भेट
काल माझे आईवडील आले होते. तेच ई.एस.आय.सी. चे काम करायला. त्यांना स्वारगेटवर भेटलो आणि तेथून लगेचच ई.एस.आय.सी. च्या ऑफिसमध्ये गेलो. फोटो, फिंगर प्रिन्ट्स सर्व गोष्टी झाल्यावर तेथून लगेचच निघालो. वडीलांना भूक लागली म्हणून चांगल्या हॉटेलमध्ये जेऊ घालावे म्हणून तिथेच असलेल्या एका हॉटेल मध्ये घेऊन गेलो. जेवायला मागीतले वेटरला तर तो म्हणाला इतक्या सकाळी आम्ही जेवण नाही बनवत. मला खूप वाईट वाटले परंतु काय करणार मग नाश्तासाठी मागवले. तोपर्यंत आईने घरुन माझ्यासाठी बनवून आणलेले शंकरपाळी, चिवडा तसेच सागरच्या आईने त्याच्यासाठीसुध्दा चिवडा, बिस्कीट असे खाण्यासाठी पाठवले होते. खरंच आईची माया कशी असते पहा मी आईला काहीतरी खाण्यासाठी आण असे सांगणार होतो परंतु पुन्हा आईला त्रास होईल म्हणून मी काहीच नाही सांगितले. परंतु आईने आठवणीने माझ्या मनासारखं घेऊन आली होती. नाश्ता करुन आम्ही शाहूमहाराज बस्टॅंडवर गेलो आणि तेथे आईवडीलांना पुन्हा आळंदीच्या गाडीत बसवून मी घरी आलो.
आज आईवडील ज्ञानेश्वरांच्या पालखी सोबत पुण्यात येणार होते. सकाळीच त्यांचा फोन आला होता. संध्याकाळपर्यंत ते पुण्यात येणार होते. माझे ऑफिस टाईम आज संध्याकाळी ४ ते रात्री ११ असा होता. म्हणून आज आरामशीर उठलो माझा रुममेट विवेक त्याला सुध्दा आज चौथ्या शनिवारची सुट्टी असल्याने तो सुध्दा घरीच होता. तो आणि मी फिरायला निघालो. फिरायला म्हणजे त्याला काही पुस्तकं पहायची होती आणि पुस्तकांचे मुख्य मार्केट माझ्या ऑफिसजवळचं असल्याने आम्ही तिकडेच निघालो. परंतु आज पालखी येणार असल्यामुळे तेथील सर्व दूकाने हटवीली होती. माझे ऑफिस आणि पालखी येण्याचे ठिकाण हे एकच असल्याने तेथे आज गर्दीचा महासागर लोटणार होता. तशी दूपार पासूनच गर्दीची चाहूल लागायला लागली होती. आम्ही दगडूशेठ गणपती चौकात गेलो. एक एक दिंडी तेथून येतच होती. संपूर्ण रस्ता हा वारकऱ्यांनी भरला होता. आम्ही बराच वेळ त्या दिंड्याना पाहत बसलो होतो. नंतर माझ्या ऑफिसचा टाईम झाला आणि मी ऑफिसकडे निघालो. मित्र घराकडे निघाला. ऑफिसमध्ये सुध्दा आज सर्वत्र पालखीचाच विषय होता. मला कॅमेरा नसल्याची खुप खंत होत होती. मला एक तर फोटोग्राफीचा खुप नाद आणि त्यात पंढरपूरची वारी. अशी सुवर्ण संधी हातातून जात असल्याची खंत मनाला खुप हूरहूर लावत होती. जाऊदे पुढच्या वारीपर्यंत मी कॅमेऱ्याची सोय करुन घेईल. संध्याकाळी वडीलांचा फोन आला. त्यांनी मला जेवायला बोलावले. मी आणि प्रशांत काम आवरुन लगेच माझ्या आईवडीलांकडे गेलो. रविवार पेठ मध्ये त्यांची दिंडी विश्राम करायला थांबली होती. वडीला बाहेर असलेल्या कमला नेहरू विद्यालय जवळ माझी वाट पाहत थांबले होते. आम्ही जाऊन त्यांना भेटलो. आई चालून खूप दमली होती. पण मला बघून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता जणू तिचे पाय दूखणे थांबलेच होते. आई सोबत बोललो बराच वेळ. प्रशांतची आईवडीलांना ओळख करुन दिली. मुख्य दिंडी न आल्याने अजून जेवणाच्या पंगती बसल्या नव्हत्या. आम्ही बराच वेळ वाट पाहिली नंतर निघून गेलो. मी न जेवता जाताना पाहून आईच्या जीवाची होणारी तळमळ मला जाणवत होती परंतु मी ड्यूटी टाईमवर असल्याने तसेच खूप कामसुध्दा बाकी असल्याने मला जाणे गरजेचे होते. एका हॉटेल वर जेवण करुन मी ऑफिसात गेलो.
रात्री १२ पर्यंत सर्व काम आवरलं. १२ वाजता सागर आणि विवेक माझ्याकडे येणार होते आणि तेथून आम्ही ज्ञानेश्वरांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी जाणार होतो. १२ वाजता ते आले आणि आम्ही पालखीच्या शोधात निघालो. रात्री १.०० वाजेला भवानीपेठेत पोहचलो. तेथे खूप मोठी रांग होती. दर्शन होई पर्यंत २.०० वाजले. तेथून आमचे घर जवळपास ५ - ६ किमी. चांगलीच वाट लागणार होती. आणि आमच्या घराचा रस्ता बुधवार पेठ मधून जाणार असल्यामुळे पोलीसांची चांगलीच रेलचेल होती. बुधवार पेठ म्हणजे प्रोस्टेट्यूट एरीआ (रेडलाईट एरीआ). परंतु माझ्याकडे पत्रकाराचे कार्ड असल्यामुळे आम्हाला तेवढी भीती वाटत नव्हती. कसे बसे पाय तोडत घराकडे आलो. रात्रीचे ३.०० वाजले होते घरी पोहचे पर्यंत. घरी पोहचलो आणि कधी झोपतो कधी नाही असे झाले होते. पटकन अंथरुण टाकून झोपलो.

फेसबूक (24 June 2011)

फेसबूक

आज प्रत्येक शहरातील तरुण तरुणींचा एकत्र येऊन गप्पा-टप्पा, मस्ती – मजा करण्याचे ठिकाण म्हणजे "फेसबूक”. प्रत्येकजण आपल्या मित्रांना इथे काही ना काही सांगत असतो. फोटोज, व्हिडीओ, पोस्ट असे काही ना काही शेअर करण्यासाठी उतावळा असतो. आज जवळपास ५० करोड युजर्स फेसबुककडे आहेत. त्यामुळे फेसबुक आता जगातील पहिल्या क्रमांकाची सोशल नेटवर्कींग साईट झाली आहे.
आपल्या आवडललेल्या विषयाला लाईक करणे, आवता फोटो, अल्बम टॅग करणे, चॅटींग, पोक, मित्रांच्या वॉलवर त्यांना जोक शेअर करणे, आपल्या वॉलवरील प्रोफाईल फोटो चांगला दिसण्यासाठी चांगला फोटो काढून घेण्याची धडपड असे आज बहूतेक तरुण-तरुणींचा दिनक्रम झालाय. फेसबुकमुळे प्रत्येकाला स्वतचे मत मांडायला एक दालन खुल झाल्यामुळे इथे लहानांपासून वयोवृध्दांपर्यंत सगळेच दिसतात. आपल्या लेखांना, कवितांना आपल्या वॉलवर पोस्ट करुन आपल्या मित्रांकडून आलेल्या कमेंटस् ना रिप्लाय देणे, लाईक करणे हा एक वेगळा अनुभव प्रत्येक फेसबुक युजरसाठी झालाय. त्यामुळे २१ व्या शतकातला कॉलेज कट्टा म्हणा अथवा गावातील पार म्हणा, गल्लीतल्या गप्पा म्हणा अथवा चौकातली चर्चा म्हणा फेसबुक या सर्वांवरील उत्तर असल्या सारखे आहे.
मी औरंगाबादला असताना माझे दिवसातले जवळपास ५ ते ६ तास हे फेसबुकवर जायचे. मी चार-पाच कम्यूनीटीज बनवल्या आहेत, त्यातच पोस्ट करत करत तसेच मित्रांशी चॅटींग करत, नवीन मुला-मुलींना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवत माझा दिवस जात होता. पण इथे पुण्यात इंटरनेट आहे, फेसबुक आहे परंतु वापरायला वेळ नाही. तरीही दिवसातून दोन-तीन वेळा मी माझे अकाऊंट चेक करतो. फेसबुकवर मी औरंगाबादला असताना एका संदिप पाटील नावाच्या एका प्राध्यापकाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती कारण ही तसच होतं की, तो खुप छान लेख लिहायचा आणि त्याला वीस-तीस कमेंट्स सुध्दा येत होत्या. त्याची फ्रेंड लिस्ट सुध्दा हजार-दिड हजारच्या घरात होती. त्यामुळे मी त्याला ऍड करायचे ठरवले होते आणि तो मला ऍड सुध्दा झाला. त्याचे लेख खरंच चांगले व दर्जेदार होते. भारतीय राजकारणावरील त्याची टिका तो खुप छान पध्दतीने मांडायचा. परंतु नंतर नंतर त्याने जातीवादावरील लेख शेअर करणे सुरु केले. ते लेख म्हणजे जुने शिवाजी राजांच्या काळातील ब्राम्हणांचे आणि तो एकदम वाईटपणे त्यासर्व घटनेचा उल्लेख करुन ब्राम्हणांविरुध्द शिवीगाळ करण्यापर्यंत त्याची मजल गेली. माझ्या एका मित्राने त्याच्या बाबत मला सांगितले नंतर मी पण स्वतहून त्यात लक्ष घातले. तर खरचं तो एकदम वाईटपध्दतीने जुन्या गोष्टींच्या आधारावर आजच्या ब्राम्हणांबाबत बोलत होता. मी त्याच्या पोस्ट खाली त्याला कमेंट्स दिल्या की, संदिप तु्म्ही शिकलेले आहात, सुज्ञ आहात तेव्हा हे जुने पुराण उकरुन तुम्हाला काय मिळणार, जर तुम्हाला सध्या कुठेतरी जातीवादाविषयीची गोष्ट अढळली असेल तर त्याचा उल्लेख करा. उगीच पुराणातली वांगी फेसबुक सारख्या चांगल्या माध्यमावर विकू नका. त्याने माझी ही कमेंट वाचली का नाही माहित नाही. परंतु पुन्हा २-३ वेळा त्याने हेच कृत्य केले. मी त्याला प्रत्येक वेळेस निषेध नोंदवला. नंतर काल त्याने हद्दच केली. तो माझ्याशी चॅटींग करायला लागला आणि चॅटींगचे रुप भांडणापर्यंत आले. तो मला शिवीगाळ करत होता, धमकी देत होता. मी त्याच्या या कृत्याला काही घाबरलो नाही उलट त्याने दिलेल्या शिव्या, धमकी मी फेसबुकवर सार्वजनिक करुन टाकली आणि त्याचे खरे रुप त्याच्या मित्रमंडळी व इतर लोकांसमोर आणले. त्याची चांगलीच बोंब झाली होती. मग त्याने लगेच मला ब्लॉक करुन टाकले. बिचारा संदीप त्याला या पहिले कोणी असं भेटलं नसावं फेसबुकवर...
असो, पण मला या लोकांचा प्रश्न पडतो. इतके शिकलेले, सुज्ञ, विचारवंत लोक असे का वागतात. डॉ. बाबासाहेबांचे एक वाक्य आहे की, शिक्षण हे वाघीणीच्या दुधाप्रमाणे आहे जो पिल तो गुरगुरेलचं. मग हे लोक हे वाघिणीचे दुध पिऊन सुध्दा असे का आहेत. अनेक जणांना तर शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे हेच माहीत नसते. त्यांना वाटते शिक्षण म्हणजे बकरीचेच दुध असल्या प्रमाणे ते वागतात म्हणजे शिक्षण घेऊन त्यांच्यात काहीच बदल झालेला नसतो. मग अशा लोकांनी फक्त डिगरी घेतली असते खऱ्याज्ञानापासून तर ते कोसो दूर आहेत.

Friday, June 24, 2011

हॅन्डल लॉक (23 June 2011)

हॅन्डल लॉक

उद्या माझे आईवडील येणार होते. ते येणार म्हणजे मीच त्यांना बोलावून घेतले होते. कारण ई.एस.आय.सी. चे कार्ड काढण्यासाठी आपल्या आईवडीलांना नेणे आवश्यक असते. जर आपल्या सोबत त्यांना सुध्दा ई.एस.आय.सी. ची सुविधा हवी असेल तरच नेणे गरजेचे असते. त्यामुळे मी त्यांना उद्याच बोलावून घेतले होते.
आज माझ्या ऑफिसचा टाईमिंग सुध्दा संध्याकाळी ५ ते रात्री १ असा असल्यामुळे मी दिवसभर घरीच होतो. इथे माझा एक अभिषेक नावाचा मित्र आहे. तो १२ वी ला आहे. तो दिवसभर घरीच असतो (कॉलेज आणि क्लासचा वेळ सोडून). मी त्याच्या रुमवर जाऊन बसलो. माझी रात्रपाळी होती त्यामुळे मी त्याला सागरची गाडी घेऊन मला घ्यायला येतो का? विचारले. तो मला हो म्हणाला. त्यामुळे माझा मध्यरात्री पुण्यात फिरण्याची अडचण दूर झाली होती. नंतर मला मेसला जेवायला जायचे होते म्हणून निघालो. आज रात्र पाळी असल्याने मी मेसला दूपारी जाणार होतो. मेसला गेल्यावर कानावर आलं की, आज कोणाची तरी दूचाकी गाडी चोरीला गेली म्हणून. त्यामुळे तेथील सर्व बायकांचा विषय हाच होता. या विषयाच्या गप्पांची मजा घेत घेत मी माझे जेवण संपवले.
उद्या आई वडील येणार असल्यामुळे मी आजच ई.एस.आय.सी. चे ऑफिस शोधून काढले. उगाच त्यांना घेऊन शोधायचे काम नको. आमच्या ऑफिसमधून पत्ता घेतला. स्वारगेटजवळ ते ऑफिस असल्याचे कळाले. मी स्वारगेट येथील त्या ऑफिसमध्ये जाऊन सगळी माहिती घेतली आणि घराकडे निघालो. दुपारचे जेवण झाले असल्याने खूप झोप येत होती. रुमवर येऊन झोपलो. झोप लागती न लागती तोच दू ३. वा माझ्या एका मैत्रीणीचा फोन आला. आश्विनी तीचे नाव. ती फोनवर बोलू लागली. खुप वेळ झालं फोनवर आम्ही बोलत होतो. झोप तशी निघून गेली होती आणि मला ४. वा ऑफिसला जायचे होतेच. तीने फोन करण्याचे कारण सांगितले की, तीची एक मैत्रीण पुण्यातच असते, तीचे एम.एस्सी. मास कम्यूनिकेशन झाले होते. आता ब्लॉक प्लेसमेंटसाठी ती आमच्या सकाळ पेपर्स मध्ये ब्लॉक प्लेसमेंट अथवा ट्रेनिंगची सुविधा आहे का? हे विचारण्यासाठी तिने फोन केला होता. मी विचारुन पहातो म्हणून सांगितल्यावर तीने तिच्या मैत्रिणीला मला फोन करायला सांगितला. तिच्या मैत्रीणीचा सुध्दा फोन आला. तीला मी ऑफिसकडे भेटायला बोलावले. मी तीचा रिस्यूमे घेतला आणि तीला नंतर कळवतो म्हणून सांगितले. मला पहिले आमच्या सरांना विचारायचे होते. त्यामुळे मी तीला तसेच सांगितले.
आज रात्रपाळी असल्याने माझे रात्रीच्या जेवणाची गोची होणार होती. परंतु बरं झालं तेथे एक खानावळ असल्याने माझी जेवणाची सुध्दा अडचण सुध्दा दूर झाली. माझी रात्रपाळी संपण्या आगोदरच अभिषेकचे दोन फोन येऊन गेले होते. त्याला मी निघाल्यावर फोन करतो म्हणून सांगितले. नंतर मी त्याला निघण्यास सांगितले. तो येऊन ए.बी.सी. चौकात थांबला. मला थोडा उशीर झाला. तो पर्यंत तो तिथेच थांबला होता. मग मी पटकन जाऊन त्याला भेटलो. नंतर गाडीवर आम्ही घरी आलो. घरी आल्यावर गाडी लॉक केली नंतर अभिषेक हॅन्डल लॉक करायला लागला. पण हॅन्डल लॉक कुठे होतोय. हॅन्डल उजवीकडे फिरव, डावीकडे फिरव पण काही केल्या हॅन्डल लॉक व्हायला तयार नाही. नंतर मी सुध्दा बरेच प्रयत्न केले. पण मी सुध्दा अयशस्वीच ठरलो. मला अजून टेन्शन यायला लागले. सकाळीच गाड्याचोरींचे कानावर आले आणि आज मला आणायला अभिषेक सागरची गाडी घेऊन आला होता त्यामुळे मला जरा जास्तच टेन्शन होतं. नंतर आम्ही विनाहॅन्डल लॉक करुनच निघायचे ठरवले पण माझे मन घाबरत होते मग अभिषेकने एक युक्ती केली आणि गाडीचा प्लगच काढून घेतला आणि म्हणाला, ''आता कोणाच्या बापाकडून ही गाडी चालू होणार नाही, फक्त कोणी मॅकेनिकल इंजिनिअर सोडून!''. मग हसत हसत आम्ही रुमकडे झोपायला निघालो. तरीही मन थोडं फार शंकीतच होतं गाडी बाबत. कशी-बशी झोप लागली. सकाळी ६ वा. जाग आली. आईवडील आळंदीला आले होते आणि तेथून ते पूण्यात येणार होते. मी सकाळी लवकरच आवरुन घेतले. तोपर्यंत सागर उठला नव्हता. माझे आवरण्याच्या आधीच मी सागरच्या गाडीची पहाणी केली होती तर ती आहे त्या जागीच उभी होती त्यामुळे माझ्या टेन्शनला आता विराम मिळाला होता. नंतर थोड्या वेळाने सागर सुध्दा उठला. मी त्याला कालरात्रीची हकीकत सांगितली तेव्हा तो म्हणला की माझ्या गाडीचा ''हॅन्डल लॉकच होत नाही''..नंतर पुन्हा आम्ही हसू लागलो... हा..हा..हा..:-)

''अरे त्या मुलाला पण विचारा कुठे लागले ते.. !'' (22 June 2011)

''अरे त्या मुलाला पण विचारा कुठे लागले ते.. !''
पुण्यात जीथं पहा तीथे फक्त कपलचं दिसतात. सर्व शहरातून तसेच राज्यांतून आलेले मुलं मुली असल्यामूळे येथील जोड्यांमध्ये विविधता तर दिसते. परंतु एकमेकांबद्दलचे जोडप्यांतील गमती जमती ह्या सर्व समानच आहेत. येथे दूचाकी गाडीवर सिंगल सिट कमी आणि डबल सिट जास्त दिसतात. त्यात सुध्दा कॉलेज तरुण तरुणी तर जास्तच दिसतात. मुलगी मागे असली की, मुलाची ९० सीसीची गाडीसुध्दा त्याला करीझ्मा वाटायला लागते. मग काय विचारता सोय नाही. कटा मारत, ब्रेक मारत चालतात या मुलांच्या गाड्या. काहीही असले तरी मज्जा असते कॉलेज लाईफची. कॉलेज, कट्टा, कटींग चहा, मुली, मुले, लेक्चर बंक करणे, कॅन्टीन मध्ये तासन् तास बसणे, अजून खूप काही.. कॉलेज लाईफ.. खरंच खुप खुप मज्जाच मज्जा. पण आता माझी ही मज्जा संपली होती. आणि आता मज्जाच मज्जाच्या जागी आलं होतं कामच काम... फक्त काम. असो...
आजचा दिवस थोडा साधाच होता. साधा म्हणजे काही विशेष घडलं नव्हतं आज. त्यासाठीच साधा हा शब्द वापरला आहे. सकाळी उठलो. आवरुन ऑफिसात गेलो. आज मला ई.एस.आय.सी. चे कार्ड काढायचे असल्यामुळे मी एच.आर. विभागात जाऊन फॉर्म भरुन घेतला. .एस.आय.सी. साठी आई वडीलांना सोबत आणणे आवश्यक असते. त्यामुळे माझ्या आईवडीलांना मी शुक्रवारी बालोवले आहे. त्यांना घेऊन ई.एस.आय.सी. च्या ऑफिसात जायचे होते. आज एक चांगली गोष्ट अशी झाली की, मला माझे एम्प्लॉई कार्ड मिळाले. आता मला कुठेच जाण्यासाठी कोणीच थांबवू शकत नव्हतं. पत्रकाराचे कार्ड माझ्याकडे असल्यामुळे मला आता सर्व दारे उघडी झाली होती. तेवढं एक छोटं स्वप्न माझं आज पूर्ण झालं होतं. त्यामुळे मी जरा जास्तचं खूष होतो.
मी आमच्या ऑफिसमध्ये चांगला रुळलो होतो. नवीन मित्र होते. मित्र म्हणजे ते आमच्या सोबतचे नाही आहेत. परंतु आमच्याच विभागात ते काम करतात. एकाचे नाव प्रशांत तर एक कल्याण नावाचा मित्र आहे. दोघांचा स्वभाव छान आहे. मला त्यांच्या सोबत रहायला आवडतं. मी आमच्या उपसंपादकांच्या टिम मध्ये कमी आणि त्यांच्या सोबत जास्त फिरत असतो. आज ऑफिसमध्ये काही तरी होतं त्यामुळे आम्हाला वडापावची मेजवानी होती. आता फुकटची मेजवानी म्हणजे मग काय विचारायची सोय. दोन-तीन वडापाव खाल्ले. खूप भूक लागली होती. सकाळी फक्त पोहे खाल्लेले. संध्याकाळी वडापाव भेटला तर मन एकदम खूश झालं. वडापाव नंतर चहा. मस्तचं होतं सगळं. त्या निमित्ताने सर्व एम्प्लॉईंना बघणं झालं. माहितच नव्हत एवढे जण आमच्या सोबत काम करतात ते. आज पहिल्यांदा सर्व जण एकत्र आले होते. ही अशी मेजवानी महिन्यातून एकदा तरी असते असे मित्रानी सांगितले. नंतर काम संपवून मी रात्री ९.०० ला घराकडे निघालो. मेस बंद होण्याच्या भीतीने भर-भर चालत रुम वर आलो आणि जेवायला गेलो. जेवण झाल्यावर मेस बाहेर उभा असताना एक मुलगा त्याच्या मैत्रीणीला गाडीवरुन घेऊन जात असताना गाडी स्लीप होऊन पडला. पटकन तिथे उभ्या असलेल्या काही मुलांनी गाडी उचलून घेतली आणि सर्व जण मुलीलाच विचारु लागले कुठे लागले आहे का ते.. मी हळूच म्हणालो ''अरे त्या मुलाला पण विचारा कुठे लागले ते.. !''

Wednesday, June 22, 2011

‘केक घेऊ नका मग!’ (21 June 2011)

‘केक घेऊ नका मग!’
पुण्याच्या बाबतीत सांगायचे झाले तर पुणा एक आय.टी. सीटी म्हणून खुप प्रसिध्द आहे. पुण्याचा विकास होण्यामागे दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे इथले विद्यापीठ आणि दूसरी गोष्ट म्हणजे आय.टी. क्षेत्राचे विस्तारीकरण. या दोन गोष्टींमुळे पुण्याला संपूर्ण जगात एक वेगळी ओळख निर्माण करता आली. संपूर्ण जगात ओळख निर्माण करण्याच्या स्पर्धेत पूण्याचा विकास खूप झपाट्याने झाला. पूणे बघे-बघे पर्यंत मेट्रोसिटी कधी झाले हे कळालेच नाही. पुण्यामध्ये रातोरात अनेक गोष्टी बदलत गेल्या. या सर्व गोष्टी जरी पुण्याच्या विकासास आवश्यक होत्या त्याच बरोबर एक नको असलेली गोष्ट सुध्दा पुण्यात झाली. या सर्व बदलांबरोबर पुणेरी पुणेकर यांच्यात सुध्दा खुप बदल झाला. मला माहित नाही की पुण्यातील लोक पहिले कसे होते. परंतु आज पुण्याचे लोक इतर लोकांपेक्षा खुप वेगळे वाटतात. वेगळे म्हणजे त्यांच्या स्वभाव, त्यांची विचार करण्याची पध्दत अशा गोष्टी म्हणायच्या आहेत. या वेगळ्या लोकांत येथील दूकानदारतर त्याहून आगळे–वेगळे. त्यांच्या बाबतीत काय सांगावं.
काल माझा मित्र एका मेडीकल मधून काही तरी घेत होता. परंतु तो दूकानदार त्याच्या कडे लक्षच देत नव्हता. माझ्या मित्राने त्याला एक-दोनदा पुन्हा पुन्हा आवाज दिला. तरीही दुकानदार ऐकेनासा करत होता. तो दुस-या गि-हाईकाचे काहीतरी काम करत होता. माझ्या मित्राने त्याला पुन्हा एकदा आवाज दिल्यावर तो एकदम उध्दटपणे त्याला बोलायला लागला. दोघांचा थोडा वाद झाला नंतर आम्हीच त्या दूकानातून निघून गेलो. मला नेमके कळाले नाही कोणाचे चुकले ते. पण हे असे पहिल्यांदाच घडले होते माझ्या समोर.
जाऊ द्या.. ह्या सर्व गोष्टी
आजची रोजनिशी जरा स्पेशल आहे. कारण आजचा दिवस म्हणजे माझ्या सुट्टीचा दिवस. आज माझा मित्र सुध्दा येणार होता औरंगाबादचा. महेंद्र. महेंद्र नाव आहे त्याचे. तो माझ्या सोबत पत्रकारीतेच्या शिक्षणाला होता. त्याचे पुण्याच्या कलेक्टर ऑफिसला काही तरी काम होते त्यामुळे तो आला होता. दूपारी १२ वा. त्याला भेटायचे होता. माझी सकाळ ९ ला झाली. मला आज पॅनकार्ड काढायला जायचे होते. सागरला ऑफिस माहित असल्यामुळे मी त्याच्या सोबत जाणार होतो. लवकर आवरुन मी त्याच्या सोबत पॅनकार्डच्या ऑफिसात गेलो. तेथे फॉर्म भरुन मी पुणे स्टेशनला महेंद्रला भेटायला निघालो. जवळपास १ तासाच्या पी.एम.टी.च्या प्रवासानंतर मी त्याला कलेक्टर ऑफिसला जाऊन भेटलो. महेंद्र आणि मी फिरत फिरत एका फरसाणच्या दुकानात गेलो. थोडं बाहेर खाल्यामुळे भूक तशी जास्त नव्हती तरीही काही तरी थोड गोड खावस वाटत होतं. मी महेंद्रला केक घेण्यास सांगितले. आम्ही केकचे पाकीट हातात घेतले आणि किंमत विचारली. त्याची किंमत २० रु. होती. आम्ही हेच केकचे पाकीट घ्यायचे ठरवले. महेंद्रने १०० रु. ची नोट दिली. त्या दूकानदाराने आम्हाला सुट्टे पैसे मागितले. आमच्या जवळ सुटे पैसे नसल्याने आम्ही त्याला नाही म्हणून सांगितले. त्याने पन्नास रुपये आहेत का? विचारले. आमच्या कडे नसल्याने आम्ही कुठून देणार पन्नास रुपये. आम्ही त्याला सुट्टे काहीच नाहीत हे सांगितले. तर तो दुकानदार आम्हाला ‘केक घेऊ नका मग!’ असे म्हणाला चक्क. मला तर धक्काच बसला. हा मला पुण्यात दुस-यांदा बसलेला धक्का होता. परंतु या धक्क्याची तिव्रता मात्र काल माझ्या मित्रासोबत मेडिकल मध्ये झालेल्या घटनेपेक्षा जास्त होती. थोडा वेळ काहीच सुचले नाही. नंतर आम्ही त्या दूकानातून रागात निघून गेलो. वेळ निघून गेली परंतु माझ्या डोक्यातून ती गोष्ट काही जात नव्हती. आमच्या औरंगाबाद मध्ये गि-हाईक म्हणजे देवता समान. दुकानदार गि-हाईकासाठी काहीही करायला तयार असतात. चक्क असलेल्या किंमतीच्या (वाढवलेली) अर्ध्या किंमतीत सुध्दा ते माल विकायला तयार असतात. परंतु ते गि-हाईकाला कधीच नाराज करत नाहीत किंवा परत पाठवत नाहीत. परंतु इथे तर गि-हाईकाला काडीमोल किंमत देत नाहीत ही दूकानदार मंडळी. कदाचित यांना माज आलाय का ? असे काही क्षण वाटले. परंतु नंतर लगेच उत्तर मिळाले. हे सर्व परिणाम या आय.टी. कंपन्यांमुळे झालेत. हे कंपनीवाले भरमसाठ पगार देऊन येथील लोकांना आळशी बनवण्यात यशस्वी झालेत. त्यामुळे हे आय.टी. कंपनीत काम करणारे लोक पैशाकडे न बघता दुकानदार जी किंमत सांगेल त्या किंमतीत वस्तू विकत घेतात. त्यामुळे पुण्याची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली (किंवा दुकानदारांनी वाढवली). त्यामुळे येथील दुकानदार आज जास्तीचा नफा मिळवत आहेत. त्यांना आता छोट्या - साधारण गि-हाईकांची गरज उरली नाही.
या सगळ्या गोष्टीत एक गोष्ट मात्र होताना दिसते, ती म्हणजे या सर्वांमध्ये मध्यमवर्गीय आणि गरीब माणूस मरत चाललाय. त्याचा कोणीच विचार करत नाही. दुकानदारांनी वस्तू विकण्यासोबत स्वतची माणूसकी सुध्दा विकली का असा प्रश्न पडतो ?
तुम्हाला ज्या दरात वस्तू विकायला परवडतील त्या दरात दुकानदारांनी वस्तू विकाव्यात तो त्यांचा प्रश्न. परंतु तुम्ही जरा सुध्दा माणूसकीने वागणार नसाल, तुम्हाला जर गि-हाईकांशी बोलण्याची पध्दत नसेल तर तुम्हाला काय म्हणावं. नक्की माणूसच आहात ना तूम्ही यात शंका वाटते.

ए.बी.सी चौक की अप्पा बळवंत चौक (20 June 2011)

ए.बी.सी चौक की अप्पा बळवंत चौक
आज मला पुण्यात येऊन जवळपास ५ दिवस झाले. आता मी चांगला रुळलोय पुण्यात. चांगला यासाठी म्हणतोय कारण की, आता मित्र झालेत. ऑफिसमध्ये सुध्दा आता सगळ्यांशी ओळखी झाल्यात. माझे काम सुध्दा थोडं थोडं मला जमायला लागलंय. इथलं जेवण, राहणीमान, रस्ते, लोक, लोकांची मानसिकता या सगळ्या गोष्टी हळूहळू समजायला लागल्या आहेत. त्यामुळे माझा थोडा आत्मविश्वास वाढलायं. जसजसे दिवस जातील तसतसा अजून वाढेल. कोणताही बदल एकदम होत नाही तो हळूहळू होतो आणि एकदम झालेला बदल कधीच चांगला नसतो.
मला आठवतयं मी जेव्हा पहिल्या दिवशी पूण्यात आलो होतो, त्यावेळी माझा इंटरव्यूव्ह हा शिवाजी नगर येथील सकाळ पेपरच्या ऑफिसात होता. त्यामुळे मी इंटरनेटवरुन सकाळ ऑफिसाचा पत्ता काढला होता. पत्ता असा होता की, नरवीर तानाजीवाडी बस डेपो जवळ, शिवाजी नगर. मी सागरला फोन केला आणि पत्ता सांगितला. तेव्हा तो म्हणाला नतावाडी मला माहित आहे हा बस डेपो. मी थोडं गोंधळात पडलो. मी त्याला नरवीर तानाजीवाडी बसडेपो सांगितला आणि हा नतावाडी बसडेपो म्हणतोय. तरीही जास्त फोनवर चर्चा न करता मी पूण्यात आलो आणि सकाळीच मी आणि सागर शिवाजीनगर जवळील नरहरी तानाजीवाडी येथील बसडेपोकडे निघालो. रस्त्यात अनेक बस दिसत होत्या त्यातल्या काही नतावाडीकडे जाणा-या होत्या. सागर सुध्दा नतावाडीच म्हणत होता. थोडी विचारांची ट्रॅफिक डोक्यात चालू असतानाच सागरने मला नरहरी तानाजीवाडी येथील बसडेपो जवळील सकाळ ऑफिस मध्ये नेले. मला नंतर समजले की नरहरी तानाजीवाडी म्हणजेच त्याचे संक्षिप्त नतावाडी असे केले होते. या पी.एम.टी. वाल्यांनी सुध्दा या बसडेपोला नतावाडी म्हणूनच रुढ केले आहे. याच संक्षिप्त रुपामुळे माझी गल्लत होत होती.
जाऊदे ते काहीही असो, पण मला माझे ऑफिस मिळाले होते यातच मी खूष होतो. नंतर इंटरव्यूव्ह झाला. मी सिलेक्ट झालो. आज बघता बघता माझ्या नोकरीला पाच दिवस झालेत.
माझ्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी मला सॅलरी अकाऊंट काढा म्हणून सांगितले होते. त्यानंतर त्या आय.डी.बी.आय. बॅंकेच्या शोधात माझे तीन दिवस गेले. मग मीच सागरला काल सांगितले होते ती बॅंक शोधायला आणि काल आम्ही ती बॅंक शोधली. आज सकाळी उठून सर्व आवरुन मी लवकरच त्या बॅँकेत गेलो आणि नवीन अकाऊंट उघडण्याचा फॉर्म भरला. नवीन अकाऊंट उघडायला ओळखपत्र द्यावे लागते आणि माझी सर्व कागद पत्रे मी घरीच ठेऊन आल्याने पंचाईत होऊन बसली. बरं आहे माझे आई-वडील पुण्यात येणार होते पंढरपूरच्या वारीच्या निमित्ताने. त्यामुळे मी त्यांना सांगितले इलेक्शनकार्ड घेऊन यायला. ते येताना आणतील.
बर.. झालं आठवलं.. एक गोष्ट सांगायचीच राहून गेली तुम्हाला. ती म्हणजे अशी की, मी काल आम्ही जेव्हा बॅंक शोधली तेव्हा मित्राने मला ए.बी.सी. चौकात ही बॅंक आहे असे सांगितले. तो म्हणाला की, तु लक्ष्मी रोडने आलास ना, तर कोणालाही ए.बी.सी. चौक विचार ते तूला सांगितील. मी ही तसंच केलं. माझ्या घरापासून हा लक्ष्मीरोड कमीत कमी ३-४ कि.मी. असेल तो पर्यंत मी चालत गेलो. नंतर मला वाटले की इथेच कुठेतरी हा ए.बी.सी. चौक असेल म्हणून मी कोणाला तरी विचाराव या उद्देशाने रस्त्यावर थांबलेल्या एका माणसाला विचारले की, .बी.सी. चौक कुठे आहे, तो लगेच थोडा रागात म्हणाला ए.बी.सी. काय म्हणता अप्पा बळवंत चौक म्हणाना. हा पुढचा चौक म्हणजे अप्पा बळवंत चौक. त्यानंतर मी विचारात पडलो की, नेमके कोणाचे बरोबर आहे. या चौकाला काय म्हणायला पाहिजे ए.बी.सी. चौक का अप्पा बळवंत चौक.
एक – एक करत हजार विचार मनात यायला लागले. आज प्रत्येक जण या संक्षिप्त नावांना भूललाय. जणू हेच खरे नाव असल्यासारखा वावरतोय. का कोणाला आपल्या नावाचे संक्षिप्त नाव आवडते? लोकांनी शहारुख ला एस.आर.के. केलय. अमिताभ बच्चन सारख्या प्रसिध्द अभिनेत्याला बीगबी म्हणतात. बिपाशा बसू अभिनेत्रीला तर माध्यमांनी बिप्स म्हणूनच एक ओळख दिलीय. अरे ह्या तर सिनेतारकांच्या गोष्टी झाल्या पण माझी एक मैत्रिण आहे तीचे नाव “ प्रियंका ” हे असताना तिला स्वत ला प्री म्हणून घ्यायला आवडते.
आज लोकांना नमस्कार ऐवजी हाय ऐकायला आवडते, मोबाईल मेसेज मुळे तर या शॉर्ट फॉर्मसुध्दा अजून शॉर्ट होत चालले आहेत. मॅसेज मधून गुड मॉर्निंग लिहिण्याऐवजी जी.एम. लिहून काम भागवतात. चॅटींग मध्ये काही विचारायचं तर अगदी तीन चार शब्दातच म्हणजे कसा आहे, तुझं काय चाललयं असे लिहण्याऐवजी whts up? एवढेच लिहून मोकळे होतात.
सद्य स्थितीत तर अनेक ठिकाणं, अनेक नावे आहेत ज्यांना फक्त संक्षिप्त रुपातचं ओळखलं जातयं. त्यांचे मुळ नाव जर विचाराल तर लोक थोडं विचारात पडतात. काही जण सांगतात त्याचे विस्तारित नाव पण बहूतेक जण हे सांगण्यास असमर्थ ठरतात. परंतु हे जे काही होतंय ते चांगलं आहे का, खरचं याची गरज आहे का? का आपण स्वत:लाच आळशी बनवतोय. शॉर्टकर्ट मारण्याच्या स्पर्धेत आपण आपल्या शहराची ओळख, आपल्या गावाची ओळख, आणि शेवटी आपली तर ओळख विसरत नाही ना?