आई
मी आमच्या घरात सर्वात लहान. माझे संपुर्ण शिक्षण घराकडेच म्हणजे औरंगाबादलाच झाले. जन्मल्यापासून ते पोस्ट ग्रॅज्यूएटपर्यंत मी घराच्या बाहेर कधीच एकटा राहिलो नव्हतो. त्यामुळे मला घरच्यांना सोडून राहण्याची कल्पना सुध्दा येत नव्हती. परंतु २००९ ला मला बंगलूरु (बंगळूर) ला नोकरी लागली आणि तिकडे पहिल्यांदा घर सोडून तीन महिने होतो. बंगलोर हे औरंगाबादपासून जवळपास १ हजार किमी होते. औरंगाबादवरुन तिकडे जाण्यासाठी थेट कोणतीच वाहन व्यवस्था नव्हती. रेल्वेने जावे म्हटले तर परभणी नाही तर पुणे यावरुन जावे लागत. आणि बस म्हटले की, उस्मानाबाद किंवा पुणेच परत. म्हणजेच औरंगाबाद पासून सरळ सोपे कोणतेच वाहन जाऊ शकत नव्हते. तेथे जाण्यासाठी जवळसाप ३० तास लागत होते. त्यामुळे मी एकदा बंगलुरु ला गेलो तर सलग तीन महिने घरी येण्याचा प्रश्नच नव्हता. घरापासून पहिल्यांदा ते पण इतक्यादूर इथे जास्तवेळ थांबण मला शक्यच नव्हतं. नेहमी फोन वर आईशी बोलताना रडू यायचे. एक दिवस हे सर्व असहाय्य झाले आणि तीसऱ्या महिन्यात कंटाळून सुट्टी घेऊन मी घरी आलो ते परत गेलोच नाही. घरी परतल्यावर मी पुन्हा शिक्षण करायचे ठरवले. २००९ च्या जून ला मी जर्नालिझमला पोस्ट ग्रॅज्यूएटसाठी प्रवेश घेतला आणि २०११ मध्ये उत्तीर्ण झालो आणि लगेच सकाळ पेपरला जॉईन केले आणि आज हा असा मी तुमच्या समोर आहे.
आई हा विषयच माझ्यासाठी संपूर्ण आयुष्याला पुरुन उरण्यासारखा आहे. हा फक्त माझ्यासाठीच नाही तर प्रत्येकासाठीच आहे. परंतु इथे मी फक्त माझ्या बाबतच बोलत आहे. मी घरात लहान असल्याकारणाने माझे खुप लाड आहे. मोठे दोन भाऊ आणि मी तीसरा. त्यामुळे मी शेंडेफळ आणि या शेंडेफळाचे सर्व लाड पूरवले गेले. घरच्यांपासून दूर राहण्याची सवय नाही आणि त्यातल्या त्यात आईचा खूप लाडका. माझ्या आईचे माझे ट्यूनिंग काही असे आहे की, मी कुठे ही असो माझ्या आवाजावरुन ती माझी परिस्थिती ओळखते. एखादी घटना घडली असेल तर तीला ते मी न सांगता बरोबर कळते. मागे एकदा पेपर वाटण्यासाठी जात असताना मला कुत्रं चावलं मी घाबरत घाबरत घरी आलो आणि गुपचुप आई समोर जाऊन शांत बसलो. आईने विचारलं की काय झालं असा शांत बसलास. मी काहीच बोललो नाही. नंतर ती म्हणाली कुत्र चावलं का काय तुला. त्यानंतर माझे एकदा माझ्या मैत्रीणीशी भांडण झाले होते. मी खुप दुखी झालो होतो. घरी येऊन पलंगावर झोपलो आई थोड्यावेळाने आली आणि विचारु लागली की का झोपलास मी पुन्हा उत्तर नाही दिलं तेव्हा ती म्हणाली कोणत्या मुलीशी भांडण करुन आलास. असे नेहमी काहीही घडलं की तिला बरोबर कळायचं. बंगळूरला असताना फोन वर बोलताना मी रडू आलं तरी खुप आवरुन निट बोलायचो तरीही माझ्या आईला बरोबर कळायचं की मी रडतोय ते. खरंच तेव्हा पासून आई काय असते या सर्व गोष्टींची इतकी पटापट उत्तर मिळत गेली की, माझ्यासाठी आज आईच सर्वस्व आहे.
आज दिंडी पुण्यातच मुक्कामी होती आणि त्यातल्या त्यात रविवार. माझ्या सर्व मित्रांना (मला सोडून) सुट्टी होती. त्यामुळे आम्ही सर्व जण माझ्या आई वडीलांच्या दिंडीत जेवायला जाणार होतो. काल उशीरा झोपल्यामुळे सकाळी अकरा वाजले उठायला. पटकन आवरुन विवेक, सागर आणि मी १२ पर्यंत त्या दिंडीकडे पोहचलो. आई वडील आमची वाटचं बघत होते. गेल्या गेल्या पंगतीत आम्हाला बसवलं. जेवण खुपच छान होतं. पोटभरं जेवलो. आईच्या तोंडावरील आनंद मला दिसत होता. कारण काल रात्री उपाशी गेल्याचे तिला दुःख झाले होते. परंतु आजच्या जेवणाने ते दुःख ती विसरुन आजच्या आनंदात होती. आम्ही जेवण झाले की, बोलत बसलो. मी विवेकची आई-वडीलांना ओळख करुन दिली. तो तसा आमच्या गावाकडचा (भालकी, कर्नाटक) चा असल्याने घरच्यांशी तो लवकर मिसळला. थोड्या वेळाने आम्ही घराकडे निघालो. माझे ऑफिस दू. ४.०० असल्याने मी तिकडून थेट ऑफिसात पोहचलो. संध्याकाळी पुन्हा जेवायला येतो असे सांगितले होते आईला. वडील म्हणाले की, पंगती बसल्या की मी तूला फोन करतो म्हणून, मी हो म्हणून ऑफिसात आलो. काम करत बसलो. संध्याकाळी जेवायला जायचे असल्यामुळे मी बाहेर काहीच खाल्ले नाही. रात्रीचे ९.०० झाले तरी घरचा फोन नाही आला. मी स्वतःहून फोन लावला परंतु वडील काही फोन उचलत नव्हते. ९.१५ झाले पुन्हा फोन लावला तो ही नाही उचलला. ९.३० झाले परंतु तेव्हा ही तसेच. शेवटी १०.०० वाजता फोन उचलला तेव्हा वडीलांना विचारले की, जेवण सुरु झाले की नाही तेव्हा वडीलांनी सांगितले की, इथे ७.०० लाच जेवण झाले सर्वांचे मला लक्षात राहिले नाही तुला फोन करायचे. मी फार चिडलो. मला राग येत होता मी वडीलांना म्हणालो, की मी किती वेळ पासून तुमच्या फोनची वाट पाहत होतो. नंतर वडीलांना सुध्दा थोडे चुकल्यासारखे वाटले. आणि मला सुध्दा वाईट वाटायला लागले नंतर मीच मग सांगितले की, जाऊ द्या मी इथेच बाहेर काही तरी खाईन. परंतु वडीलांचे मन काही मानत नव्हते. त्यांनी नंतर १५ मी. पुन्हा फोन केला आणि मला बोलावून घेतले. पंधरा मि. ये म्हणाले. मी धावत पळत पोहचलो तेव्हा किर्तन चालू होते. शेवटची पंगत बसलेली होती आणि ती ही उठायच्या मार्गावर होती. आई झोपायच्या तयारीत होती परंतु मला बघितल्यावर लगेच ती उठली आणि मला त्या पंगतीच्या शेवटच्या आसनावर नेऊन बसवले. नवीन व्यक्तीला वाढायला कोणाचीच तयारी नव्हती. ते आईला सांगत होते की, आता नवीन कोणाला बसवू नका. जेवण संपत आलं आहे. परंतु आई ती म्हणजे आईच. तीने स्वतःजाऊन ताट वाटी घेतली. भरभर सर्व जेवण ताटात ठेवले. वरण, भात, भाजी, पुरी, जीलेबी सर्व पदार्थ घेतले एकही सोडला नाही. पटकन ते ताट घेऊन माझ्याकडे आली आणि मला दिले. मी अजून जेवण सुरु करतो न करतो तोच पाण्याचा ग्लास सर्व भरुन माझ्या पुढे ठेवले. सर्व पंगतीतले लोक माझ्याकडे बघत होते. मला थोडे लाजीरवाणे जरी वाटत होते तरी आईकडे बघून मी जेवायला सुरुवात केली. आई तीकडे दूर बायकांमध्ये बसली होती. किर्तन चालू होते परंतु आईचे सर्व लक्ष माझ्याकडे की, हा पोटभर जेवतो की नाही, लाजून अर्धवटचं जेवतो की काय. पंगतीतले लोक जेवण संपवून उठत होते. आई माझ्याकडे पाहून हातवारे करुन पोटभर जेवण कर. लाजू नकोस लोक उठले तरी घाबरु नकोस. तूला अजून काही लागले तरी मी आणून देते. पोटभऱ जेव असे सांगत होती. ती जरी इशाऱ्याने बोलत असली तरी मला तीच्या भावना समजत होत्या. आज पुन्हा तिचे शेंडेफळ तिच्यापासून दूर पुण्यात नोकरीला आला होता. त्यामुळे पुन्हा तीची हीच चिंता की काय खात असेल कसा राहत असेल. परंतु इथे मी खुष असल्याचे तीला माझ्या बोलण्यावरुन राहण्यावरुन कळले होते. त्यामुळे ते सुध्दा थोडी निश्चिंत दिसत होती. मी माझे जेवण संपवले आणि हात धूवून ऑफिसकडे निघालो. जाताना आईला लांबूनच बघितले आणि मी जातो असा इथारा केला. आईने सुध्दा हसत टाटा केले. मी पुन्हा त्या ऑफिसच्या रस्त्याच्या वाटेवर होतो. जाताना पुन्हा एक विचार मनात सारखा येत होता की, खरंच मी किती भाग्यवान आहे...
No comments:
Post a Comment