झेड ब्रीज
औरंगाबादला असतांना सागर आणि मी आठवड्यातून दोन-तीन वेळेस तरी संध्याकाळी फिरायला जायचो. आमचे फिरण्याचे ठिकाण सुध्दा एकच होतं. घरापासून चालत निघालो की जवळच दोन कि.मी. अंतरावर कॅनॉट गार्डन म्हणून औरंगाबादचे एक प्रसिध्द गार्डन आहे. या गार्डनच्या आवारात खूप मोठे मार्केट आहे, तसेच हे गार्डन औरंगाबादच्या श्रीमंत वसाहतीच्या जवळ असल्याकारणाने इथली संध्याकाळ खूपच निराळी असते. कॉलेजची मुले-मुली, इतर जॉब करणारे सर्व जण इथे जमतात. त्यामुळे कॅनॉट म्हणजे औरंगाबादच्या तरुणांचे विशेष आवडीचे ठिकाण समजले जाते.
मला संध्याकाळ म्हटले की, खूपच कंटाळवाणे व्हायचे, त्यामुळे दररोज संध्याकाळी कोणत्या ना कोणत्या मित्राकडे जात असायचो आणि रात्री 9 पर्यंत पुन्हा घरी यायचो. हा माझा जणू दिनक्रमच असायचा. परंतु जेव्हा जेव्हा मी सागर सोबत फिरायला जात होतो त्यावेळेस अनेक नवीन गोष्टी, नवीन विचार, वेगवेगळ्या विषयांवरील चर्चा, वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्वभावाविषयी आमचे मत अशा विविधांगी विषयांवर आमची चर्चा चालायची. सागर माझा लहान पणापासूनचा मित्र. त्याच्या 12 वी नंतरच्या काळात आमची मैत्री जास्त वाढली. वाढली म्हणजे आम्हाला एकमेकांचे विचार कळाले आणि स्वभाव सुध्दा जूळू लागला होता. मी थोडे भरभर आणि वेगळ्याच विचारांच्या गोष्टी करत असतो. सागर हा नेहमी माझ्या सहवासात असल्यामुळे त्याला माझे विनोद, माझे विषय, मला नेमके काय म्हणायचे आहे या सर्व गोष्टी चटकन समजतात. परंतु एखाद्या नवीन मुलाला माझे बोलणे कितपर्यंत समजते कोण जाणे. मला तर वाटते की त्यांच्या डोक्यावरुनच ते जात असावे.
माझ्यातील विचारशक्ती वाढण्याचा काळ आणि सागर व माझी मैत्री वाढण्याचा काळ हा जवळपास एकच होता. माझ्या डोक्यात आलेले विविध विचार मी त्याला सांगत असायचो सुरुवातीला त्याला माझे बोलणे समजत नव्हते परंतु नंतर नंतर त्याला सवयच पडली जणू. आता अशी परिस्थिती आहे की, माझ्या तोंडातून निघालेला एक शब्द मला काय म्हणायचे आहे हे त्याला सांगून जातो. त्यामुळे त्याच्याशी बोलायला मला जरा जास्तच आवडतं. त्याला सुध्दा खूप काही सांगायचे असते. जसा वेळ मिळेल तसा तो मला सर्व सांगत असतो. परंतु तो पुण्यात आल्यापासून आमचा दिनक्रमच बदलला होता. तो मी येण्याच्या 8 महीने आगोदर पुण्याला आला होता. त्यामुळे औरंगाबादला मनमोकळ्या गप्पा मारायला कोणीच नव्हते. मित्र खूप आहेत परंतु त्यांच्याशी त्यांच्या पध्दतीच्या गप्पा माराव्या लागतात. सागर एकच असा होता की, मी ज्याच्याशी सर्व विषयांवरील गप्पा मारु शकत होतो. परंतु तो इथे आल्यापासून माझ्या विषयांना मी मनातील एका कोपऱ्यात बंद करुन ठेवले होते.
मला आज पुण्यात येऊन पंधरा दिवस झाले. त्यातल्या त्यात सागरकडे रहायला असल्यामुळे तर अजूनच चांगले वाटत होते. आम्ही स्वप्नात सुध्दा विचार केला नव्हता की, आम्ही पुन्हा असे एकत्र येऊ. परंतु देवालाच आमची काळजी असावी.
आज माझा दिवस सुरुवातीला थोडा कंटाळवाणाच गेला. ऑफिसात सुध्दा मन लागत नव्हतं. ऑफिस संपताना मी सागरला फोन केला आणि त्याला ऑफिसकडून यायला सांगितले. त्याच्याकडे गाडी असल्यामुळे तो मला बऱ्याचवेळा माझ्या ऑफिसकडून पिकअप करतो. त्याचा घरी जाण्याचा रस्ता तसा वेगळा आहे परंतु तो माझ्यासाठी पुण्याला फेरी मारुन येतो. आज सुध्दा तो आला होता. रात्रीचे 8.30 वाजले होते. मी सुध्दा ऑफिसातून बाहेर पडलो. आम्ही दोघे घरी आलो आणि लगेचच मेस मध्ये जेवायला गेलो. जेवण झाल्यावर मला थोडे फिरावेशे वाटले मी सागर आणि आमच्या सोबत अजून एक मित्र होता मंदार त्याला फिरायला जाऊ असे सांगितले. दोघांनी होकार दिला आणि आम्ही झेड ब्रीजच्या दिशेने निघालो.
झेड ब्रीज म्हणजे पुण्याच्या तरुणांचा जमायचा कट्टा. परंतु इथे जोडपेच जास्त असतात असे म्हणतात. मी आज दूसऱ्यांदा झेड ब्रिजवरुन जाणार होतो. पहिल्या वेळेस म्हणजे काल अभिषेक सोबत पावसात भिजत आलो होतो आणि आज सागर सोबत. माझा फिरायला जायचा उद्देश म्हणजे सहज थोडे मन मोकळे करावे तसेच मंदार सोबत सुध्दा बोलणे होईल, ओळख वाढेल अशा उद्देशाने मी फिरायला निघालो. सागर सोबत फिरताना मला तर औरंगाबादचेच दिवस आठवले. तशाच गप्पा, गोष्टी, विनोद चालू होते आमचे. परंतु मंदार एक शब्द सुध्दा बोलायला तयार नव्हता. का कुणास ठाऊक काय झाले होते त्याला. एरवी वाड्यात तो माझ्या रुममध्ये येऊन बोलत असतो. परंतु इथे तो जाणून बुजून शांत होता असे वाटत होते. माझा त्याला राग आला होता का, अथवा त्याला माझे विनोद आणि सागरच्या-माझ्या गप्पा आवडल्या नसाव्यात. मी तरी त्याला अधून मधून बोलायचो, त्याला बोलते करायचे प्रयत्न करायचो परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. माहित नाही त्याच्या मनात काय होते ते. तो शेवटपर्यंत जास्त बोललाच नाही. पण मी आणि सागरने खूप मनसोक्त आनंद घेतला त्या रात्रीचा. पुन्हा पहिले दिवस आठवले. तशीच रात्र, आम्ही दोघं, अनेक विषय तसेच विनोद, हास्य कल्लोळ, टॉन्ट पास करणे अनेक जून्या गोष्टी आज आठवत होत्या. खरंच आजचा दिवस एक छान आठवणीत राहणारा दिवस होता.

No comments:
Post a Comment