ए.बी.सी चौक की अप्पा बळवंत चौक
आज मला पुण्यात येऊन जवळपास ५ दिवस झाले. आता मी चांगला रुळलोय पुण्यात. चांगला यासाठी म्हणतोय कारण की, आता मित्र झालेत. ऑफिसमध्ये सुध्दा आता सगळ्यांशी ओळखी झाल्यात. माझे काम सुध्दा थोडं थोडं मला जमायला लागलंय. इथलं जेवण, राहणीमान, रस्ते, लोक, लोकांची मानसिकता या सगळ्या गोष्टी हळूहळू समजायला लागल्या आहेत. त्यामुळे माझा थोडा आत्मविश्वास वाढलायं. जसजसे दिवस जातील तसतसा अजून वाढेल. कोणताही बदल एकदम होत नाही तो हळूहळू होतो आणि एकदम झालेला बदल कधीच चांगला नसतो.
मला आठवतयं मी जेव्हा पहिल्या दिवशी पूण्यात आलो होतो, त्यावेळी माझा इंटरव्यूव्ह हा शिवाजी नगर येथील सकाळ पेपरच्या ऑफिसात होता. त्यामुळे मी इंटरनेटवरुन सकाळ ऑफिसाचा पत्ता काढला होता. पत्ता असा होता की, ‘नरवीर तानाजीवाडी’ बस डेपो जवळ, शिवाजी नगर. मी सागरला फोन केला आणि पत्ता सांगितला. तेव्हा तो म्हणाला ‘नतावाडी’ मला माहित आहे हा बस डेपो. मी थोडं गोंधळात पडलो. मी त्याला नरवीर तानाजीवाडी बसडेपो सांगितला आणि हा नतावाडी बसडेपो म्हणतोय. तरीही जास्त फोनवर चर्चा न करता मी पूण्यात आलो आणि सकाळीच मी आणि सागर शिवाजीनगर जवळील नरहरी तानाजीवाडी येथील बसडेपोकडे निघालो. रस्त्यात अनेक बस दिसत होत्या त्यातल्या काही नतावाडीकडे जाणा-या होत्या. सागर सुध्दा नतावाडीच म्हणत होता. थोडी विचारांची ट्रॅफिक डोक्यात चालू असतानाच सागरने मला नरहरी तानाजीवाडी येथील बसडेपो जवळील सकाळ ऑफिस मध्ये नेले. मला नंतर समजले की नरहरी तानाजीवाडी म्हणजेच त्याचे संक्षिप्त ‘नतावाडी’ असे केले होते. या पी.एम.टी. वाल्यांनी सुध्दा या बसडेपोला नतावाडी म्हणूनच रुढ केले आहे. याच संक्षिप्त रुपामुळे माझी गल्लत होत होती.
जाऊदे ते काहीही असो, पण मला माझे ऑफिस मिळाले होते यातच मी खूष होतो. नंतर इंटरव्यूव्ह झाला. मी सिलेक्ट झालो. आज बघता बघता माझ्या नोकरीला पाच दिवस झालेत.
माझ्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी मला सॅलरी अकाऊंट काढा म्हणून सांगितले होते. त्यानंतर त्या आय.डी.बी.आय. बॅंकेच्या शोधात माझे तीन दिवस गेले. मग मीच सागरला काल सांगितले होते ती बॅंक शोधायला आणि काल आम्ही ती बॅंक शोधली. आज सकाळी उठून सर्व आवरुन मी लवकरच त्या बॅँकेत गेलो आणि नवीन अकाऊंट उघडण्याचा फॉर्म भरला. नवीन अकाऊंट उघडायला ओळखपत्र द्यावे लागते आणि माझी सर्व कागद पत्रे मी घरीच ठेऊन आल्याने पंचाईत होऊन बसली. बरं आहे माझे आई-वडील पुण्यात येणार होते पंढरपूरच्या वारीच्या निमित्ताने. त्यामुळे मी त्यांना सांगितले इलेक्शनकार्ड घेऊन यायला. ते येताना आणतील.
बर.. झालं आठवलं.. एक गोष्ट सांगायचीच राहून गेली तुम्हाला. ती म्हणजे अशी की, मी काल आम्ही जेव्हा बॅंक शोधली तेव्हा मित्राने मला ए.बी.सी. चौकात ही बॅंक आहे असे सांगितले. तो म्हणाला की, तु लक्ष्मी रोडने आलास ना, तर कोणालाही ए.बी.सी. चौक विचार ते तूला सांगितील. मी ही तसंच केलं. माझ्या घरापासून हा लक्ष्मीरोड कमीत कमी ३-४ कि.मी. असेल तो पर्यंत मी चालत गेलो. नंतर मला वाटले की इथेच कुठेतरी हा ए.बी.सी. चौक असेल म्हणून मी कोणाला तरी विचाराव या उद्देशाने रस्त्यावर थांबलेल्या एका माणसाला विचारले की, ए.बी.सी. चौक कुठे आहे, तो लगेच थोडा रागात म्हणाला ए.बी.सी. काय म्हणता अप्पा बळवंत चौक म्हणाना. हा पुढचा चौक म्हणजे अप्पा बळवंत चौक. त्यानंतर मी विचारात पडलो की, नेमके कोणाचे बरोबर आहे. या चौकाला काय म्हणायला पाहिजे ए.बी.सी. चौक का अप्पा बळवंत चौक.
एक – एक करत हजार विचार मनात यायला लागले. आज प्रत्येक जण या संक्षिप्त नावांना भूललाय. जणू हेच खरे नाव असल्यासारखा वावरतोय. का कोणाला आपल्या नावाचे संक्षिप्त नाव आवडते? लोकांनी शहारुख ला एस.आर.के. केलय. अमिताभ बच्चन सारख्या प्रसिध्द अभिनेत्याला बीगबी म्हणतात. बिपाशा बसू अभिनेत्रीला तर माध्यमांनी बिप्स म्हणूनच एक ओळख दिलीय. अरे ह्या तर सिनेतारकांच्या गोष्टी झाल्या पण माझी एक मैत्रिण आहे तीचे नाव “ प्रियंका ” हे असताना तिला स्वत ला ‘प्री’ म्हणून घ्यायला आवडते.
आज लोकांना नमस्कार ऐवजी हाय ऐकायला आवडते, मोबाईल मेसेज मुळे तर या शॉर्ट फॉर्मसुध्दा अजून शॉर्ट होत चालले आहेत. मॅसेज मधून गुड मॉर्निंग लिहिण्याऐवजी जी.एम. लिहून काम भागवतात. चॅटींग मध्ये काही विचारायचं तर अगदी तीन चार शब्दातच म्हणजे कसा आहेस, तुझं काय चाललयं असे लिहण्याऐवजी whts up? एवढेच लिहून मोकळे होतात.
सद्य स्थितीत तर अनेक ठिकाणं, अनेक नावे आहेत ज्यांना फक्त संक्षिप्त रुपातचं ओळखलं जातयं. त्यांचे मुळ नाव जर विचाराल तर लोक थोडं विचारात पडतात. काही जण सांगतात त्याचे विस्तारित नाव पण बहूतेक जण हे सांगण्यास असमर्थ ठरतात. परंतु हे जे काही होतंय ते चांगलं आहे का, खरचं याची गरज आहे का? का आपण स्वत:लाच आळशी बनवतोय. शॉर्टकर्ट मारण्याच्या स्पर्धेत आपण आपल्या शहराची ओळख, आपल्या गावाची ओळख, आणि शेवटी आपली तर ओळख विसरत नाही ना?
No comments:
Post a Comment