Wednesday, June 22, 2011

‘केक घेऊ नका मग!’ (21 June 2011)

‘केक घेऊ नका मग!’
पुण्याच्या बाबतीत सांगायचे झाले तर पुणा एक आय.टी. सीटी म्हणून खुप प्रसिध्द आहे. पुण्याचा विकास होण्यामागे दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे इथले विद्यापीठ आणि दूसरी गोष्ट म्हणजे आय.टी. क्षेत्राचे विस्तारीकरण. या दोन गोष्टींमुळे पुण्याला संपूर्ण जगात एक वेगळी ओळख निर्माण करता आली. संपूर्ण जगात ओळख निर्माण करण्याच्या स्पर्धेत पूण्याचा विकास खूप झपाट्याने झाला. पूणे बघे-बघे पर्यंत मेट्रोसिटी कधी झाले हे कळालेच नाही. पुण्यामध्ये रातोरात अनेक गोष्टी बदलत गेल्या. या सर्व गोष्टी जरी पुण्याच्या विकासास आवश्यक होत्या त्याच बरोबर एक नको असलेली गोष्ट सुध्दा पुण्यात झाली. या सर्व बदलांबरोबर पुणेरी पुणेकर यांच्यात सुध्दा खुप बदल झाला. मला माहित नाही की पुण्यातील लोक पहिले कसे होते. परंतु आज पुण्याचे लोक इतर लोकांपेक्षा खुप वेगळे वाटतात. वेगळे म्हणजे त्यांच्या स्वभाव, त्यांची विचार करण्याची पध्दत अशा गोष्टी म्हणायच्या आहेत. या वेगळ्या लोकांत येथील दूकानदारतर त्याहून आगळे–वेगळे. त्यांच्या बाबतीत काय सांगावं.
काल माझा मित्र एका मेडीकल मधून काही तरी घेत होता. परंतु तो दूकानदार त्याच्या कडे लक्षच देत नव्हता. माझ्या मित्राने त्याला एक-दोनदा पुन्हा पुन्हा आवाज दिला. तरीही दुकानदार ऐकेनासा करत होता. तो दुस-या गि-हाईकाचे काहीतरी काम करत होता. माझ्या मित्राने त्याला पुन्हा एकदा आवाज दिल्यावर तो एकदम उध्दटपणे त्याला बोलायला लागला. दोघांचा थोडा वाद झाला नंतर आम्हीच त्या दूकानातून निघून गेलो. मला नेमके कळाले नाही कोणाचे चुकले ते. पण हे असे पहिल्यांदाच घडले होते माझ्या समोर.
जाऊ द्या.. ह्या सर्व गोष्टी
आजची रोजनिशी जरा स्पेशल आहे. कारण आजचा दिवस म्हणजे माझ्या सुट्टीचा दिवस. आज माझा मित्र सुध्दा येणार होता औरंगाबादचा. महेंद्र. महेंद्र नाव आहे त्याचे. तो माझ्या सोबत पत्रकारीतेच्या शिक्षणाला होता. त्याचे पुण्याच्या कलेक्टर ऑफिसला काही तरी काम होते त्यामुळे तो आला होता. दूपारी १२ वा. त्याला भेटायचे होता. माझी सकाळ ९ ला झाली. मला आज पॅनकार्ड काढायला जायचे होते. सागरला ऑफिस माहित असल्यामुळे मी त्याच्या सोबत जाणार होतो. लवकर आवरुन मी त्याच्या सोबत पॅनकार्डच्या ऑफिसात गेलो. तेथे फॉर्म भरुन मी पुणे स्टेशनला महेंद्रला भेटायला निघालो. जवळपास १ तासाच्या पी.एम.टी.च्या प्रवासानंतर मी त्याला कलेक्टर ऑफिसला जाऊन भेटलो. महेंद्र आणि मी फिरत फिरत एका फरसाणच्या दुकानात गेलो. थोडं बाहेर खाल्यामुळे भूक तशी जास्त नव्हती तरीही काही तरी थोड गोड खावस वाटत होतं. मी महेंद्रला केक घेण्यास सांगितले. आम्ही केकचे पाकीट हातात घेतले आणि किंमत विचारली. त्याची किंमत २० रु. होती. आम्ही हेच केकचे पाकीट घ्यायचे ठरवले. महेंद्रने १०० रु. ची नोट दिली. त्या दूकानदाराने आम्हाला सुट्टे पैसे मागितले. आमच्या जवळ सुटे पैसे नसल्याने आम्ही त्याला नाही म्हणून सांगितले. त्याने पन्नास रुपये आहेत का? विचारले. आमच्या कडे नसल्याने आम्ही कुठून देणार पन्नास रुपये. आम्ही त्याला सुट्टे काहीच नाहीत हे सांगितले. तर तो दुकानदार आम्हाला ‘केक घेऊ नका मग!’ असे म्हणाला चक्क. मला तर धक्काच बसला. हा मला पुण्यात दुस-यांदा बसलेला धक्का होता. परंतु या धक्क्याची तिव्रता मात्र काल माझ्या मित्रासोबत मेडिकल मध्ये झालेल्या घटनेपेक्षा जास्त होती. थोडा वेळ काहीच सुचले नाही. नंतर आम्ही त्या दूकानातून रागात निघून गेलो. वेळ निघून गेली परंतु माझ्या डोक्यातून ती गोष्ट काही जात नव्हती. आमच्या औरंगाबाद मध्ये गि-हाईक म्हणजे देवता समान. दुकानदार गि-हाईकासाठी काहीही करायला तयार असतात. चक्क असलेल्या किंमतीच्या (वाढवलेली) अर्ध्या किंमतीत सुध्दा ते माल विकायला तयार असतात. परंतु ते गि-हाईकाला कधीच नाराज करत नाहीत किंवा परत पाठवत नाहीत. परंतु इथे तर गि-हाईकाला काडीमोल किंमत देत नाहीत ही दूकानदार मंडळी. कदाचित यांना माज आलाय का ? असे काही क्षण वाटले. परंतु नंतर लगेच उत्तर मिळाले. हे सर्व परिणाम या आय.टी. कंपन्यांमुळे झालेत. हे कंपनीवाले भरमसाठ पगार देऊन येथील लोकांना आळशी बनवण्यात यशस्वी झालेत. त्यामुळे हे आय.टी. कंपनीत काम करणारे लोक पैशाकडे न बघता दुकानदार जी किंमत सांगेल त्या किंमतीत वस्तू विकत घेतात. त्यामुळे पुण्याची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली (किंवा दुकानदारांनी वाढवली). त्यामुळे येथील दुकानदार आज जास्तीचा नफा मिळवत आहेत. त्यांना आता छोट्या - साधारण गि-हाईकांची गरज उरली नाही.
या सगळ्या गोष्टीत एक गोष्ट मात्र होताना दिसते, ती म्हणजे या सर्वांमध्ये मध्यमवर्गीय आणि गरीब माणूस मरत चाललाय. त्याचा कोणीच विचार करत नाही. दुकानदारांनी वस्तू विकण्यासोबत स्वतची माणूसकी सुध्दा विकली का असा प्रश्न पडतो ?
तुम्हाला ज्या दरात वस्तू विकायला परवडतील त्या दरात दुकानदारांनी वस्तू विकाव्यात तो त्यांचा प्रश्न. परंतु तुम्ही जरा सुध्दा माणूसकीने वागणार नसाल, तुम्हाला जर गि-हाईकांशी बोलण्याची पध्दत नसेल तर तुम्हाला काय म्हणावं. नक्की माणूसच आहात ना तूम्ही यात शंका वाटते.

No comments:

Post a Comment