Sunday, June 19, 2011

तीन करमणूकीची साधने (18 June 2011)

तीन करमणूकीची साधने
आज मी माझ्या कामाबाबत काहीच बोलणार नाही. कारण आज काम करण्यासारख काहीच नव्हत असं नाही पण रोज रोज तेच काय लिहायचं. तुम्ही सुध्दा तेच तेच वाचुन कंटाळणार. म्हणून वाटलं आज काहीतरी वेगळं आणि नवीन तुम्हाला द्याव.
आज मी मला सापडलेल्या त्या जुन्या रस्त्याने ऑफिसला गेलो. जाताना रस्त्यातील गर्दी, लोकांची धावपळ, मुलामुलींची शाळेसाठी, कॉलेजसाठीची गडबड तसेच विकेंड (शनिवार) असल्यामुळे अनेकांना सुट्या असल्यामुळे त्यांच्या सुट्याचे नियोजनामुळे ते बाहेर जाण्यासाठी निघालेले अशा अनेकांची धावपळ या पुण्यात पहायला मिळाली. ही धावपळ नेहमीच असते. परंतु माझा रस्ता बरोबर आहे का चूक हे बघण्याच्या नादात या लोकांकडे कधी लक्षचं देता आलं नाही. पण आज रस्ता माहित झाल्यामुळे मनसोक्त लोकांचा, वातावरणाचा, त्यांच्या धावपळीचा आनंद मला घेता येत होता. ऑफिस जरी थोडं दूर असलं तरी मला फिरत फिरत जायला कधी कंटाळा येत नाही.

माझ्या रुम मधील मुलांच्या गोंधळामुळे माझी संध्याकाळ सुध्दा खुपच चांगली जाते. मी जिथे राहतो तेथील वाड्यात तीन गोष्टी खूप मजेशीर आहेत, ज्या आमच्या सर्वांचे खूप मनोरंजन करतात, एक म्हणजे आमच्या वाड्याची मालकीण आजी दुसरी गोष्ट म्हणजे येथील मुलं आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे येथील ढेकूण. या तीन्ही गोष्टी इथे करमण्यासाठी मला पूरून उरतात. मला काय सर्वांनाच पुरून उरतात असे वाटते.
माझ्या वाड्याची मालकीन आजी यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर ती म्हणजे मिल्ट्रीचा कर्नल असल्यासारखीच आहे. तीच्या वाड्यात रहायचे म्हणजे तिने लावलेले सर्व नियम पाळावे लागतात. मी लॅपटॉप आणला होता तो त्यांनी पाहिला तर लगेच माझ्याकडून शंभर रुपये घेतले. त्यांनी नुकताच घरांना रंग लावला आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या भिंतींना सुध्दा टेकून बसण्यास मनाई केली आहे. तसेच घरातील खुंट्यांवर कोणीही कपडे वाळवायचे नाही अथवा लटकवायचे नाही. कोणत्याच मित्राला रुमवर घेउन यायचे नाही जर आणले तर त्याचे ५० रु. वेगळे द्यावे लागतात, हे तर थोडेच नियम आहेत असे अनेक नियम आहेत. मी नवीन असल्याने मला जास्त माहित नाहीत. पण होईल हळू हळू सर्व नियम पाट आणि जसे मला कळतील तसे तुम्हालाही सांगेलच ना...
दुसरी मनोरंजनाची गोष्ट म्हणजे इथली मुलं. माझ्या रुम मध्ये एक विवेक नावाचा भालकी (बिदर) येथील. भालकी म्हणजे कर्नाटकचा. माझे आईवडील सुध्दा कर्नाटकचे. कर्नाटकमध्ये मराठी थोडी वेगळ्याच प्रकारे बोलली जाते. पण त्याची एक वेगळीच मजा आहे आणि ही मजा मला आवडते. हा विवेक तशीच मराठी बोलतो. त्यामुळे मला जरा आपल्याच घरामध्ये असल्यासारखे वाटते. अजून एक मित्र म्हणजे सागर. तो तर माझ्या घराजवळचाच आहे. म्हणजे लहानपणापासूनचा मित्र. आणि तिसरा मित्र हरीष ही जरा भारी केस आहे. तीच्या बाबत नंतर कधी तरी बोलू.
तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे इथले ढेकूण. आमच्या रुममध्ये खूप ढेकूण आहेत असं मला सांगण्यात आलं होतं परंतु मला त्याचा प्रत्यय आला नव्हता. पण आज आला. माझा मित्र सांगत होता की, मी पुण्याला येण्याच्या दिवशी रात्री ३ वा. हरीष ढेकूण मारायला चक्क खिडकीत चढून स्लॅपवर फिरत असलेले ढेकूण पकडत होता. मला हे ऐकून थोड हसूच आलं. पण आमच्या रुम मध्ये ढेकूण आहे हे मात्र खरं. खूप जणांना चावलेत सुध्दा. एवढं बरं आहे की ढेकणांमुळे मलेरीया, प्लेग सारखे आजार होत नाहीत. नाही तर आमच्या वाड्यातीलच मुल जास्त असते. आणि त्यात माझा एक नंबर असला असता.
उद्या रविवार असल्याने माझ्या रुममध्ये आज मित्रांची मैफीलच जमली होती. सर्व जण चांगलेच गप्पा मारण्याच्या मुड मध्ये होते. मुव्ही बघीतला नंतर गप्पा चालू झाल्या. जवळपास १ वाजला रात्री झोपायला. माझ्या मित्रांना जरी सुट्टी असली तरी मला उद्या सुट्टी नव्हती. मला सुट्टी मंगळवारी दिली आहे.. अंबाबाईचा वार.
अंबाबाईच्या नावाने उदो.. उदो...



No comments:

Post a Comment